अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष पदावर परत येताच ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या अनेकांवर विश्वास ठेवत त्यांना आपल्या ताफ्यामध्ये सामील केले. आता ट्रम्प यांच्या ताफ्यामध्ये आणखी एका भारतीयाचा समावेश करण्यात आला आहे. व्हाईट हाऊसने शुक्रवारी जाहीर केले की, भारतीय-अमेरिकन माजी पत्रकार कुश देसाई यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नवे डेप्युटी प्रेस सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देसाई त्यांच्या नवीन भूमिकेनुसार ते व्हाईट हाऊस ऑफिस ऑफ कम्युनिकेशन्सला अहवाल देतील. कोण आहेत कुश देसाई? ट्रम्प यांच्या टीममध्ये आणखी कोणकोणत्या भारतीय नागरिकांचा समावेश आहे? त्या विषयी जाणून घेऊ.
कुश देसाई कोण आहेत?
कुश देसाई यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, देसाई हे माजी पत्रकार आहेत ज्यांनी अमेरिकेमधील न्यू हॅम्पशायरमधील हॅनोव्हर येथील आयव्ही लीग विद्यापीठातील डार्टमाउथ कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) पदवी प्राप्त केली आहे. ‘इंडियन एक्सप्रेसच्या वृत्ता’नुसार, ते डार्टमाउथ येथे विद्यार्थी असताना त्यांना नामांकित जेम्स ओ. फ्रीडमन प्रेसिडेंशियल रिसर्च स्कॉलरशिप मिळाली होती. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना संशोधनाचा अनुभव मिळविण्यासाठी डार्टमाउथ फॅकल्टी सदस्यांशी संपर्कात राहण्यास सक्षम करतो. त्यांनी वॉशिंग्टन, डीसी येथील स्थानिक वृत्तवाहिनी ‘द डेली कॉलर’साठी पत्रकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. त्या ठिकाणी त्यांनी जुलै २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत १० महिने काम केले. देसाई यांनी रिपब्लिकन नॅशनल कमिटी (RNC) साठी संशोधन विश्लेषक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. एप्रिल २०१८ आणि फेब्रुवारी २०१९ पर्यंत त्यांनी तिथे विश्लेषक म्हणून काम केले.
हेही वाचा : सेक्स पार्टी अन् नऊ कोटींमध्ये मुलींची बुकिंग; दावोस परिषदेदरम्यानचा धक्कादायक अहवाल समोर, प्रकरण काय?
मार्च २०१९ मध्ये ते आरएनसीमध्ये व्हेटिंग डायरेक्टरच्या पदापर्यंत जाऊन पोहोचले. अडीच वर्षे या पदावर काम केल्यानंतर अखेरीस आयोवा कम्युनिकेशन्स डायरेक्टर या पदावर त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी जानेवारी २०२४ पर्यंत या पदावर काम केले. देसाई यांची रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनचे डेप्युटी प्रेस सेक्रेटरी म्हणून निवड होण्यापूर्वी काही महीने त्यांनी डेप्युटी कम्युनिकेशन डायरेक्टर म्हणून काम केले.
त्याच्या लिंक्डइन प्रोफाइनुसार, जुलै २०२४ मध्ये त्यांना सब बॅटलग्राउंड स्टेट्स आणि पेनसिल्व्हेनिया कम्युनिकेशन डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पेनसिल्व्हेनियासारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये कम्युनिकेशन विकसित करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पडली. याच ठिकाणी ट्रम्प यांनी २०२४ ची निवडणूक जिंकली. देसाई इंग्रजी आणि गुजराती भाषिक आहेत. त्यांच्या नवीन पदासाठी सांस्कृतिक दृष्टीकोन आणि संप्रेषण कौशल्ये प्रदान करण्यासाठी ते एक योग्य उमेदवार ठरले आहेत.
ट्रम्प ताफ्यात सामील होणारे इतर भारतीय-अमेरिकन
देसाईंबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये महत्त्वाच्या भूमिकेसाठी आणखी दोन भारतीय वंशाच्या नागरिकांची निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय संबंध तज्ज्ञ रिकी गिल राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत (NSC) पुन्हा सामील झाले आहेत. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात ते युरोपियन ऊर्जा सुरक्षा आणि रशियाचे संचालक होते. ‘एनएस’मधील त्यांच्या कर्तव्याव्यतिरिक्त ते स्टेट डिपार्टमेंटच्या ब्युरो ऑफ ओव्हरसीज बिल्डिंग ऑपरेशन्समध्ये वरिष्ठ सल्लागार होते. प्रशासनातून बाहेर पडल्यानंतर, गिल यांनी गिल कॅपिटल ग्रुपचे प्रमुख आणि सामान्य सल्लागार म्हणून आणि टीसी एनर्जी कंपनीचे सल्लागार म्हणून काम केले.
गिल यांचा जन्म न्यू जर्सीच्या लोदी येथे झाला आणि बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ येथून त्यांनी कायद्याची पदवी आणि प्रिन्स्टन विद्यापीठाच्या वुड्रो विल्सन स्कूल ऑफ पब्लिक अँड इंटरनॅशनल अफेयर्समधून बॅचलर पदवी प्राप्त केली आहे. बंगळुरूमध्ये जन्मलेले सौरभ शर्मा राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात रुजू होणार आहेत. ते अमेरिकन मोमेंटचे अध्यक्ष आणि सह-संस्थापक आहेत. हा वॉशिंग्टन डीसी येथील एक पुराणमतवादी गट आहे. २०१९ मध्ये ऑस्टिन येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमधून बायोकेमिस्ट्रीची पदवी प्राप्त केली तेव्हा ते यंग कंझर्व्हेटिव्ह ऑफ टेक्सासचे सर्वात तरुण अध्यक्ष होते.
ज्या वर्षी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये मुक्त भाषणाला संबोधित करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती. त्याच वर्षी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात शर्मा व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलेल्या १० विद्यार्थी कार्यकर्त्यांपैकी एक होते. ट्रम्प यांच्या २.० प्रशासनात इतर अनेक भारतीय-अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. त्यात कॅश पटेल यांचा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) संचालक म्हणून, श्रीराम कृष्णन यांची व्हाईट हाऊसचे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून, हरमीत ढिल्लन यांची नागरी हक्कांसाठी सहाय्यक ऍटर्नी जनरल म्हणून आणि जय भट्टाचार्य यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे (NIH) संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर एका आठवड्यात काय घडले?
व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या दिवसाची सुरुवात कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरीने झाली. इमिग्रेशनवर कडक कारवाई करणे, टिकटॉकवरील बंदीचा निर्णय लांबवणे, जन्मजात नागरिकत्व काढून टाकणे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम (WFH) समाप्त करणे अशा १०० कार्यकारी आदेशांवर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केल्याचे वृत्त होते.
हेही वाचा : महाकुंभमध्ये भरलेली धर्म संसद म्हणजे नक्की काय? याचे आयोजन नेहमी चर्चेचा विषय का ठरते?
त्यात जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि पॅरिस हवामान करार यातून माघार घेणाऱ्याही आदेशांवर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. मेक्सिकोच्या दक्षिणेकडील सीमेवर सैन्य तैनात केले गेले. त्यांच्या सूचनांनुसार, होमलँड सिक्युरिटी विभागाने स्थलांतरितांना अटक करण्यास सुरुवात करण्यासाठी हजारो अतिरिक्त फेडरल कायदा अंमलबजावणी अधिकारी नियुक्त करण्यास सुरुवात केली आहे.