फ्रान्समध्ये सुरू असलेल्या मध्यावधी पार्लमेंट निवडणुकीच्या पहिल्या फेरीत अति उजव्या नॅशलन रॅली पक्षाने जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली आहे. मारीन ल पेन यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या या झपाट्यात सत्ताधारी एनसेम्बल या मध्यममार्गी डाव्या पक्षाची थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. एके काळी फ्रान्सच्या राजकारणात फारशा स्वीकारार्ह नसलेल्या नॅशनल रॅलीला हे यश मिळवून देणाऱ्या मारीन ल पेन यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
मारीन ल पेन आहेत तरी कोण?
मारीन ल पेन या आतापर्यंत फ्रान्सच्या राजकारणाच्या परिघावर असलेल्या नॅशनल रॅली पक्षाच्या मुख्य नेत्या आहेत. त्या २०११ ते २०२२ या कालावधीत पक्षाध्यक्ष होत्या. त्यांनी २०१७ आणि २०२२मध्ये फ्रान्सच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आहे. मात्र, त्यांना अद्याप विजय मिळालेला नाही. त्यांचे वडील ज्याँ-मेरी ल पेन हेही राजकारणात होते, मारीन त्यांचाच वारसा पुढे चालवत आहेत.
हेही वाचा >>>विश्लेषण: ब्रिटनमध्ये सत्तांतराचे वारे?
पार्लमेंटरी निवडणुकीत यश
मारीन ल पेन यांच्याबद्दल एकेकाळी फ्रान्स आणि युरोपमधील उजव्या विचारसरणीच्या गटांसाठी मोठी आशा होती. मात्र, फ्रान्सच्या मध्यम ते मध्यम-डाव्या या विचारसरणीतील राजकारणात अपेक्षित जागा तयार करण्यासाठी त्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांनी जाहीर केलेल्या मध्यावधी पार्लमेंट निवडणुकीमध्ये ल पेन यांना मिळालेल्या यशामुळे आता त्यांची वेळ आली आहे असे मानले जाऊ लागले आहे. अर्थात दुसरी फेरी अजून व्हायची आहे. मात्र, त्यामध्येही ल पेन यांची नॅशनल रॅली हा पक्ष आघाडीवर राहील असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.
मारीन ल पेन यांच्या यशाचे रहस्य
मारीन ल पेन यांनी गेल्या दोन वर्षांपासून नॅशनल रॅलीची प्रतिमा सुधारण्यासाठी आणि विशेषतः तरुणांना आकृष्ट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. मारीन ल पेन यांनी जोआन बार्डेला या तरुण नेत्याकडे पक्षाची सूत्रे सोपवली आहेत. त्यांच्याबरोबर काम करताना अनेक दशकांपासून फ्रान्सच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या डाव्या पक्षांकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी त्या अथकपणे काम करत आहेत.
हेही वाचा >>>ऋषी सुनक यांच्यासमोरील आव्हान मोठे! ब्रिटनच्या निवडणुकीत भारतीयांची मते का महत्त्वाची ठरतील?
नॅशनल रॅलीचा इतिहास
नॅशनल रॅली या पक्षाची स्थापना मारीन ल पेन यांचे वडील जीन-मेरी ल पेन यांनी केली होती. ते आधी सैन्यात होते. अल्जेरिया युद्धात सहभागी असलेले काही सहकारी आणि हुकूमशाही मार्गाने चालणाऱ्या विची राजवटीतील काही फ्रेंच सहयोगी यांच्याबरोबर एकत्रितपणे त्यांनी या पक्षाची स्थापना केली होती. त्याचे मूळ नाव नॅशनल फ्रंट. ज्याँ-मेरी हेही राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाकांक्षी होते. दोन दशकांपूर्वी, म्हणजे २००२मध्ये त्यांनी जॅकस शिराक यांना आव्हान देत निवडणूक लढवली होती. त्यावेळी नॅशनल फ्रंट पहिल्या फेरीत १६.८६ टक्के इतकी मते मिळवून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यांच्या या कामगिरीमुळे फ्रान्समध्ये अनेकांना धक्का बसला होता. अतिउजवा पक्ष फ्रान्ससारख्या देशामध्ये इतकी चांगली कामगिरी करू शकतो यावर त्यांचा विश्वास बसला नव्हता. त्यानंतर ल पेन यांना दुसऱ्या फेरीत अपेक्षित यश मिळू नये यासाठी डावे आणि उजवे एकत्र आले. त्यानंतर शिराक ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले.
नाझी पक्षाशी संबंध
नॅशलन फ्रंटच्या संस्थापकांपैकी एक असलेले पिएर बुस्केट हे दुसऱ्या महायुद्धादरम्यान वॅफेन-एसएसच्या फ्रान्स विभागाचे सदस्य होते. वॅफेन-एसएस ही नाझी पक्षाच्या निमलष्करी शुत्झस्ताफेल (एसएस) संघटनेची लढाऊ शाखा होती. या शाखेवर युद्ध गुन्हे आणि अत्याचारांमध्ये सहभागी असल्याचे आरोप होते. नॅशलन फ्रंटच्या अति उजव्या विचारसरणीचा हा इतिहास फ्रान्सच्या जनतेसाठी अजिबात आकर्षक नव्हता.
नॅशलन फ्रंट ते नॅशलन रॅली
२००२च्या निवडणुकीनंतर ज्याँ-मेरी यांची पीछेहाट होऊ लागली आणि त्यांना बराच संघर्ष करावा लागला. त्यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये अतिउजव्या पक्षाचा अखेरचा काळ सुरू झाल्याचे मानले जात होते. निवडणुकांमध्ये वाईट कामगिरी आणि आर्थिक अडचणी अशा परिस्थितीमध्ये जीन-मेरी यांची कन्या मारीन ल पेन यांनी २०११मध्ये पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. पुढच्याच वर्षी त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूकही लढवली, पण त्यांना यश मिळाले नाही. हळूहळू, आपल्याला आपल्या वडिलांचे विचार, कल्पना काहीशा दूर ठेवून नव्याने पक्षाची बांधणी करावी लागेल हे त्यांच्या लक्षात आले. नाझी पक्षाने केलेल्या ज्यू नरसंहाराचे वर्णन केवळ एक तपशील असे केल्याबद्दल मारीन यांनी आपल्या वडिलांना आधी पक्षातून निलंबित केले आणि नंतर हकालपट्टी केली. नॅशनल फ्रंटची स्थलांतरविरोधी, वंशाभिमानी आणि इस्लाम-ज्यूविरोधी प्रतिमा बदलण्यासाठी मारीन ल पेन यांच्या दृष्टीने हे आवश्यक पाऊल होते. त्यांनतर २०१७मध्ये मारीन यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि त्या पुन्हा पराजित झाल्या. त्यानंतर त्यांनी जनतेला, विशेषतः तरुणांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यासाठी आपल्या सदस्यांना चांगले व्यावसायिक दिसणारे पोशाख देण्यापासून समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्यापर्यंत अनेक बाबी समाविष्ट होत्या. २०१८मध्ये त्यांनी पक्षाचे नाव बदलून नॅशनल रॅली असे केले. चार वर्षांनी मारीन यांनी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. त्यामध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. आता त्या कष्टांना फळ मिळू शकते अशी चिंता फ्रान्समधील मध्यममार्गी आणि समाजवादी गटांना भेडसावत आहे.
nima.patil@expressindia.com