मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या तहव्वूर राणाला अखेर भारतात आणण्यात आले आहे. तहव्वूर राणा याचे गुरुवारी अमेरिकेकडून भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. तहव्वूर राणाला एका विशेष विमानाने दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आले. तो आता थेट सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) सामोरे जाईल. मुंबई हल्ल्यामागील सूत्रधारांपैकी एक असलेल्या तहव्वूर राणाच्या चौकशीचे नेतृत्त्व वरिष्ठ पोलिस अधिकारी दाते यांना सोपविण्यात आले आहे. मुख्य म्हणजे २६/११ च्या हल्ल्यावेळी त्यांनी दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते, त्यादरम्यान ते जखमीदेखील झाले होते. पण, त्यांनी अनेकांचा जीव वाचवला होता. सदानंद दाते कोण आहेत? मुंबई हल्ल्यादरम्यान त्यांचे प्रयत्न आणि तहव्वूर राणाच्या चौकशीतील त्यांच्या भूमिकेविषयी सविस्तर जाणून घेऊ.
सदानंद दाते कोण आहेत?
सदानंद दाते हे महाराष्ट्र कॅडरमधील भारतीय पोलिस सेवेचे (आयपीएस) १९९० च्या बॅचचे अधिकारी आहेत. दाते सध्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालक पदावर कार्यरत आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), गुप्तचर विभाग (आयबी) आणि महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)मध्ये सर्व प्रमुख पदांवर काम केले आहे. सदानंद दाते हे पुण्यात लहानाचे मोठे झाले आहेत. त्यांना अगदी लहान वयात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांची आई घरकाम करायची आणि ते कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्तमानपत्रे विकायचे, असे ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे.

ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आणि भारतीय पोलिस सेवेत रुजू झाले. पुणे विद्यापीठातून त्यांनी आर्थिक गुन्ह्यांमध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. विशेष म्हणजे त्यांची प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिपसाठीदेखील निवड झाली. २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री मुंबईत हल्ला झाला तेव्हा ते दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणाऱ्या पहिल्या व्यक्तींपैकी एक होते. हल्ल्यावेळी दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले. २००६ मध्ये त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक आणि २०१४ मध्ये विशिष्ट सेवेसाठी पदक प्राप्त झाले.
२६/११ च्या मुंबई हल्ल्यात सदानंद दाते यांचा दहशतवाद्यांशी सामना
२६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता, यात सहा अमेरिकन नागरिकांचादेखील सहभाग होता. दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी शहरातील प्रमुख ठिकाणी हे हल्ले केले. दहशतवाद्यांचा सामना करताना दातेदेखील जखमी झाले होते. ते अजमल कसाब आणि अबू इस्माईल या दोन दहशतवाद्यांचा सामना करणाऱ्यांपैकी पहिले होते. २६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ९:३० वाजता मुंबईत दहशतवादी हल्ल्यांना सुरुवात झाली. हे हल्ले दाते यांच्या अधिकारक्षेत्राबाहेर म्हणजेच दक्षिण मुंबईत झाले. परंतु, हल्ल्याची बातमी कळताच ते त्यांच्या मलबार हिलमधील निवासस्थानातून निघाले आणि थेट सीएसटी रेल्वेस्थानकाकडे रवाना झाले.
सीएसटी येथे पोहोचताच त्यांना कळले की दोन दहशतवादी म्हणजेच कसाब आणि इस्माईल जवळच्या कामा आणि अल्ब्लेस रुग्णालयात गेले आहेत. या रुग्णालयात महिला आणि लहान मुलांना उपचार दिले जातात. दहशतवादी महिला, मुलांना ओलीस ठेवतील या भीतीने त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. तेव्हा त्यांना छतावरून गोळीबार करणारे दहशतवादी दिसले. त्यांनी त्यांच्या कार्बाइनने गोळीबार केला. दहशतवादी उंच जागेवर असल्याने दहशतवाद्यांना आपला जीव वाचवता आला.
दहशतवादी इमारतीत प्रवेश करण्याच्या तयारीत असताना कसाबने छतावरून ग्रेनेड फेकला. या हल्ल्यात दाते यांच्याबरोबर असणारे उपनिरीक्षक प्रकाश मोरे यांचा मृत्यू झाला, असे ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तात दिले आहे. या स्फोटात दाते आणि इतर तीन अधिकारी जखमी झाले. जखमी अवस्थेत असताना दाते यांनी घटनास्थळीच राहण्याचा निर्णय घेतला आणि इतर जखमी अधिकाऱ्यांना वैद्यकीय मदत घेण्यास सांगितले. उर्वरित अधिकाऱ्यांसह दाते रुग्णालयात दाखल झाले आणि सहाव्या मजल्यावर पोहोचले. जिन्याजवळील एका जागेवरून त्यांनी दहशतवाद्यांवर गोळीबार केला आणि ४० मिनिटे पांगवून ठेवले. त्यावेळी त्यांच्याजवळ आणखी एका ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटामुळे त्यांच्या पायात आणि चेहऱ्याला दुखापत झाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
स्फोटामुळे काही काळासाठी त्यांच्यासमोर अंधार झाला आणि याचाच फायदा घेत कसाब आणि इस्माईल पळून जाऊ शकले. या हल्ल्यात दाते यांच्या डोळ्यांना, घश्याला, छातीला, उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. पुढे तपासात उघड झाले की, दाते यांच्या बंदुकीतील एक गोळी त्यांचा नेता अबू इस्माईलला लागली होती. दाते यांच्या प्रयत्नांमुळे बराच काळ दहशतवादी अडकून राहिले, त्यामुळे ओलिसांना वाचवण्यात मदत झाली आणि दहशतवादीही जखमी झाला.
तहव्वूर राणाच्या तपासाचे नेतृत्व
राणा काल (गुरुवारी) संध्याकाळी ७ वाजता दिल्लीत पोहोचला. अमेरिकेत सुमारे दोन वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर राणाचे प्रत्यार्पण झाले. मे २०२३ मध्ये प्रत्यार्पण न्यायालयाने त्याला मान्यता दिली. राणा याने अनेक कायदेशीर मार्गांनी या आदेशाला आव्हान दिले आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात अपील केले. २००८ च्या मुंबई हल्ल्याच्या १७ वर्षांनी तहव्वूर राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आले आहे, त्यामुळे सदानंद दाते पुन्हा चर्चेत आले आहेत. आता दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा पाकिस्तानी-कॅनेडियन आरोपी तहव्वूर राणाविरुद्ध खटला चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असणार आहे.