संतोष प्रधान
मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर पक्षातून आणखी कोण बाहेर पडणार याचीच चर्चा सुरू झाली. पक्षातील काही नेते नाराज असून, तेसुद्धा बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. ज्योतिरादित्य यांच्याप्रमाणेच काही तरुण नेते वेगळा मार्ग पत्करतील, अशी शक्यता व्यक्त केली जाते. शिंदे यांच्याप्रमाणेच हिंदी पट्टीतील तीन तरुण नेते नाराज असून, हे नेते पक्षातून बाहेर पडण्याकरिता संधीची वाट पाहात असल्याचे ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात नमूद करण्यात आले.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला गेल्या वर्षी सत्ता मिळाली. तेव्हा मुख्यमंत्रीपदाकरिता ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट या दोन तरुण नेत्यांच्या नावांची चर्चा होती. मध्य प्रदेशमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून कमलनाथ यांनी पक्षाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजाविली होती. निवडणुकीत खर्चाचा भार कमलनाथ यांनी उचलला होता. परिणामी कमलनाथ हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरले. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पाठीशी तेव्हा आमदारांचे पाठबळही तेवढे नव्हते. राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्याचाचा दौरा करून यश मिळवून दिले होते. मुख्यमंत्रीपदाचे ते प्रबळ दावेदार असताना, राहुल गांधी यांचे विश्वाासू अशोक गेहलोत यांनी बाजी मारली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणेच सचिन पायलट हे वेगळी वाट पत्करतील का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मुख्यमंत्रीपद नाकारल्याने पायलट यांची नाराजी लपून राहिलेली नाही.
तरुण तुर्क विरुद्ध जुने हा वाद
काँग्रेसमध्ये तरुण विरुद्ध जुने असा वाद सातत्याने बघायला मिळतो. जुन्याजाणत्या नेत्यांना हंगामी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या महत्त्व देतात व ही बाब राहुल गांधी यांना पसंत नसते. छत्तीसगडमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीकरिता ९२ वर्षीय मोतीलाल व्होरा हे पुन्हा इच्छूक आहेत. चालताना धापा टाकणारे व्होरा हे पक्षासाठी काय उपयोगाचे हा प्रश्न उपस्थित केला जातो. काँग्रेसमध्ये निष्ठेला फळ दिले जाते. पण हे करताना पक्षाला त्याचा किती फायदा याचा विचार होत नाही, अशी खंत एका नेत्याने बोलून दाखविली.
गेल्या काही वर्षांत काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांची यादी
एस. एम. कृष्णा, विजय बहुगुणा, अजित जोगी, गिरीधर गमांगो, जयंती नटराजन, किशोरचंद्र देव, जी. के. वासन, बेनीप्रसाद वर्मा, हिमत्ना बिश्वा सरमा, प्रेम खांडू, सुदीप बर्मन, एन. बिरेंद्र सिंग, रिटा बहुगुणा जोशी, अशोक तन्वर, सत्यनारायणन, नारायण राणे, भूबनस्वर कलिता, अशोक चौधरी, विश्वाजीत राणे अशा अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली. आंध्र प्रदेशमधील बहुसंख्य नेत्यांनी तेलुगू देशम अथवा वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
नाराजांची संख्या का वाढली ?
काँग्रेस पक्ष गेली सहा वर्षे केंद्रातील सत्तेबाहेर आहे. लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये पक्षाचा पार धुव्वा उडाला. या पराभवातून काँग्रेस पक्ष अद्याप काही शिकलेला दिसत नाही. दरबारी राजकारण अद्यापही सुरूच आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. २०१४ आणि २०१९च्या लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये फटका बसल्याने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला भवितव्य नाही, असा पक्षातील नेतेमंडळींचा समज झाला. नव्या नेतृत्वाकडे जबाबदारी सोपविली जात नाही. गांधी घराण्याबाहेर पक्षाचे नेतृत्व गेल्यास पक्षावर वचक राहणार नाही, अशी शक्यता वर्तविली जाते. गांधी घराण्याचा पूर्वीसारखा पक्षात वचकही राहिलेला नाही. भविष्यात पक्ष उभारी घेण्याबाबत साशंक असलेले नेते अन्य मार्ग पत्करू लागलेले दिसतात. सध्या भाजपची चलती असल्याने या नेत्यांना भाजपचे आकर्षण असते. काँग्रेस नेते सत्तेविना राहू शकत नाहीत, हे बोलले जाते हेच खरे.