“चीन, ‘न्यूजक्लिक’ हे वृत्तविषयक संकेतस्थळ आणि काँग्रेस पक्ष भारत विरोधी नाळेशी जोडलेले आहेत”, असा गंभीर आरोप भाजपा नेते आणि माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी (दि. ७ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत केला. अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या वृत्तपत्रातील एका लेखाचा संदर्भ देऊन ठाकूर यांनी काँग्रेसवर आरोप केला. न्यूजक्लिक या संकेतस्थळाला नेविल रॉय सिंघम यांच्याकडून होत असलेल्या निधी पुरवठ्याचा हवाला देताना “भारत विरोधी अजेंडा” उघडा पडला असून चीन, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यात घट्ट संबंध असल्याचेही ते म्हणाले. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा सभागृहात बोलत असताना आरोप केला की, न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखात संसदेचाही उल्लेख आढळतो. या लेखामुळे तुकडे तुकडे गँग आणि काही माध्यमांचा बुरखा फाटला असून केंद्र सरकारचा विरोध करण्यासाठी काँग्रेसला चीनकडून पैसे मिळत असल्याचा खळबळजनक आरोप दुबे यांनी केला. “त्यांना चिनी शक्ती आणि काही माध्यमांना हाताशी धरून भारताची विभागणी करायची आहे”, असे वक्तव्य दुबे यांनी करताच सभागृहात उपस्थित असलेल्या भाजपा खासदारांनी बाकं वाजवून त्यांना समर्थन दिले.
न्यूजक्लिक वृत्त संकेतस्थळाच्या बाबतीत असे आरोप का झाले? त्यांना निधी पुरवठा करणारे नेविल रॉय सिंघम वादात का अडकले आहेत? त्यांचा आणि चीनचा संबंध काय? तसेच भाजपाने काँग्रेसचा उल्लेख करून टीका का केली? या सर्व प्रश्नांचा घेतलेला हा आढावा….
न्यूयॉर्क टाइम्सने लेखात काय म्हटले?
तंत्रज्ञान क्षेत्रातील यूएसमधील मोठे व्यावसायिक नेविल रॉय सिंघम (Neville Roy Singham) हे त्यांच्या सामाजिक संस्थांच्या जाळ्यामार्फत जगभरात चिनी सरकारचा प्रचार करत असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या संशोधनात्मक लेखात म्हटले आहे. “मॅसॅच्युसेट्समधील धोरणकर्ते ते मॅनहॅटनमधील बैठकीची जागा, दक्षिण आफ्रिकेतील राजकीय पक्ष ते भारत आणि ब्राझीलमधील माध्यमे” असे अनेक दुवे आम्ही पडताळले आहेत. या माध्यमातून सिंघम हे लाखो डॉलर्सची मदत या संस्थांना करत असून त्याद्वारे चिनी सरकारची भलामण करण्यात येत आहे, असा दावा न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या लेखात केला आहे.
हे वाचा >> विश्लेषण: चीन, कोरियाच्या तुलनेत भारत मागे का? वाचा, स्वतंत्र भारताच्या राजकीय अर्थव्यवस्थेची कथा
महत्त्वाचे म्हणजे भारतीय वृत्तविषयक संकेतस्थळ ‘न्यूजक्लिक’ याचाही या लेखात उल्लेख आढळतो. एका उताऱ्यात म्हटले आहे की, सिंघम यांच्या कंपनीकडून नवी दिल्लीस्थित असलेल्या ‘न्यूजक्लिक’ या वृत्त संकेतस्थळाला निधी पुरवठा करण्यात आला, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे.
कोण आहेत नेविल रॉय सिंघम?
न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखाचा रोख हा तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक नेविल रॉय सिंघम यांच्यावर होता. १९५४ साली जन्मलेले नेविल सिंघम सॉफ्टवेअर कंपनी चालविणारे आणि मार्क्सवादी विचार असणारे व्यक्ती आहेत. त्यांनी १९८० साली ‘थॉटवर्क्स’ (ThoughtWorks) नावाची तंत्रज्ञान क्षेत्रातील सल्लागार कंपनी स्थापन केली. जगातील अनेक मोठ्या कंपन्यांना थॉटवर्क्सने सल्ला दिलेला आहे. थॉटवर्क्सच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या त्यांच्या क्लायंट्सच्या यादीवर नजर टाकली तर त्यामध्ये ऑस्ट्रेलियामधील एअरलाईन क्वांटास, जर्मन फार्मा कंपनी बेयर, रॉयटर्स न्यूज एजन्सी, रिटेल क्षेत्रातील मोठी कंपनी वॉलमार्ट आणि भारतातील एक्सिस बँकेचा समावेश होतो. सिंघम यांनी २०१७ साली एका खासगी इक्विटी फर्मला ‘थॉटवर्क्स’ची विक्री केली. हा व्यवहार ७८५ दशलक्ष डॉलर्सचा असल्याचे सांगितले जाते.
जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर उद्योगपतींप्रमाणे नेविल सिंघमदेखील स्वयंघोषित समाजवादी आहेत. तरुण काळापासून ते पुरोगामी आणि डाव्या चळवळींशी जोडले गेलेले होते. त्यांनी आपली राजकीय विचारधारा कधीही लपविली नाही. थॉटवर्क्समधील तंत्रज्ञान विभागाचे माजी संचालक मजदी हारूण (Majdi Haroun) यांनी सांगितले की, सिंघम यांनी मार्क्सवादी क्रांतिकारी ‘चे गवेरा’ यांच्याबद्दल त्यांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या, असेही लेखात म्हटले आहे.
‘न्यूजक्लिक’ आणि चीनशी संबंधांचा आरोप
न्यूयॉर्क टाइम्सने लेखात म्हटले की, सिंघम यांनी ‘न्यूजक्लिक’ या वृत्त संकेतस्थळाला निधी पुरवठा केला. मात्र, सिंघम आणि न्यूजक्लिक यांच्यात वित्तीय संबंध आल्याचा पुरावा दिलेला नाही. यात केवळ म्हटले की, चिनी सरकारच्या निर्णयांची माहिती पेरणारे लेखन या संकेतस्थळावर करण्यात येत आहे. यावेळी न्यूजक्लिकवरील एका व्हिडीओचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये चीनच्या ‘माओइस्ट क्रांतीची ७० वर्ष’ या संकल्पनेवर आधारित चीनचा क्रांतिकारी इतिहास भांडवलवाद आणि साम्राज्यवादी शोषण व आक्रमणाविरोधात जगभरातील कामगार वर्ग आणि सामान्य जनतेच्या संघर्षाला प्रेरणा देत असल्याचे म्हटले आहे.
‘न्यूजक्लिक’ची स्थापना २००९ साली झाली आहे. “एक स्वतंत्र माध्यम संस्था म्हणून अनेक वर्ष आमचे काम सुरू आहे. वर्षानुवर्षे समाजातील अनेक लोकांच्या चळवळी आणि संघर्षांना न्याय मिळवून देण्याचे आणि त्यांची माहिती जगासमोर आणण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न केले”, अशी माहिती न्यूजक्लिकच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
२०२१ साली ईडीने न्यूजक्लिकच्या कार्यालय आणि संचालकांच्या निवासस्थानी धाडी टाकल्या होत्या. द इंडियन एक्सप्रेसने त्यावेळी दिलेल्या माहितीनुसार, ३०.५१ कोटी रुपयांच्या परकीय निधीची चौकशी धाडीदरम्यान करण्यात आली. त्यावेळी केलेल्या तपासात न्यूयॉर्क टाइम्सने उल्लेख केलेल्या देणगीदार संस्था, सिंघम आणि चीनशी असलेले संबंध यांचा तपास करण्यात आला.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी २०२१ साली द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, न्यूजक्लिकला “जस्टिक अँड एज्युकेशन फंड आयनसी” या संस्थेकडून १९.७६ कोटींचा निधी मिळाला होता. सिंघमच्या सामाजिक संस्थांपैकी ही एक संस्था असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे.
हे वाचा >> न्यूयॉर्कमध्ये चीनच्या गुप्त पोलीस चौकीचा भांडाफोड; जगभरात चीनने १०० गुप्त पोलीस चौक्या का उभारल्या?
चिनी सरकार आणि ‘सीसीपी’शी संबंध?
सिंघम हे आता शांघायच्या बाहेर असून उघडपणे सीसीपी अर्थात चायनीज कम्युनिस्ट पार्टीचे समर्थन करतात. मागच्याच महिन्यात सिंघम यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या एका शिबिरात उपस्थिती लावली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर पक्षाचा विस्तार करण्यासंबंधी हे शिबीर आयोजित केले होते.
सिंघम यांनी मात्र सीसीपी आणि चिनी सरकारशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे. माझे विचार आणि कृती ही माझ्या वैयक्तिक विश्वासावर आधारित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण, न्यूयॉर्क टाइम्सच्या तपासानुसार सिंघम आणि चीनच्या प्रचार यंत्रणेतील रेषा ‘धूसर’ आहे. सिंघम यांनी माकू ग्रुपसोबत शांघायमध्ये कार्यालय उघडले आहे. चीनने जागतिक पातळीवर जो चमत्कार घडवून आणला आहे, त्याबद्दल परदेशातील नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी मोकू ग्रुप काम करतो. सिंघम यांनी या ग्रुपला १.८ दशलक्ष डॉलर्सचा निधी देणगी स्वरूपात दिला आहे.
चीनधार्जिणे विचार जगभरातील प्रभावकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यासाठी स्वतंत्र मजकूर तयार करणे यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या एकत्रित प्रयत्नांतून सिंघम यांचे नाव पुढे आले, अशीही माहिती न्यूयॉर्क टाइम्सने दिली आहे. “सिंघम यांचा ग्रुप युट्यूबवर व्हिडीओ तयार करतो, ज्याला लाखो व्ह्यूज मिळत आहेत. तसेच जगभरातील राजकीय पक्षातील पुढाऱ्यांना हेरण्याचे कामही केले जाते. या माध्यमातून चीन सरकारच्या काही कृत्यांना जगभरातून एका सुरात नैसर्गिकरित्या पाठिंबा मिळवण्याचे काम केले जाते”, असेही या लेखात नमूद केले आहे.
सिंघम यांच्या संस्था-कंपन्यांचे जाळे कसे काम करते?
यूएसमध्ये नोंदणी केलेल्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून चीनच्या हेतूंना पुढे नेण्याचे काम सिंघम यांच्याकडून केले जात आहे, असाही आरोप लेखात करण्यात आला आहे. लेखामध्ये सिंघम यांच्या चार संस्थांच्या संशयास्पद अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. “युनायटेड कम्युनिटी फंड”, “जस्टीस अँड एज्युकेशन फंड” या दोन संस्थांचे जगभरात कुठेही प्रत्यक्ष काम नाही. इलिनॉय, विस्कॉन्सिन आणि न्यूयॉर्क या शहरांमध्ये यूपीएस स्टोअर मेलबॉक्सशिवाय (टपाल प्राप्त करण्यासाठी विकत घेतलेली जागा) बाकी कुठेही या संस्थांचा थांगपत्ता नाही, असे न्यूयॉर्क टाइम्सला आढळले.
यूएसमधील कायद्यामुळे सामाजिक संस्थांना देणगी देणाऱ्यांची नावे उघड करता येत नाहीत. या कायद्याच्या माध्यमातून या संस्थांवर लक्षणीय नियंत्रण ठेवत असतानाच दुसऱ्या बाजूला सिंघम यांना गुप्तपणे काम करता येत आहे, असाही आरोप करण्यात आला आहे. तर इतर दोन संस्थांपैकी एक संस्था सिंघम यांच्या पत्नी जोडी इव्हान्स (Jodie Evans) चालवितात; तर चौथी कंपनी थॉटवर्क्सच्या एका माजी कर्मचाऱ्यामार्फत चालविली जाते.
या सामाजिक संस्थांच्य माध्यमातून जगभरात लाखो डॉलर्सचा निधी वितरीत करण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेतील राजकीय पक्ष, अमेरिकेतील युट्यूब चॅनेल्स, भारतातील वृत्त संकेतस्थळ, आफ्रिकेतील सामाजिक संस्थांना निधी पाठविला जातो, असे न्यूयॉर्क टाइम्सच्या तपासातून कळले. सिंघम यांचा पैसा प्रत्येक संस्थेत आढळून आला आहे, ज्या लाभार्थी संस्था आहेत. या जाळ्यामध्ये सहभागी असलेल्या इतर कंपन्या किंवा संस्था एकमेकांशी समन्वय राखतात आणि संसाधनाचाही वापर करतात, असे निदर्शनास आले आहे.
पण या संस्था नेमके काय करतात?
सिंघम यांच्या संस्था नेमके काय करतात, याबाबत न्यूयॉर्क टाइम्सने आफ्रिकेचे उदाहरण दिले आहे. चीन हा सध्या आफ्रिकेत ढवळाढवळ करणारा सर्वात मोठा परकीय देश आहे. पाश्चिमात्य देशांनाही मागे टाकून अलीकडच्या काळात चीनने आफ्रिकेत अनेक संसाधनांची निर्मिती केली आहे. टीकाकारांच्या मते चीनची ही परोपकारी वृत्ती अनेकदा प्रतिकूल अटी-शर्ती घेऊन येत असते.
सिंघम यांच्याशी संबंधित असलेल्या ‘पिपल्स सपोर्ट फाऊंडेशन’ या संस्थेने आफ्रिकेतील कार्यकर्ते आणि राजकीय पुढारी यांना सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी साडे चार लाख डॉलर्सचा निधी पुरवठा केला. या निधीच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये चीनधार्जिणे विचार पेरण्यात आले. नुकतेच एक सत्र संपन्न झाले, ज्यामध्ये वाटण्यात आलेल्या पत्रकात म्हटले की, यूएसने चीनविरोधात संकरित युद्ध (hybrid war) सुरू केले आहे. हाँगकाँग, तैवान आणि शिनजियांग प्रांतात विगुर (उग्युर – Uyghur) मुस्लिमांना निर्वासित शिबिरात ठेवल्याची चुकीची माहिती पसरविण्यात येते, असेही या पत्रकात म्हटले गेले. तसेच चीनकडून मिळणाऱ्या कर्जाचीही प्रशंसा करण्यात आली होती. “चीनच्या कर्जामुळे आफ्रिकन देशांकडे संधी चालून आली आहे, यामुळे वास्तविक आणि सार्वभौम आणि विकास प्रकल्प उभे राहत आहेत.”
सिंघम यांनी माध्यम स्टार्टअप ‘न्यू फ्रेम’ (New Frame) या वृत्त संकेतस्थळालाही निधी पुरवठा केलेला आहे. न्यू फ्रेमच्या माध्यमातून निर्विवादपणे चीनचे समर्थन करणारा मजकूर लिहिला जात होता. जून २०२२ साली संपादक डार्यल एकॉन यांनी फ्रेमधून चीन आणि रशियाला अनुकूल असे वार्तांकन केले जात असल्याचा आरोप करून न्यू फ्रेमचा राजीनामा दिला होता.