बुधवारी (२४ जानेवारी) सकाळी कट्टरपंथी मैतेई गटाच्या नेत्यांना भेटण्यासाठी मणिपूरमधील मैतेईचे जवळपास सर्व आमदार तसेच राज्याचे प्रतिनिधीत्व करणारे लोकसभा आणि राज्यसभा खासदार सकाळी इंफाळच्या कांगला किल्ल्यावर आले.

अरामबाई तेंगगोल गटाने “सकाळी १० वाजता कांगला येथे जिल्ह्यांतील सर्व मंत्री आणि आमदारांना ‘समन्स’ बजावल्यानंतर हा बदल झाला, असे इंफाळ पश्चिम पोलिस अधीक्षक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सभा सुरू होण्यापूर्वी मैतेई गटातील हजारो स्वयंसेवक इंफाळमध्ये जमले होते. निवडून आलेले प्रतिनिधी सकाळी साडेनऊच्या सुमारास कांगला येथे पोहोचू लागले. सकाळी अकराच्या सुमारास बैठक संपन्न झाली.

कोण आहे अरामबाई तेंगगोल गट? ही सभा घेण्यामागे कारण काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरामबाई तेंगगोल गटाची २०२० मध्ये एक सांस्कृतिक गट म्हणून स्थापना झाली. परंतु, लवकरच हा गट एका कट्टरपंथी संघटनेत बदलला. मे २०२३ मध्ये मोठ्या संख्येने झालेल्या मैतेई-कुकी संघर्षांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या दोन कट्टर मैतेई संघटनांपैकी ही एक आहे, तर दुसऱ्या गटाचे नाव मैतेई लिपुन असे आहे.

दोन्ही मैतेई गटांनी या संघर्षात शस्त्रांचा वापर करण्यास सुरुवात केली. संघर्षाच्या काळात त्यांची सदस्यसंख्या झपाट्याने वाढली, अशी माहिती सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. त्यांच्यावर कुकी गट आणि सुरक्षा आस्थापनांनी हिंसाचारात प्रमुख भूमिका बजावल्याचाही आरोप केला.

अरामबाई तेंगगोल या गटावर नागा समुदयाच्या लोकांनाही लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. जसे, गेल्या वर्षी जूनमध्ये इम्फाळ पूर्व जिल्ह्यात एका ५७ वर्षीय नागा महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, असे अनेक आरोप अरामबाई तेंगगोल गटावर होत आले आहेत.

जून २०२३ मध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरला भेट देण्यापूर्वी आसाम रायफल्सच्या तुकडीसोबत झालेल्या चकमकीत या संघटनेचा सहभाग असल्याचा संशय होता.

अरामबाई तेंगगोल गटाने मणिपूरच्या राजकीय प्रतिनिधींना का बोलावले?

अरामबाई तेंगगोल गटाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले. या मागण्यांमध्ये अनुसूचित जमातींच्या यादीतून कुकींना वगळणे, शरणार्थींना मिझोराममधील छावण्यांमधून हद्दपार करणे, सीमेवर कूंपण घालणे, आसाम रायफल्सची अन्य निमलष्करी दलांसोबत बदली करणे; यासह केंद्र आणि कुकी दहशतवादी गटांमधील ऑपरेशन्स करार रद्द करणे यांचा समावेश आहे.

हेही वाचा : मणिपूर हिंसाचार : कुकी आणि मैतेई हे समाज नेमके कोण आहेत ?

शपथ घेतल्यानंतर बैठक संपल्याचे घटनास्थळी उपस्थितांनी सांगितले. त्यानंतर, अरामबाई तेंगगोल नेते कोरुंगनबा खुमान यांनी खवैरामबंद इमा मार्केट येथे एका मेळाव्याला संबोधित केले. या बैठकीस उपस्थित नसलेले मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्यासह काही प्रतिनिधींना मागण्यांवर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या मागण्या लवकरात लवकर कृतीत आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकावा, असे सांगण्यात आल्याचे या मेळाव्यात त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीने अरामबाई तेंगगोल गटाची ताकद दर्शविली आहे.

Story img Loader