नेपाळ काँग्रेसचे रामचंद्र पौडेल यांची गुरुवारी (९ फेब्रुवारी) देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. एकीकडे नेपाळमध्ये पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’यांच्या नेतृत्वाखालील कमकुवत आघाडी सत्तेवर आहे. याच कारणामुळे येथे राजकीय अस्थैर्य वाढत असताना दुसरीकडे पौडेल यांच्याकडे राष्ट्रपतीपदाची धुरा आली आहे. याच पार्श्वभूमीवर पौडेल कोण आहेत? त्यांची आतापर्यंतची कारकीर्द कशी आहे? यावर नजर टाकू या.
पौडेल यांनी केला प्रतिस्पर्धी सुभाषचंद्र नेबमांग यांचा पराभव
नेपाळमधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या ८८२ होती. यातील ३३२ मते प्रांतिक विधानसभा सदस्यांची तर ५५० मते संसदेतील लोकप्रतिनिधींची होती. यांपैकी पौडेल यांना संसदेतील लोकप्रतिनिधींची २१४ आणि प्रांतिक विधानसभा सदस्यांची ३५२ मते मिळाली. या निवडणुकीत त्यांनी सुभाषचंद्र नेबमांग यांचा पराभव केला.
हेही वाचा >>> विश्लेषण: भारत-ऑस्ट्रेलिया धोरणात्मक आणि व्यापारी संबंध आणि चीनविरोधात रणनीती; ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या भेटीचा अन्वयार्थ
पौडेल यांना पंतप्रधांनाचा पाठिंबा
युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट (यूएमएल) आणि माओईस्ट सेंटर हे नेपाळमधील दोन मोठे कम्युनिष्ट विचारसरणी असलेले पक्ष सरकारची सत्तास्थापन करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी एकत्र आले होते. मात्र राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या निवडीवरून मतभेद निर्माण झाल्यामुळे ते वेगळे झाले होते. पुढे पंतप्रधान प्रचंड यांच्या नेतृत्वातील माओईस्ट सेंटरने पौडेल यांना पाठिंबा देण्याचे ठरवले. तर यूएमएलचे उमेदवार नेमबांग हे होते. प्रचंड यांनी पौडेल यांना पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीने (आरपीपी) सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. याच कारणामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. नेबमांग यांना माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएल पक्षाचा पाठिंबा होता.
हेही वाचा >>> विश्लेषण: पॅन कार्ड – आधार लिंक करणे अनिवार्य का आहे? लिंक नाही केले तर काय होईल?
फक्त दोन वेळाच राष्ट्रपती होता येते
नेपाळ देश २००८ साली लोकशाही राष्ट्र म्हणून उदयास आला. पौडेल हे प्रजासत्ताक नेपाळचे तिसरे राष्ट्रपती आहेत. विद्यमान राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांचा कार्यकाळ येत्या १२ मार्च रोजी संपणार आहे. नेपाळमध्ये राष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. एका व्यक्तीला नेपाळच्या राष्ट्रपतीपदी फक्त दोन वेळा निवडून येता येते.
रामचंद्र पौडेल कोण आहेत?
रामचंद्र पौडेल यांनी याआधी उपपंतप्रधान तसेच मंत्री, सभागृहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडलेली आहे. देशात लोकशाही व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा दिलेला आहे. पौडेल यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९४४ रोजी बहुनपोखारी येथे मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झालेला आहे. कला शाखेत त्यांनी पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. वयाच्या १६ व्या वर्षी ते राजकारणात सक्रिय झाले. ते १९७० साली नेपाळी काँग्रेसच्या नेपाळ स्टुडंड युनियन या विद्यार्थी शाखेचे संस्थापक सदस्य झाले.
हेही वाचा >>> विश्लेषण : कबुतरांना खाद्यपदार्थ टाकण्यास बंदी… ठाणे महापालिकेचा निर्णय का चर्चेत? कबुतरांपासून आरोग्याला कोणता धोका?
१२ वर्षांचा तुरुंगवास भोगला
पुढे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख वाढतच गेला. ते १९८० साली नेपाळी काँग्रेसच्या तान्हू जिल्हा समितीचे उपाध्यक्ष झाले. १९८५ सालातील सत्त्याग्रह, १९९० साली झालेल्या पीपल्स मूव्हमेंट-१, २००६ साली झालेल्या पीपल्स मूव्हमेंट-२ मध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. १९६१ ते १९९० या काळात देशातील सर्व सत्ता राजाच्या हातात होती. या काळात हुकूमशाही व्यवस्थेविरोधातील लढ्यादरम्यान त्यांनी १२ वर्षांचा तुरुंगवास भोगला.
खासदार, मंत्री, उपपंतप्रधान, संसदेचे अध्यक्षपद सांभाळले
पौडेल खासदार म्हणून पहिल्यांदा १९९१ साली निवडून आले. तान्हू जिल्ह्यातून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर लागोपाठ सहा वेळा त्यांनी तान्हू जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. ते १९९१ साली पहिल्यांदा मंत्री झाले. पुढे १९९२ साली त्यांनी कृषीमंत्रिपदाची धुरा सांभाळली. १९९४ ते १९९९ पर्यंत ते संसदेच्या अध्यक्षपदी होते. १९९१ ते २००२ या काळात ते उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री होते. २००८ ते २०१३ या काळात ते नेपाळ काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते तसेच विरोधी पक्षनेते होते.
हेही वाचा >>> विश्लेषण : रश्मी शुक्ला यांच्या नव्या नियुक्तीचा अर्थ काय? फोन टॅपिंगप्रकरणी आरोप असताना बढती कशी मिळाली?
पौडेल उत्तम लेखक
पौडेल हे एक उत्तम लेखक आहेत. त्यांनी लोकशाही, समाजवाद, शेती अशा विषयांवर अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव साबिता पौडेल असून, त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे.