पाकिस्तानातील इतिहासात पहिल्यांदा पोलीस सेवेत एक हिंदू अधिकारी रुजू झाला आहे. राजेंद्र मेघवार यांनी पाकिस्तान पोलिस दलातील पहिले हिंदू अधिकारी होत नवीन पायंडा पाडला आहे. ‘पाकिस्तान टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, मेघवार यांनी शुक्रवारी देशातील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या फैसलाबादमध्ये सहायक पोलीस अधीक्षक (एएसपी) म्हणून आपली भूमिका स्वीकारली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना पाकिस्तानमधील एका हिंदू नेत्याने याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट केले की, अल्पसंख्याक हिंदूंना देशात अनेकदा भेदभावाचा सामना करावा लागतो, मेघवार यांची पाकिस्तान पोलीस सेवा (पीपीएस)मधील नियुक्ती समुदायाच्या समस्यांचे निराकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. कोण आहेत राजेंद्र मेघवार? जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहेत पाकिस्तानातील पहिले हिंदू पोलीस अधिकारी?

राजेंद्र मेघवार हे सिंध प्रांतातील बदीन या ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या वंचित भागातील आहेत. त्यांनी या वर्षी नागरी सेवा परीक्षा (सीएसएस) यशस्वीपणे उत्तीर्ण करून पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले. मेघवार यांनी आपले स्वप्न पूर्ण केल्याचा अपार अभिमान व्यक्त केला. केवळ आपल्या हिंदू समुदायाचीच नव्हे, तर पाकिस्तानातील इतर अल्पसंख्याक गटांचीही सेवा करणे आणि महत्त्वपूर्ण प्रभाव निर्माण करणे हे त्यांचे ध्येय आहे. “पोलिसांत राहिल्याने आम्हाला थेट लोकांच्या समस्या सोडवता येतात, जे आम्ही इतर विभागांमध्ये करू शकत नाही,” असे मेघवार यांनी ‘जिओ न्यूज’ला सांगितले. इस्लामिक प्रजासत्ताक असलेला पाकिस्तान हा जगातील पाचवा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. २०२३ च्या जनगणनेनुसार, हिंदू हा सर्वांत मोठा अल्पसंख्याक गट आहे, जो देशाच्या २४० दशलक्ष (२४ कोटी) लोकसंख्येपैकी दोन टक्के आहे.

हेही वाचा : ‘Nomura’ कंपनीच्या सीईओने केली स्वतःच्या पगारात कपात; कारण काय? ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची कारणं काय?

मेघवाल यांच्या नियुक्तीकडे पाकिस्तानी पोलिस दलाने सकारात्मक घडामोड म्हणूनही पाहिले आहे. त्यांनी सांगितले की, पंजाब पोलिसांच्या स्थापनेनंतर फैसलाबादमध्ये इतक्या महत्त्वाच्या पदावर हिंदू अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. “आम्ही भाग्यवान आहोत. हिंदू अधिकाऱ्याच्या समावेशामुळे पोलिसांमधील सर्वसमावेशकतेला चालना मिळेल,” असे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तान हिंदू मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधित्व करणारे कृष्ण शर्मा यांनी या नियुक्तीचे महत्त्व सांगून ‘टाइम्स ऑफ इंडिया’समोर आपले विचार मांडले. त्यांनी नमूद केले की, देशाच्या पोलीस दलात हिंदू निरीक्षक आणि उपनिरीक्षक आहेत; परंतु अधिकारी नाहीत. “त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याने समाजाला त्यांचा अभिमान आहे,” असे शर्मा म्हणाले. त्यांची ही कामगिरी समाजातील इतर तरुणांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची प्रेरणा देईल, असेही ते म्हणाले.

इतर उल्लेखनीय घडामोडींमध्ये, रूप मती मेघवार, पूजा ओड, सुनील मेघवार, जीवन रिबारी व भीशम मेघवार या पाच हिंदू विद्यार्थ्यांनीही पाकिस्तानमधील प्रशासकीय आणि नोकरशाहीच्या पदांवर यशस्वीरीत्या सीएसएस परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ‘पाकिस्तान टुडे’च्या वृत्तानुसार, रहीम यार खान येथील रहिवासी रूप मती यांचे परराष्ट्र मंत्रालयात सामील होण्याचे उद्दिष्ट आहे, जिथे त्यांना जागतिक स्तरावर पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा वाढवेल, अशी आशा आहे. यावर कृष्ण शर्मा म्हणाले, “त्यांचे यश हे केवळ वैयक्तिक विजय नाही, तर प्रतिकूलतेच्या विरोधात दृढनिश्चयाचे एक उदाहरण आहे.

हेही वाचा : दुबईचा व्हिसा मिळवताना भारतीय पर्यटकांना अडचणी का येत आहेत? काय आहेत नवे नियम?

मर्यादित संसाधने आणि सुविधा असूनही, या तरुण हिंदू विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे की, दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकतात. २०२२ मध्ये राजा राजिंदरने सीएसएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एएसपी होत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला होता. त्यांच्या मूळ गावी बदीनमध्ये मूलभूत सुविधा नसतानाही या २२ वर्षीय तरुणाने लाहोरमध्ये एक वर्ष तयारी केली आणि पाकिस्तानच्या नागरी सेवेतील सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेली परीक्षा उत्तीर्ण होऊन दाखवले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is rajender meghwar pakistan first hindu cop rac