Who is Nikhil Kamath: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिला पॉडकास्ट करणारे निखिल कामथ चर्चेत आहेत. ‘People By WTF’ मध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधान मोदींनी या मुलाखतीदरम्यान अनेक हलक्या फुलक्या मुद्द्यांवर भाष्य केलं. निखिल कामथ यांनी या पॉडकास्टचा टिझर एक्स वर पोस्ट केला होता. आता निखिल कामथ कोण आहेत हे आपण जाणून घेऊ.
निखिल कामथ कोण आहेत?
निखिल कामथ हे ऑनलाईन ब्रोकिंग फर्म जीरोधाचे सह-संस्थापक आहेत. तसंच फोर्ब्स २०२४ च्या अब्जाधीशांच्या यादीत आलेल्या माहितीप्रमाणे कामथ यांची संपत्ती, ३.१ अरब डॉलर इतकी आहे.
निखिल कामथ यांची सुरुवात कॉल सेंटरच्या एका नोकरीपासून
निखिल कामथ यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एका कॉल सेंटरच्या नोकरीपासून केली होती. त्यानंतर त्यांनी सह व्यवसाय म्हणून शेअर बाजारात ट्रेंडिंग करण्यास सुरुवात केली. २००६ च्या दरम्यान निखिल कामथ हे सब-ब्रोकर म्हणून काम करु लागले. त्यांनी त्यांचे बंधू नितीन कामथ यांच्यासह ब्रोकिंग फर्म झीरोधाची स्थापना केली.
जीरोधा ब्रोकिंग फर्म देशभरात चर्चेत
झीरोधा या ब्रोकिंग फर्मने त्यांचं जे ब्रोकरेज मॉडेल आणलं त्यानंतर भारताच्या शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडल्याचं दिसून आलं. या मॉडेलमुळे गुंतवणूकदार, ट्रेडर्स यांना पारंपरिक ब्रोकर्स यांना जेवढं ब्रोकरेज द्यावं लागत असे त्यापेक्षा कमी ब्रोकरेजमध्येही हे सगळं घडू शकतं हे दाखवून दिलं. बंगळुरुमधल्या झीरोधा कंपनीचे १ कोटी ग्राहक आहेत त्यामुळे ही देशातली सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म आहे.
मार्च २०२३ मध्ये सुरु केलं पॉडकास्ट
मार्च २०२३ मध्ये निखिल कामथ यांनी WTF Is With Nikhil Kamath या नावाने आणि नंतर पिपल बाय डब्ल्यूटीएफ या नावाने पॉडकास्ट करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी स्टार्टअप, रिटेल, ई कॉमर्स, फिनटेक या विषयांवर सुमारे २६ दिग्गजांसह व्हिडीओ तयार केले आहेत. यामध्ये किरण मजमूदार शॉ, रितेश अग्रवाल, रॉनी स्क्रूवाला, सुनील शेट्टी आदिंच्या पॉडकास्टचा समावेश आहे. सध्या निखिल कामथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच्या पॉडकास्टमुळे चर्चेत आहेत. या एपिसोडचा एक टिझर चर्चेत आला होता. यात निखिल कामथ म्हणतात मी तुमच्यासमोर बसून काहीसा नर्व्हस आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना म्हणतात की मला खात्री आहे की हा पॉडकास्ट करुन तुम्हालाही माझ्याप्रमाणे आनंद होईल. त्यांनी पोस्ट केलेला हा टिझरही व्हायरल झाला होता. तसंच या पॉडकास्टमधली नरेंद्र मोदी यांची मुलाखतही चर्चेत आली आहे.