दहा अब्ज डॉलर्सच्या टेक फर्म ‘रिपलिंग’चे सह-संस्थापक प्रसन्ना शंकर सध्या चर्चेत आले आहेत. प्रसन्ना पत्नी दिव्या शशिधरबरोबर कायदेशीर संघर्षात अडकले आहेत. घटस्फोटाच्या वादापासून सुरू झालेला हा वाद आता मुलांचे अपहरण, पोलिसांचा छळ आणि अगदी खंडणीच्या आरोपांपर्यंत येऊन पोहोचला आहे. घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यासाठी सध्या भारतात असणाऱ्या प्रसन्ना शंकर यांनी ‘एक्स’वर आपली बाजू मांडली. त्यांनी दावा केला की, त्यांना खोट्या तक्रारीच्या आधारे त्रास दिला जात आहे. पत्नीने त्यांच्यावर मुलाचे अपहरण केल्याचा आरोप केला. तो आरोपदेखील त्यांनी फेटाळून लावला. चेन्नईचे पोलीस त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, प्रसन्ना शंकर नक्की कोण आहेत? चर्चेत असलेले हे प्रकरण काय? त्यांच्यावर कोणते आरोप ठेवण्यात आले आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.
प्रसन्ना शंकर कोण आहेत?
प्रसन्ना शंकर (प्रसन्ना शंकरनारायणन) हे सिंगापूरमध्ये स्थायिक असलेले एक भारतीय उद्योजक आहेत. प्रसन्ना शंकर हे १० अब्ज डॉलर्स किमतीच्या वर्कफोर्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर कंपनी रिपलिंगचे सह-संस्थापक आहेत. त्यांचा जन्म चेन्नई येथे झाला आहे. टेक उद्योगात त्यांनी आपली प्रतिष्ठा निर्माण केली आहे. त्यांनी तिरुचिरापल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी त्रिची)मधून कॉम्प्युटर सायन्स विषयात पदवी मिळवली. इथेच त्यांची त्यांच्या पत्नीशी भेट झाली. या जोडप्याच्या लग्नाला १० वर्षे झाली आणि त्यांना नऊ वर्षांचा मुलगा आहे.
अमेरिकन उद्योजक पार्कर कॉनराडबरोबर रिपलिंग कंपनी सुरू करण्यापूर्वी शंकर यांनी अनेक टॉप टेक कंपन्यांमध्ये काम केले आहे. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात २००६ मध्ये झाली. गूगलमध्ये त्यांनी इंटर्नशिप केली आणि त्यानंतर त्यांनी मायक्रोसॉफ्ट कॅनडामध्ये काम केले. “मी खूप प्रोग्रामिंग स्पर्धा करायचो. कॉलेजमध्ये असताना मी टॉप कोडरमध्ये भारतात पहिल्या क्रमांकावर होतो,” असे त्यांनी त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवर म्हटले आहे. त्यांच्या लिंक्डइनवरील प्रोफाइलनुसार, त्यांनी ‘लाईकअलिटल’ या कॅम्पस सोशल नेटवर्कची सह-स्थापनादेखील केली. त्या ठिकाणी ते मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) म्हणून कार्यरत होते. जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी क्रिप्टो वापरकर्त्यांसाठी सोशल नेटवर्क ‘०xPPL’ची स्थापना केली.

प्रसन्ना शंकर यांनी कोणते आरोप केले?
‘एक्स’वरील त्यांच्या पोस्टमध्ये प्रसन्ना शंकर यांनी आरोप केला की, त्यांची पत्नी दिव्या शशिधर हिचे विवाहबाह्य संबंध होते. “आमच्या लग्नाला १० वर्षे झाली आणि आम्हाला नऊ वर्षांचा मुलगा आहे. तिचे अनूप नावाच्या व्यक्तीबरोबर सहापेक्षा अधिक महिन्यांपासून प्रेमसंबंध असल्याचे मला कळल्यानंतर आमचे लग्न तुटले,” असे त्यांनी लिहिले. शंकर यांनी दावा केला की, त्यांना संबंधित पुरुषाच्या जोडीदाराकडून प्रेमसंबंधाचे पुरावे मिळाले आहेत, ज्यात मेसेजेस आणि हॉटेल बुकिंग रेकॉर्डचा समावेश आहे.
“त्यानंतर आम्ही घटस्फोटाचा भाग म्हणून तिला पोटगी स्वरूपात किती दशलक्ष डॉलर्स द्यावे या अटींवर चर्चा करीत होतो. ती नाराज होती. तिनं माझ्याविरुद्ध बनावट पोलिस तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्यावर मारहाण केल्याचा आरोप केला,” असे त्यांनी सांगितले. “तिनं आणखी खोट्या तक्रारी केल्या की, मी तिच्यावर बलात्कार केला. मी तिचे नग्न व्हिडीओ प्रसारित केले. सिंगापूर पोलिसांनी या आरोपांची चौकशी केली आहे आणि ते आरोप निराधार असल्याचे आढळले आहे आणि मला सर्व आरोपांमधून मुक्त केले गेले आहे,” असेही त्यांनी पुढे सांगितले.
शंकर यांचा दावा आहे की, जेव्हा ते भारतात घटस्फोटासाठी अर्ज करीत होते, तेव्हा दिव्याने घटस्फोटासाठी आणखी पोटगीची मागणी केली आणि अमेरिकेत तिचा अर्ज दाखल केला. त्यांनी पुढे असाही आरोप केला की, तिनं तिचा खटला मजबूत करण्यासाठी त्यांच्या मुलाचे अमेरिकेत अपहरण केले. त्यामुळे शंकर यांनी आंतरराष्ट्रीय बाल अपहरणाचा खटला दाखल केला. अमेरिकेतील एका न्यायालयानं त्यांच्या बाजूनं निकाल दिला; ज्यामुळे दोघांमध्ये सामंजस्य करार (एमओयू) झाला. “तिनं सिंगापूरमधील कायद्यांचं उल्लंघन केलं असल्यानं, तिनं माझ्याशी आमच्या गावी चेन्नईला येऊन स्थायिक होण्याचा प्रयत्न केला. आम्ही एक सामंजस्य करार केला. त्यानुसार, मी तिला महिन्याला सुमारे नऊ कोटी ४.३ लाख देईन,” असे ठरवण्यात आल्याचे शंकर यांनी सांगितले.
परंतु, त्यांनी दावा केला की, दिव्या नंतर करारातून माघार घेतात. “ती आता असा दावा करते की, हा सामंजस्य करार वैध नाही आणि तिला आणखी काही हवं आहे आणि घटस्फोटासाठी ती पुन्हा अमेरिकेत जाईल,” असे ते म्हणाले. शंकर यांनी कराराची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली तेव्हा त्यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीनं त्यांच्यावर त्यांच्या मुलाचं अपहरण केल्याचा आरोप केला. त्यांनी आरोप केला की, रात्री उशिरा पोलिस त्यांच्या हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीनं अटक करण्यापासून वाचण्यासाठी त्यांना त्यांच्या मुलासह पळून जाण्यास भाग पाडलं.
शंकर यांनी सांगितले की, त्यांनी त्यांचा मुलगा सुरक्षित आहे आणि प्रकरण कायदेशीररीत्या हाताळले जात आहे याचा पुरावा दिला आहे. तरीही त्यांनी दावा केला की, अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवला आणि त्यांच्या कुटुंबावर व मित्रांवर दबाव आणत २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. शंकर यांनी, चेन्नई पोलिसांनी त्यांचे मित्र गोकुळ यांच्या बंगळुरू येथील घरावर वॉरंटशिवाय छापा टाकला आणि त्याला चेन्नईमध्ये ताब्यात घेतल्याचा आरोपही केला. त्याशिवाय त्यांनी असा आरोप केला की, पोलीस त्यांच्यावर बेकायदा पद्धतीनं नजर ठेवत होते. शंकर यांनी आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. “सोमवारी मी न्यायालयात ‘मला त्रास देऊ नका’ अशा विषयाचा अर्ज दाखल करणार आहे आणि न्यायालयीन यंत्रणेद्वारे प्रकरणे हाताळणार आहे. दरम्यान, माझे संपूर्ण कुटुंब राज्याबाहेर आहे,” असेही ते म्हणाले.
पत्नी दिव्याचे आरोप काय?
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, दिव्याने शंकर यांच्यावर चुकीचा आरोप करीत तक्रार दाखल केली, ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला की, त्यांच्या मुलाला गोकुळा कृष्णन नावाचा माणूस तिच्याकडून घेऊन गेला आणि त्यानंतर तो परत आला नाही. “माझ्या मुलाचे काय झाले हे मला माहीत नव्हते आणि म्हणूनच मी पोलिसांत तक्रार दाखल केली,” असे ती म्हणाली. ती आणि तिचा मुलगा दोघेही अमेरिकन नागरिक असल्याचा दावा दिव्याने केला आहे. ती म्हणाली की, या महिन्याच्या सुरुवातीला भारतात परतल्यानंतर शंकरने त्यांचे मूल तिच्यापासून हिरावून घेतले. “आम्ही भारतात परतलो आणि मला वाटले की, आता मी आणि माझा मुलगा शांततेत जगू शकतो; परंतु तो तेही करू देत नाही,” असे तिने सांगितले.
तिने शंकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोपही केला आणि असा दावा केला की, त्याने कर चुकवण्यासाठी त्यांच्या वैवाहिक मालमत्ता त्याच्या वडिलांच्या नावावर हस्तांतरित केल्या. दिव्याच्या म्हणण्यानुसार, शंकरच्या वडिलांनी नंतर ही मालमत्ता थायलंडमधील त्याच्या भावाकडे हस्तांतरित केली. “त्याच्या वडिलांनी भारतातील कर चुकवून मालमत्ता थायलंडमधील त्याचा भाऊ विद्यासागरकडे हस्तांतरित केली आणि त्याचे काय झाले हे मला माहीत नाही,” असे तिने सांगितले.
तिने पुढे असा दावा केला की, तिला या कथित कर उल्लंघनांची तक्रार अमेरिकन अधिकाऱ्यांना करण्यापासून रोखण्यासाठी कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आले. “त्यांनी धमकी दिली व माझी स्वाक्षरी घेतली आणि मी या कर गुन्ह्याबद्दल तक्रार करू नये, असे सांगितले. त्यानंतर आम्ही भारतात परतलो आणि शांततेत जगण्याचा विचार केला; परंतु तो तेही करू देत नाही,” असे ती म्हणाली.
गंभीर आरोप करत दिव्याने शंकर यांना ‘सेक्स प्रीडेटर’ म्हटले. त्याने गुप्तपणे महिलांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले, असा आरोप केला. त्यासाठी त्याला सिंगापूरमध्ये अटक करण्यात आली होती आणि नंतर जामिनावर सोडण्यात आले होते, असेही तिने सांगितले. तिने असाही आरोप केला आहे की, त्याला एका स्टिंग ऑपरेशनमध्ये वेश्या व्यवसायासाठी पकडण्यात आले होते; ज्यामुळे त्याला त्याच्या कंपनीतून काढून टाकण्यात आले.