काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभर पडसाद उमटले. हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्र येत देशातील अनेक शहरांत आंदोलने केली. दरम्यान, उत्तर प्रदेशातील प्रयागराज याठिकाणी देखील आंदोलन करण्यात आलं. यावेळी संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. तसेच अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने पेटवून दिली. पोलिसांच्या वाहनाला देखील आग लावण्याचा प्रयत्न झाला.

पोलिसांच्या मते, हिंसाचाराच्या या कटात जावेद अहमद उर्फ जावेद पंप याचा हात असून ते प्रमुख आरोपी आहेत. १० जून रोजी ही घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी १२ जून रोजी प्रयागराज विकास प्राधिकरणाने (पीडीए) जावेद अहमद यांच्या घरावर बुलडोजर फिरवला. प्रयागराजच्या करेली भागात हे घर असून याची किंमत जवळपास ५ कोटी असेल, अशी माहिती प्रयागराजचे एसएसपी अजय कुमार यांनी दिली.

जावेद यांचं घर का पाडलं?
प्रयागराज हिंसाचारानंतर दोन दिवसांनी जावेद अहमद यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला. त्यामुळे पीडीएच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र, घराच्या आरखड्यास परवानगी न घेता बांधकाम केल्याचा दावा प्रयागराज विकास प्राधिकरणाकडून केला आहे. तसेच याबाबत जावेदला १० मे २०२२ रोजी आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली होती. त्यासाठी २४ मे २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. पण तरीही जावेद याचे वकील न आल्याने घर पाडण्याचा आदेश देण्यात आला. घर पाडण्यासाठी १२ जून ही तारीख ठरवण्यात आली होती. त्यानुसार १२ जूनला ही कारवाई करण्यात आल्याचं पीडीएचं म्हणणं आहे.

घराची खरी मालकी कोणाकडे?
पण हे घर पाडल्यानंतर आता वेगळाच प्रकार समोर आला आहे. संबंधित घर हे जावेद अहमद यांच्या नावावर नसून त्यांची पत्नी परवीन फातिमा यांच्या नावावर असल्याचे उघड झाले आहे. जावेद यांच्या पत्नीने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संबंधित घर माझ्या नावावर असताना पीडीएने माझे पती जावेद अहमद यांना नोटीस कशी जारी केली? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच पीडिएने आपल्या घरावर अवैध पद्धतीने कारवाई केली असा आरोपही त्यांनी केला. हे घर माझ्या वडिलांनी मला लग्नाआधी दिलं होतं. त्यामुळे यावर जावेद अहमद यांची कसल्याप्रकारची मालकी नाही, असंही त्यांचं म्हणणे आहे.

जावेद यांच्या मुलीचा दावा काय आहे?
जावेद यांची मुलगी सुमैया हिने ‘आज तक’शी संवाद साधताना दावा केला की, “जे घर पाडण्यात आले, ते तिच्या आजोबांनी तिच्या आईला भेट म्हणून दिलं होतं. हे घर सरकारी कागदपत्रांनुसार माझ्या आईच्या नावावर आहे. माझ्या वडिलांच्या कमाईने हे घर किंवा घराची जागा, असं काहीही विकत घेतले नाही.”

याचिकेत नेमकं काय म्हटलंय?
परवीन फातिमा यांच्या वकिलांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना ईमेलद्वारे याचिका पाठवली आहे. यामध्ये घर पाडण्याची कारवाई बेकायदेशीर असल्याचे नमूद केले आहे. हे घर जावेद अहमद यांच्या नावावर नसून त्यांची पत्नी परवीन फातिमा यांच्या नावावर असल्याचं याचिकेत म्हटलं आहे. संबंधित घर फातिमा यांना त्यांच्या वडिलांनी लग्नापूर्वी भेट दिलं होतं. त्यामुळे त्या घरावर आणि जमिनीवर अहमद यांची कसल्याही प्रकारची मालकी नाही. त्यामुळे घर पाडण्याची कारवाई बेकायदेशीर ठरते, असं याचिकेत म्हटलं आहे.

हेही वाचा- विश्लेषण – भारतीयांच्या आयुर्मानात वाढ ; ‘एसआरएस’च्या नवीन अहवालात माहिती आली समोर

याचिकेत असंही म्हटले आहे की, “पीडीएने आपली कारवाई योग्य ठरवण्यासाठी ११ जून रोजी फातिमा यांच्या घरावर एक नोटीस लावली होती. ज्यामध्ये जावेद अहमद यांना यापूर्वी कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली होती, असा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु जावेद अहमद आणि त्यांच्या पत्नीला अशी कोणतीही नोटीस मिळाली नाही.

या याचिकेत जावेद अहमद यांचा उल्लेख ‘समाजसेवक’ असा करण्यात आला असून त्यांना १० जून रोजी रात्री अटक करण्यात आला होती, असा दावा करण्यात आला आहे. अटकेनंतर दुसऱ्या दिवशी ११ जून रोजी एफआयआर दाखल केल्याचंही याचिकेत म्हटलं आहे.

Story img Loader