Neela Rajendra अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका ‘नासा’मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे चित्र आहे. ट्रम्प यांच्या आदेशानंतर नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) येथे विविधता, समता आणि समावेशन (डीईआय) प्रमुख म्हणून काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या अधिकारी नीला राजेंद्र यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि ट्रम्प यांच्या कार्यक्षमता विभागाचे प्रमुख एलॉन मस्क यांच्या भूमिकेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. ट्रम्प आणि मस्क हे दोघेही डीईआय उपक्रमांचे विरोधक आहेत.
मार्चमध्ये ट्रम्प यांनी सर्व कार्यकारी शाखांमध्ये डीईआय कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा कार्यकारी आदेश जारी केला होता. त्यानंतर नासाने त्यांचा डीईआय कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला. डीईआय कार्यक्रम बंद झाल्यानंतर २०२४ मध्ये नीला राजेंद्र यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले होते. त्याचवेळी नासातील सुमारे ९०० डीईआय कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. कोण आहेत नीला राजेंद्र? त्यांना नोकरीवरून का काढण्यात आले? ट्रम्प यांच्या आदेशाचा परिणाम नासावर कसा झाला? जाणून घेऊयात.
‘डीईआय’ म्हणजे काय?
‘डीईआय’ म्हणजे ‘डायव्हर्सिटी, इक्वालिटी आणि इन्क्लुजन’ याचाच अर्थ विविधता, समानता आणि समावेश. ‘डीईआय’ हे अमेरिकेतील ६० वर्षे जुने धोरण आहे. सरकारी आणि बिगर-सरकारीही नोकऱ्या, संस्था, शैक्षणिक संस्था अशा ठिकाणी विविध पार्श्वभूमीतून आलेल्यांना सामावून घेण्यासाठी हे धोरण लागू करण्यात आले होते. ऐतिहासिकदृष्ट्या वंचित समुदायांविरुद्ध भेदभाव थांबवणे हा त्यामागील मुख्य हेतू होता.
नीला राजेंद्र कोण आहेत?
नीला राजेंद्र या ‘नासा’तील भारतीय वंशाच्या अधिकारी होत्या. त्यांनी नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमध्ये विविधता, समता आणि समावेश अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांनी महिला आणि अल्पसंख्याकांच्या भरती वाढवण्यावर केंद्रित असणाऱ्या ‘स्पेस वर्कफोर्स २०३०’ कार्यक्रमाला पाठिंबा दिला आहे आणि या कार्यक्रमात पुढाकारदेखील घेतला आहे. मुख्य म्हणजे ‘नासा’ची इच्छा नसतानादेखील त्यांना नीला राजेंद्र यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागला आहे.
ट्रम्प यांच्या ‘डीईआय’ कार्यक्रमांवर बंदी घालण्याच्या कार्यकारी आदेशानंतर नीला राजेंद्र यांना कामावरून काढले जाऊ नये म्हणून नासाने त्यांच्या भूमिकेचे नाव बदलले होते आणि नासामध्ये ‘टीम एक्सलन्स अँड एम्प्लॉई सक्सेस ऑफिस’च्या प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना नीला यांच्या नव्या भूमिकेची माहिती देताना सांगण्यात आले की, त्या ‘अॅफिनिटी ग्रुप्स’ची देखरेख करतील. उदाहरणार्थ, ‘ब्लॅक एक्सलन्स स्ट्रॅटेजिक टीम.’ नीला राजेंद्र यांनी आपल्या नवीन पदाबाबत माहिती देण्याकरिता त्यांचे लिंक्डइन प्रोफाइल अपडेट केले.
त्यांच्या प्रोफाइलमधील शीर्षकात डीईआय असा उल्लेख नसला तरी त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या पोस्ट स्पष्ट पाहायला मिळतात. मार्चच्या सुरुवातीपासून, राजेंद्र अजूनही नासातील प्रयोगशाळेत ब्लॅक एक्सलन्स स्ट्रॅटेजिक टीमचे नेतृत्व करत होत्या. परंतु, ‘डीईआय’वर कारवाई केल्यानंतरही त्यांना नोकरीवर ठेवण्यात आल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. यानंतरच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांना कामावरून कायमस्वरूपी काढण्यात आले. गेल्या आठवड्यात एका ईमेलमध्ये नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांना नोकरीवरून काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
ईमेलमध्ये असे लिहिण्यात आले की, नीला राजेंद्र आता जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत काम करणार नाहीत. या संस्थेसाठी त्यांनी कायमस्वरूपी दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि त्यांना शुभेच्छा देतो, ” असे डेली मेलच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. जेपीएलच्या संचालक लॉरी लेशिन यांनी लिहिले, पूर्वी नीला राजेंद्र यांच्या नेतृत्वाखालील टीम एक्सलन्स अँड एम्प्लॉई सक्सेस ऑफिस आता मानव संसाधन विभागाच्या अंतर्गत आणले जाणार आहे.
नासाचा डीईआय कार्यक्रम
सर्व संस्थांना त्यांचे डीईआय उपक्रम बंद करण्याचा आदेश दिल्यानंतर नासाने त्यांचा विविधता, समता, समावेशन आणि सुलभता (डीईआयए) कार्यक्रम बंद केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा हाती घेतली आणि त्याच्या काही तासांच्या नंतरच डीईआय कार्यक्रम मागे घेण्याच्या कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करण्यास सुरुवात केली. ‘डीईआय’ कार्यक्रम कट्टरपंथी, बेकायदा आणि भेदभावपूर्ण असल्याचे ट्रम्प यांचे ठाम मत आहे. या योजनेसाठी दरवर्षी अब्जावधी डॉलर खर्च केले जातात आणि ते वाया जातात असा त्यांचा दावा आहे.
‘डीईआय’चा लाभ घेऊन चालवल्या जाणाऱ्या संस्थांमधून कथित जागृती व डाव्या विचारसरणीचा प्रसार केला जातो असाही ट्रम्प यांचा आरोप आहे. अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क यांनीदेखील या कार्यक्रमाचे वर्णन वर्णभेद करणारा कार्यक्रम म्हणून केला. ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, नासा दरवर्षी या उपक्रमांवर सुमारे २२.४ दशलक्ष डॉलर्स खर्च करत होती. नासा एका दशकाहून अधिक काळ ‘डीईआय’ उपक्रम राबवित होती. २०१२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा याची सुरुवात केली. २०२२ पासून त्यांच्या ‘डीईआय’ निधीचा अधिकाधिक भाग पर्यावरणाशी संबंधित प्रकल्पांसाठी वापरला जात होता.
© IE Online Media Services (P) Ltd