जगातील अग्रगण्य १० श्रीमंत महिलांच्या यादीत पहिल्यांदाच एका भारतीय महिलेला स्थान मिळाले आहे. हा इतिहास रचला आहे ‘एचसीएल टेक्नॉलॉजीज’च्या अध्यक्ष रोशनी नाडर यांनी. ‘हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२५’नुसार, ३.५ लाख कोटी रुपये (४० अब्ज अमेरिकन डॉलर्स) इतकी संपत्ती असलेल्या रोशनी नाडर आता जगातील सर्वांत श्रीमंत महिलांमध्ये पाचव्या स्थानावर आहेत.
त्यांचे वडील ‘एचसीएल टेक्नॉलॉजीज’चे संस्थापक शिव नाडर यांनी कंपनीतील ४७ टक्के वाटा रोशनी यांच्याकडे हस्तांतरित केला आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत आणखी वाढ झाली आहे. या स्थानामुळे त्यांचे भारतातील सर्वांत शक्तिशाली व्यावसायिकांमध्येदेखील स्थान निश्चित झाले आहे. तसेच २०२५ मध्ये त्या देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती ठरल्या आहेत. मात्र, रोशनी नाडर नक्की कोण आहेत? त्यांचा एकूण प्रवास आणि कारकिर्दीविषयी जाणून घेऊ.
कोण आहेत रोशनी नाडर?
१९८२ मध्ये जन्मलेल्या रोशनी नाडर मल्होत्रा या सध्या ४८ अब्ज डॉलर्सच्या बाजार मूल्यासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘एचसीएल टेक्नॉलॉजीज’च्या अध्यक्ष आहेत. त्या कंपनीचे नेतृत्व करतात, तसेचत्या कंपनीतील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) बोर्ड कमिटीच्या प्रमुखदेखील आहेत. अमेरिकेतल्या इलिनॉयमधील ‘केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट’मधून त्यांनी एमबीएची पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. यापूर्वी त्यांनी अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून कम्युनिकेशन्समध्ये पदवी मिळवली आहे. जुलै २०२० मध्ये त्यांनी त्यांचे वडील शिव नाडर यांच्या जागी पदभार स्वीकारला आणि त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीचे नेतृत्व स्वीकारले.

‘मिंट’च्या वृत्तानुसार, रोशनी नाडर यांचे लग्न शिखर मल्होत्रा यांच्याशी झाले आहे. शिखर हे ‘एचसीएल हेल्थकेअर’चे उपाध्यक्ष आहेत. त्यांना दोन मुले आहेत. कॉर्पोरेट नेतृत्वाव्यतिरिक्त, नाडर यांचा समाजकार्यातदेखील समावेश आहे. देशभरात विविध उपक्रम चालवणाऱ्या शिव नाडर फाउंडेशनमध्ये त्या महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनने भारतात काही प्रसिद्ध शाळा आणि महाविद्यालये स्थापन केली आहेत.
त्या ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’च्या माध्यमातून वन्यजीव संवर्धनासाठीदेखील कार्य करतात. सामाजिक कार्यात त्यांच्या योगदानामुळे त्यांना जागतिक स्तरावरदेखील मान्यता मिळाली आहे. २०२३ मध्ये त्यांना त्यांच्या समाजकार्यासाठी ‘शॅफनर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोशनी नाडर या ‘द नेचर कन्झर्व्हन्सी’च्या बोर्ड सदस्यदेखील आहेत. त्यासह त्या ‘एमआयटी स्कूल ऑफ इंजिनियरिंग’मध्ये डीनच्या सल्लागार परिषदेतही सहभागी आहेत.
२०१७ पासून फोर्ब्सने त्यांना जगातील १०० सर्वांत शक्तिशाली महिलांमध्ये सातत्याने स्थान दिले आहे. २०२४ मध्ये त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘शेव्हेलियर डे ला लीजन डी’ऑनरने सन्मानित करण्यात आले होते. त्या यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) च्या बोर्ड सदस्य म्हणून काम करतात; ज्यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील संबंध आणखी मजबूत होतात.
हुरुन ग्लोबल श्रीमंतांच्या यादीतील इतर महिला
यंदा हुरुन ग्लोबल श्रीमंतांच्या यादीत ५६१ महिलांचा समावेश आहे, त्यापैकी २२४ महिला स्वतःच्या व्यवसायातून श्रीमंत झाल्या आहेत. त्यातून जगभरातील उच्च आर्थिक पदांवर महिलांची वाढती उपस्थिती अधोरेखित होते.
अॅलिस वॉल्टन (अमेरिका)- १०२ अब्ज अमेरिकन डॉलर्स : जगातील सर्वांत श्रीमंत महिला अॅलिस वॉल्टन या ‘वॉलमार्ट’चे संस्थापक सॅम वॉल्टन यांच्या लेक आहेत. ‘वॉलमार्ट’च्या शेअर्सच्या किमतीत ४६ टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाल्यामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे आणि त्यांनी या यादीत पहिले स्थान मिळविले आहे.
फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स (फ्रान्स) – ६७ अब्ज अमेरिकन डॉलर्स : ‘लॉरियल’ या प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपनीच्या वारसदार असणाऱ्या फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स या जागतिक स्तरावरील सर्वांत श्रीमंत महिलांपैकी एक आहेत. परंतु, जागतिक सौंदर्यप्रसाधनांच्या बाजारपेठेतील आव्हानांमुळे त्यांची एकूण संपत्ती २६ टक्क्यांनी कमी झाली आहे.
ज्युलिया कोच अँड फॅमिली (अमेरिका) – ६० अब्ज अमेरिकन डॉलर्स : ज्युलिया कोच यांचे पती डेव्हिड कोच यांच्या निधनानंतर त्यांना वारशाने मोठी संपत्ती मिळाली. कोच इंडस्ट्रीजमधील कुटुंबाच्या गुंतवणुकीतून त्यांना मोठा नफा मिळत आहे. त्यामुळे त्यांचे नाव जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत असते.
जॅकलिन मार्स (अमेरिका) – ५३ अब्ज अमेरिकन डॉलर्स : ‘मार्स इंक’ची वारसदार जॅकलिन मार्स यांच्या संपत्तीत ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. संपत्तीतील वाढीचे मुख्य कारण जागतिक पाळीव प्राण्यांच्या अन्न बाजारपेठेत झालेली वाढ आहे. या वाढीमुळे कंपनीचे उत्पन्नही लक्षणीयरीत्या वाढले आहे.
अॅबिगेल जॉन्सन (अमेरिका) – ३२ अब्ज अमेरिकन डॉलर्स : ‘फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्स’च्या कार्यकारी अधिकारी अॅबिगेल जॉन्सन यांनी कंपनीचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. व्यवस्थापनाखालील ४०० अब्ज डॉलर्स मालमत्तेसह त्यांच्या संपत्तीत १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा पद्धतीने त्यांनी सर्वांत श्रीमंत महिलांमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
मर्लिन सिमन्स अँड फॅमिली (अमेरिका) – ३१ अब्ज अमेरिकन डॉलर्स : ‘रेनेसान्स टेक्नॉलॉजीज’चे संस्थापक जेम्स सिमन्स यांच्या पत्नी मर्लिन सिमन्स पतीच्या निधनानंतर गुंतवणूक आणि समाजसेवेच्या माध्यमातून कुटुंबाची संपत्ती व्यवस्थापित करीत आहेत आणि वाढवत आहेत.
लिंडा स्टीफन्स अँड फॅमिली (अमेरिका) – ३० अब्ज अमेरिकन डॉलर्स : अग्रगण्य १० जणांमध्ये पदार्पण करणाऱ्या लिंडा स्टीफन्स यांना त्यांची संपत्ती त्यांचे दिवंगत पती ऑट्री स्टीफन्स यांच्याकडून वारशाने मिळाली आहे. ऑट्री स्टीफन्स हे तेल आणि वायू उद्योगातील प्रमुख खेळाडू असणाऱ्या ‘एंडेव्हर एनर्जी रिसोर्सेस’चे संस्थापक होते.