हुजूर पक्षाची (कन्झर्व्हेटिव्ह पार्टी) १४ वर्षांची सत्ता संपुष्टात आणणारे मजूर पक्षाचे (लेबर पार्टी) नेते कीर स्टार्मर यांच्याबद्दल सगळ्या जगात उत्सुकता आहे. अवघ्या १० वर्षांपूर्वी राजकारणात आलेल्या या नेत्याने अनेक बडी नावे असलेल्या हुजुर पक्षाला चारीमुंड्या चीत केले. फारसे वक्तृत्व नसताना, राजकारणातील अनुभव नसताना त्यांनी हा चमत्कार कसा केला, त्यांचे बालपण, शिक्षण याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव किती, याचा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टार्मर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय?

आतापर्यंतच्या ब्रिटिश नेत्यांच्या तुलनेत स्टार्मर हे बरेच विनम्र असल्याचे सांगितले जाते. लंडनजवळच्या सरे येथे एका कामगार कुटुंबात १९६३ साली त्यांचा जन्म झाला. ‘टूलमेकर’ असलेल्या वडिलांशी त्यांची फारशी जवळीक नव्हती. त्यांची आई परिचारिका होती. संधीवाताच्या एका गंभीर प्रकाराने दीर्घकाळ आजारी असलेल्या आईची रुग्णालयात जाऊन स्टार्मर यांनी अनेक वर्षे शुश्रुषा केली. कुटुंबात पदवी मिळविणारे कीर हे पहिलेच… लीड्स आणि ऑक्सफर्डमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतल्यानंतर वकिली सुरू केली. विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीवर १६व्या वर्षापर्यंत त्यांचे शिक्षण झाले. स्टार्मर फुटबॉलचे आणि पर्यायाने ‘आर्सेनल प्रीमियर लिग क्लब’चे मोठे चाहते आहेत. त्यांची पत्नी व्हिक्टोरिया लंडनच्या ज्यू कुटुंबातील आहे आणि त्या आरोग्य क्षेत्रात काम करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

हेही वाचा : अबकी बार ब्रिटनमध्ये ‘४००’ पार! निर्विवाद बहुमत मिळवणाऱ्या मजूर पक्षाचा काय आहे इतिहास?

वकील म्हणून कामगिरी कशी होती?

१९८७ साली बॅरिस्टर झाल्यानंतर स्टार्मर यांनी वकिली सुरू केली. मानवी हक्कांचे संरक्षण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. कॅरेबियन देश आणि आफ्रिकेमध्ये फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांसाठी त्यांनी युक्तिवाद केले. ‘मॅकडोनाल्ड’ या फास्ट फूडमधील अवाढव्य कंपनीने पर्यावरणविषक दावे करणारी पत्रके वाटली होती. त्याविरोधात लढणाऱ्या ‘मॅकलिबल’ या सामाजिक संस्थेला त्यांनी विनामूल्य कायदेशीर मदत देऊ केली. याखेरीज मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या अनेक संस्था, कार्यकर्त्यांना स्टार्मर यांची साथ लाभली. जुलै २००८मध्ये त्यांची स्कॉटलंड, इंग्लंड, वेल्सचे ‘क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिस’चे (सीपीएस) प्रमुख आणि सार्वजनिक अभियोग संचालकपदी नियुक्ती झाली. न्याययंत्रणेत मानवाधिकारांवर अधिक लक्ष दिले जावे, हा या नियुक्तीमागचा उद्देश होता. या काळात त्यांनी अनेक सुधारणा घडविल्या तसेच सरकारी वकील म्हणून अनेक महत्त्वाची प्रकरणेही हाताळली.

राजकारणातील कारकीर्द कशी?

वयाच्या पन्नाशीत स्टार्मर यांनी नव्या क्षेत्रात प्रवेश केला. वकील म्हणून ते प्रसिद्ध होतेच. याचा फायदा त्यांना राजकारणातही झाला. २०१५ साली लंडनमधील मजूर पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या हॉलबॉर्न अँड सेंट पँकर्स मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ते हाऊस ऑफ कॉमन्सवर सर्वप्रथम निवडून गेले. त्यानंतर २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत मताधिक्य दुपटीने वाढवून ते पुन्हा पार्लमेंट सदस्य झाले. मजूर पक्षाचे तत्कालीन नेते जेरेमी कॉर्बिन यांच्या ‘शॅडो कॅबिनेट’मध्ये त्यांनी गृह, स्थलांतरित अशा काही विभागांचे काम केले आहे. (शॅडो कॅबिनेट याचा अर्थ विरोधी पक्षांनी तयार केलेले त्यांचे प्रतीकात्मक मंत्रिमंडळ. यातील प्रत्येक शॅडो मिनिस्टरला त्या-त्या खात्यांवर बारकाईने नजर ठेवायची असते.) जुलै ते ऑक्टोबर २०१५ या काळात ते पार्लमेंटच्या गृहनिर्माण समितीचे सदस्य होते. मात्र नंतरच्या काळात त्यांचे कॉर्बिन यांच्याशी मतभेद झाले व त्यांनी पक्षातील सर्व पदांचे राजीनामे दिले. कालांतराने ‘ब्रेग्झिट’ विरोधाच्या धाग्याने दोघे पुन्हा जवळ आले व स्टार्मर ‘ब्रेग्झिट प्रवक्ता’ म्हणून नियुक्त झाले. २०१९मधील सार्वत्रिक निवडणुकीत कॉर्बिन यांचा पराभव झाल्यानंतर मजूर पक्षाची सूत्रे स्टार्मर यांच्याकडे आली.

हेही वाचा : पाहुणे, वऱ्हाडी, वाजंत्री सगळ्यांनाच होणार शिक्षा! ‘या’ देशाने बालविवाह बंदीसाठी केलेला कठोर कायदा का आला चर्चेत?

दिग्विजयापर्यंतचा प्रवास कसा होता?

हाऊस ऑफ कॉमन्समधील दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचे नेते, या नात्याने विरोधी पक्षनेतेपद आपोआप स्टार्मर यांच्याकडे आले. केवळ ब्रिटनच नव्हे, तर जगात उलथापालथ घडविणारा हा काळ होता. कोविड-१९ च्या साथीने जगाला विळखा घातला असताना स्टार्मर यांनी तत्कालीन पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना संपूर्ण साथ देण्याची भूमिका घेतली. मात्र नंतर सरकारच्या साथरोग हाताळणीवर तेवढ्याच तिखटपणे त्यांनी टीकाही केली. उण्यापुऱ्या चार वर्षांत त्यांनी विरोधी पक्षनेता आणि मजूर पक्षाचा नेता या दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळल्या. हुजूर पक्ष एकामागोमाग एक चुका करत असताना त्या सातत्याने जनतेसमोर मांडण्याची आणि त्यांचे विस्मरण होऊ न देण्याची जबाबदारी स्टार्मर यांनी पार पाडली. जॉन्सन, लिझ ट्रस आणि शेवटी ऋषी सुनक यांचे कच्चे दुवे हेरून त्यावर ते घाव घालत राहिले. त्याच वेळी पक्षाला डाव्या विचारसरणीकडून मध्यममार्गावर आणण्यातही त्यांना यश आले. त्यामुळेच हुजूर पक्षाला कंटाळलेल्या, पण डावीकडे झुकण्याची तयारी नसलेल्या मतदारांना ते आपल्याकडे खेचू शकले. मानवाधिकारांचे पुरस्कर्ते, प्रख्यात वकील आणि विरोधी पक्षनेते या भूमिकांमध्ये आजवर स्टार्मर यांना लोकांनी पाहिले आहे. आता ते पंतप्रधान म्हणून कशी कामगिरी करतात, याची ब्रिटनप्रमाणेच जगालाही उत्सुकता आहे.

amol.paranjpe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is keir starmer the next british prime minister as labour party wins uk elections 2024 print exp css
First published on: 05-07-2024 at 17:08 IST