बिहारमधील रेल्वे परीक्षांच्या मुद्द्यांवरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलं आहे. परीक्षांच्या निकालांवर आक्षेप घेणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांनी संतापाच्या भरात चक्क एक रिकामी रेल्वेच पेटवून दिल्याचा प्रकार आज समोर आला आहे. त्यामुळे देशभर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली असून त्याहून जास्त चर्चा या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ‘खान सरां’ची आहे. यूट्यूबवर खान सरांचे प्रशिक्षणाचे अनेक व्हिडीओ असून सोशल मीडियावर देखील ते बरेच चर्चेत असतात. पण या प्रकरणामुळ ‘खान सर’ हे नाव देशभरात पोहोचलं आहे. नेमकं हे काय प्रकरण आहे आणि देशभरात चर्चेत आलेले आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले खान सर आहेत तरी कोण?
परीक्षांच्या निकालावरून वाद!
हा सगळा प्रकार सुरू झाला तो बिहारमध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या RRB-NTPC Exam अर्थात भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षांच्या निकालांपासून. हे निकाल लावताना बोर्डाने घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला असून त्याचा विरोध करण्यासाठी हजारो परीक्षार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. गेल्या चार दिवसांपासून या मुद्द्यावरून बिहारमधील वातावरण तापलं असून या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. रस्त्यावर उतरून परीक्षार्थींनी निषेध आंदोलन करतानाच गयामध्ये एका रिकाम्या रेल्वेवर दगडफेक करत आंदोलकांनी ही ट्रेनच पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणावरून वातावरण तापल्यानंतर त्याचे वेगवेगळे कंगोरे आता समोर येऊ लागले आहेत. यासंदर्भात हाती आलेली माहिती, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांचा जबाब आणि काही व्हिडीओंच्या आधारे पोलिसांनी ‘खान सर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीसह एकूण ४०० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं झालं काय?
रेल्वे भरती बोर्डाने नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अर्थात एनटीपीसी नोकरभरतीसाठी घेतलेल्या सीबीटी २ परीक्षांचे निकाल १४ आणि १५ जानेवारी रोजी जाहीर केले. त्याच आधारावर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांसाठी उमेदवारांची यादी तयार केली जाणार होती. मात्र, या निकाल प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत परीक्षार्थींनी आंदोलनाला सुरुवात केली. २४, २५ आणि २६ जानेवारी असे सलग तीन दिवस या मुद्द्यावरून आंदोलन सुरू आहे. गुरुवारी सकाळी आक्रमक आंदोलकांनी ट्रेन पेटवून दिल्याची देखील घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून आपण आक्रमक आंदोलन आणि जाळपोळ केल्याची कबुली काही आंदोलकांनी दिल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे. या व्हिडीओमध्ये खान सर यांनी आरआरबी एनटीपीसी परीक्षा रद्द न केल्यास विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यासंदर्भात वक्तव्य केल्याचं सांगितलं जात आहे.
खान सरांचे क्लास आणि आंदोलन!
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात खान सरांचं नाव जोरदार चर्चेत आलं असून ते नेमके कोण आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे. ‘खान सर’ हे सोशल मीडियावर आणि विशेषत: यूट्यूबवर बरेच लोकप्रिय आहेत. ते स्पर्धा परीक्षांचे क्लास घेत असून त्याच माध्यमातून त्यांनी रेल्वे भरतीबाबतच्या या परीक्षेसाठी देखील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं होतं.
खान सर हे मूळचे बिहारमधील पाटण्यामध्ये राहतात. खान जीएस रीसर्च सेंटर या नावाने त्यांचं एक यूट्यूब चॅनल असून त्यावर स्पर्धा परीक्षेशी संबंधित विषयांचे अनेक व्हिडीओ देखील आहेत. याच नावाने त्यांची एक स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संस्था देखील असून तिथेही ते विद्यार्थ्यांचे क्लास घेतात. त्यांच्या शिकवण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. या प्रकरणात खान सर यांच्यासोबत इतर पाच शिक्षकांविरोधात विद्यार्थ्यांना भडकवल्याच्या गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यानंतर देखील खान सर यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थींनी पुढाकार घेतला आहे.
खान सरांचं खरं नाव काय?
दरम्यान, खान सर यांनी आपल्या नावाविषयी नेहमीच गुप्तता पाळली आहे. याआधी देखील गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांच्या नावाचा मुद्दा उपस्थित झाला असता त्यांनी आपलं खरं नाव जाहीर केलं नव्हतं. “खान हे फक्त एक टायटल असून ते माझं खरं नाव नाही. मी कधीच माझं खरं नाव सांगितलेलं नाही. वेळ येईल, तेव्हा ते सगळ्यांना माहिती हईलच. नावात कोणतंही मोठं रहस्य लपलेलं नाही. पण जर त्याचा ट्रेंड असेल, तर ते चालू ठेवलं जायला हवं”, असं खान सर म्हणाले होते.
आंदोलनाची काय परिस्थिती?
एकीकडे खान सर आणि इतर शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल झालेला असताना दुसरीकडे हे आंदोलन आता बिहारमधून उत्तर प्रदेशच्या दिशेने सरकू लागलं आहे. या आंदोलनाची व्याप्ती वाढत असल्याचं पाहून सरकारने तातडीने पावलं उचलली असून ही परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विद्यार्थ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.
Bihar Violence: विद्यार्थ्यांनी ट्रेन पेटवून दिली; YouTube फेम खान सरांसहीत ४०० जणांविरोधात FIR दाखल
उच्चस्तरीय समितीची स्थापना
“मी परीक्षार्थींना आवाहन करतोय. ही त्यांचीच मालमत्ता आहे. जी गोष्ट त्यांची स्वत:ची आहे, ती उद्ध्वस्त करण्याचा ते प्रयत्न का करत आहेत? जर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं, तर संबंधित यंत्रणा योग्य ती पावलं उचलतील”, असं इशारेवजा आवाहन अश्विनी वैष्णव यांनी विद्यार्थ्यांना केलं आहे. तसेच, या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची देखील स्थापना करण्यात आली आहे.