जस्टीन ट्रुडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनेक जण आहेत. मुख्य म्हणजे या शर्यतीत भारतीय वंशाच्या नागरिकांचादेखील समावेश आहे. कॅनडातील भारतीय वंशाच्या एक नेत्या पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत. कॅनडाच्या पंतप्रधानपदी जस्टिन ट्रुडो यांची जागा घेण्याच्या शर्यतीत लिबरल पक्षाच्या उमेदवार रुबी ढल्ला सामील झाल्या आहेत. रुबी ढल्ला या माजी खासदार असून, त्या यशस्वी झाल्यास कॅनडाच्या पहिल्या कृष्णवर्षीय पंतप्रधान असतील. कॅनडाची लिबरल पार्टी ९ मार्चला आपल्या नेत्याची निवड करणार आहे. कोण आहेत रुबी ढल्ला? त्यांची इतकी चर्चा का?

कोण आहेत रुबी ढल्ला?

कॅनडातील भारतीय वंशाचे लोक आणि त्यांचा प्रभाव, कॅनडा-भारत संबंधांवर पडतो. त्यामुळे भारतीय वंशाच्या व्यक्ती कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असण्याला एक वेगळे महत्त्व आहे. मिंटनुसार, रुबी ढल्ला यांचा जन्म विनिपेगच्या मॅनिटोबा येथे झाला. त्यांचे पालक पंजाबमधील स्थलांतरित आहेत. रुबी ढल्ला यांनी एनडीटीव्हीला सांगितले, “माझी आई १९७२ मध्ये कॅनडामध्ये आली होती आणि तिच्या इच्छेने, खूप मेहनतीने आणि दृढनिश्चयाने मला संधी मिळाली आहे. पण, कॅनडा हा एक मोठा देश असल्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान होऊन, एक मोठे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला मिळाली आहे.”

कॅनडातील भारतीय वंशाच्या एक नेत्या पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : एक रुपयांच्या कंडोमवरही ट्रम्प यांनी घातली बंदी; गाझातील ५० दशलक्ष डॉलर्सचा कार्यक्रम रद्द; कारण काय?

रुबी ढल्ला किशोरवयीन असल्यापासून लिबरल पक्षाचा भाग आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, वयाच्या १० व्या वर्षी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पत्र लिहिल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. पत्रकार परिषदेत रुबी ढल्ला यांच्या पत्राबद्दल बोलणाऱ्या इंदिराजींनी स्वतः त्यांना प्रत्युत्तर देत पत्र लिहिले होते. मिंटच्या म्हणण्यानुसार, रुबी ढल्ला यांची बॉलीवूड चित्रपट ‘क्यों? किस लिए?’ चित्रपटात भूमिका होती. त्या करियरच्या सुरुवातीच्या काळात मॉडेल होत्या.

१९९३ च्या मिस इंडिया-कॅनडा स्पर्धेतही त्या उपविजेत्या ठरल्या होत्या. रुबी ढल्ला नंतर ओंटारियोला स्थलांतरित झाल्या, तिथे त्यांनी कायरोप्रॅक्टर म्हणून काम केले. त्या २००४ ते २०११ पर्यंत ब्रॅम्प्टन-स्प्रिंगडेल या मतदारसंघांच्या खासदार होत्या. हा मतदारसंघ आता बंद झाला आहे. रुबी ढल्ला या कॅनडाच्या संसदेवर तीन वेळा निवडून आलेल्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला होत्या. रुबी ढल्ला या ढल्ला ग्रुपच्या सीईओ आहेत. हा ग्रुप आरोग्य सेवा, रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगांमध्ये कार्यरत आहे. त्यांनी स्वत:चे वर्णन ‘सेल्फ मेड बिझनेस वूमन’ असे केले आहे. त्यांचा हॉटेलचादेखील व्यवसाय आहे. त्यांच्या घरात नियुक्त करण्यात आलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी कुटुंबावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता; मात्र त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते आणि २००९ मध्ये पदाचा राजीनामा दिला होता.

“बेकायदा स्थलांतरितांना हद्दपार करणार’

ढल्ला यांनी बेकायदा स्थलांतरितांबाबत वक्तव्य केले; ज्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. ढल्ला यांनी ‘एक्स’वर लिहिले, “पंतप्रधान म्हणून मी बेकायदा स्थलांतरितांना हद्दपार करीन आणि मानवी तस्करांवर कडक कारवाई करीन. हे माझे तुम्हाला वचन आहे.” मिंटच्या वृत्तानुसार, त्यांच्या विरोधकांमध्ये कॅनडा आणि बँक ऑफ इंग्लंडचे माजी गव्हर्नर मार्क कार्नी आणि माजी उपपंतप्रधान क्रिस्टीया फ्रीलँड, खासदार चंद्रा आर्या, लिबरल हाऊसच्या नेत्या करीना गोल्ड यांचा समावेश आहे.

कॅनडाच्या पंतप्रधानपदी जस्टिन ट्रुडो यांची जागा घेण्याच्या शर्यतीत लिबरल पक्षाच्या उमेदवार रुबी ढल्ला सामील झाल्या आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

रुबी ढल्ला यांनी असेही म्हटले आहे की, कॅनडाला घरांची किंमत, गुन्हेगारीचे दर, खाद्यपदार्थांच्या किमती आणि अमेरिकेकडून शुल्काचा धोका यांसह प्रमुख समस्यांचा सामना करावा लागतो. “कॅनडाला ज्या टॅरिफ धमक्यांचा सामना करावा लागत आहे, त्याचा कॅनेडियन कामगार आणि कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल,” असे रुबी ढल्ला यांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले. भारत आणि कॅनडा येथील डायस्पोरा पाहता, संबंध अधिक दृढ केले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.

“कॅनडामधील कामगार आणि व्यावसायिक लोकांना इतर देशांबरोबर काम करण्याची संधी मिळाली पाहिजे,” असे त्यांनी आउटलेटला सांगितले. त्यांचे राजकीय घोषवाक्य आहे ‘कॅनडाचे पुनरागमन आता सुरू होते आहे.’ त्यांनी ‘एक्स’वर पोस्टदेखील केले, “तुमचे खूप खूप आभार, देवाचे आभार, मी तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. उदारमतवादी पक्षाच्या नेत्या आणि कॅनडाच्या पुढच्या पंतप्रधान म्हणून पहिल्या कृष्णवर्णीय महिलेची निवड करून आम्ही इतिहास रचण्याच्या मार्गावर आहोत.”

हेही वाचा : मौनी अमावस्या म्हणजे काय? महाकुंभात त्याचे महत्त्व काय?

“फेज १ संपला आहे. आम्ही फेज २ वर जाऊ आणि देशभरातली लिबरल पार्टीतील सदस्यांशी संपर्क साधू म्हणजेच ज्यांनी आमच्या पक्षाचे सदस्य म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यांची भेट घेऊ. लिबरल पार्टीने अधिकृतपणे उमेदवार म्हणून स्वीकारल्याबद्दल मी उत्साहित आहे. माझी उमेदवारी आमच्या पक्षात आणि कॅनडाच्या राजकीय व्यवस्थेत संपूर्णपणे नवीन लोकांचा समावेश करेल,” असे त्या पुढे म्हणाल्या.

Story img Loader