युट्यूबर आणि कॉमेडियन समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा कार्यक्रम सध्या लोकप्रिय आहे, परंतु या कार्यक्रमात होणाऱ्या अश्लील विनोदांमुळे हा कार्यक्रम अनेकदा वादात सापडला आहे. यंदा या कार्यक्रमातील एक छोटी क्लिप व्हायरल झाली, ज्यात यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया एका स्पर्धकाला अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील प्रश्न विचारत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर सोशल मीडिया वापरकर्त्यांसह विविध क्षेत्रातील लोकांकडून टीका करण्यात आली आहे. ‘एएनआय’च्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमाच्या पॅनेलवरील इतरांबरोबर दोन यूट्यूबर्सविरुद्ध मुंबईत अपशब्द वापरल्याबद्दल तक्रारही नोंदवण्यात आली आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? समय रैना कोण आहे? जाणून घेऊ.
कोण आहे समय रैना?
समय रैना हा एक स्टँड-अप कॉमेडियन आहे, जो त्याच्या ‘डार्क’ कॉमेडी शैलीसाठी ओळखला जातो. जम्मू आणि काश्मीरमध्ये एका काश्मिरी पंडित कुटुंबात जन्मलेल्या समय रैना याने वयाच्या १६ व्या वर्षी यूट्यूबवर कॉमेडी व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली. त्याने महाराष्ट्रातील पुण्यातील सीओईटीमध्ये प्रिंट इंजिनीअरिंग कोर्समध्ये प्रवेश घेतला, परंतु त्याला त्यात रस वाटत नसल्याने त्याने ओपन माइक इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यास सुरुवात केली. त्याची पहिली ओपन माइक गिग ऑगस्ट २०१७ मध्ये आली. त्याने सहकारी स्पर्धक आकाश गुप्तासोबत कॉमिकस्टान या स्टँड-अप स्पर्धेचा दुसरा सीझन जिंकला तेव्हा तो प्रसिद्धीच्या झोतात आला.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/indias-got-latent-show-controversy.jpg?w=830)
कोविड-१९ महामारीच्या काळात रैनाने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बुद्धिबळ स्ट्रीमिंगची सुरुवात केली. त्याने यूट्यूबवर अँटोनियो रॅडिक (अगदमाटर), भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथी, विश्वनाथन आनंद, अनिश गिरी, तेमूर रदजाबोव आणि मॅग्नस कार्लसन, व्लादीमीर कार्निक आणि जूदित पोल्गारसारख्या दिग्गजांबरोबर कोलॅब केले. समय रैनाने अनेक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत, जसे की कॉमेडियन ऑन बोर्ड (COB) सीरिज.
‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, त्याने २०२१ मध्ये ‘Chess.com’ ने होस्ट केलेले १०,००० डॉलर्स बोटेझ बुलेट इनव्हिटेशनल जिंकले. रैनाने चेसबेस इंडिया आणि नॉडविन गेमिंगसह चेस सुपर लीग (CSL)चीही सह-स्थापना केली. त्यात भारत आणि इतर देशांतील अव्वल खेळाडूंचा समावेश होता आणि त्यांना ४० लाख रुपयांचे विजेते बक्षीस होते. त्याच्या यूट्यूब चॅनेलवर ७.४ दशलक्ष फॉलोवर्स आहेत आणि इन्स्टाग्रामवर सहा दशलक्ष फॉलोअर्स आहेत. सध्या रैना सिएटलमध्ये सुरू असलेल्या त्याच्या ‘अनफिल्टर्ड: नॉर्थ अमेरिका टूर २०२५’ वर आहे.
‘इंडियाज गॉट लेटेंट’ काय आहे?
जून २०२४ मध्ये, रैनाने इंडियाज गॉट टॅलेंट या टीव्ही रिॲलिटी शोसारखा ‘इंडियाज गॉट लेटेंट’नावाचा विनोदी कार्यक्रम आपल्या यूट्यूबवर सुरू केला. या कार्यक्रमात येणारे स्पर्धक त्यांची प्रतिभा प्रदर्शित करतात आणि नंतर पॅनेलवरील मंडळी स्पर्धकांना रोस्ट करतात, म्हणजेच त्यांच्यावर टिप्पणी करतात. या पॅनेलमध्ये रैना याने आमंत्रित केलेल्या इतर पाहुण्यांचा समावेश असतो. स्पर्धा जिंकण्यासाठी स्पर्धकांनी एकमेकांशी स्पर्धा करण्याऐवजी आत्मजागरूक असणे आवश्यक असते.
एक अनोखी स्कोअरिंग प्रणाली असलेला हा शो काहीसा कॉमेडियन टोनी हिंचक्लिफच्या अमेरिकन कॉमेडी पॉडकास्ट किल टोनीसारखा आहे. त्याचा पहिला भाग सुमारे सात महिन्यांपूर्वी यूट्यूबवर प्रसारित झाला होता आणि त्याला प्रचंड प्रेक्षकसंख्या मिळाली होती. या कार्यक्रमाच्या यशानंतर, समयने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ ॲपदेखील लॉंच केला, ज्यात सेन्सॉर नसलेली सामग्री पहायला मिळते.
हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात कसा अडकला?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडियाज गॉट लेटेंटमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मोठा गोंधळ उडाला. रणवीर अलाहाबादियासह कार्यक्रमाचा होस्ट समय रैना, आशीष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा माखिजा यांच्या विरोधात अनेक पोलिस तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. शोमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन देणे आणि अश्लील चर्चा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी याबाबत ट्विट केल्यानंतर गुवाहाटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/samay-raina-show-controversy.jpg?w=830)
त्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशीष रे आणि पंकज मिश्रा यांनीही मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आणि महाराष्ट्र महिला आयोग यांना पत्र लिहून शोमध्ये केलेल्या टिप्पणीबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, या टिप्पण्या महिलांचा अनादर करण्यासारख्या आहेत. समालोचक राहुल ईस्वार यांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआरची मागणी करणारी तक्रार दाखल केली. भाजपाचे पदाधिकारी नीलोत्पल मृणाल पांडे यांनी मुंबईतील खार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, “मला याबद्दल माहिती मिळाली आहे. मी स्वतः अजून ते पाहिलेलं नाही. पण, खूप वाईट पद्धतीने काही गोष्टी म्हटल्या आहेत, असं मला समजलं आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. भाषण स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे, पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो, तेव्हा ते स्वातंत्र्य संपतं आणि असं करणं अजिबात योग्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काही मर्यादा आहेत. आपल्या समाजात आपण अश्लीलतेचे काही नियम तयार केले आहेत, ते नियम जर कोणी ओलांडत असेल तर ते खूप चुकीचं आहे. असं काही घडत असेल तर त्यावर कारवाई व्हायला पाहिजे.
रणवीर अलाहाबादिया काय म्हणाला?
रणवीर अलाहाबादियाचे इन्स्टाग्रामवर ४.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि १.०५ कोटी यूट्यूब सबस्क्राइबर्स आहेत. रणवीर अलाहबादीया याने या प्रकरणी माफी मागितली आहे. एक्सवरील एका व्हिडीओ संदेशात तो म्हणाला, मी इंडियाज गॉट लेटेंटवर जे बोललो ते मी बोलायला नको होते, मला माफ करा, माझी टिप्पणी बरोबर नव्हती आणि ती मजेदारही नव्हती, मी विनोदात तज्ज्ञ नाही, मी फक्त माफी मागण्यासाठी इथे आलो आहे. तुमच्यापैकी अनेकांनी विचारलं होतं की मला माझा प्लॅटफॉर्म अशा प्रकारे वापरायचा आहे का? तर नाही, मला तो अशा प्रकारे अजिबात वापरायचा नाहीये. मी जे बोललो त्यासाठी मी कोणतेही निमित्त देणार नाही, मी फक्त तुमची सर्वांची माफी मागतो. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल.”
तो पुढे म्हणाला, “या प्लॅटफॉर्मचा अधिक चांगला वापर करण्याची गरज आहे, या संपूर्ण अनुभवातून मी शिकलो आहे. मी स्वतःमध्ये आणखी सुधारणा करण्याचे वचन देतो. व्हिडीओच्या निर्मात्यांना व्हिडीओमधून असंवेदनशील विभाग काढून टाकण्यास सांगितले आहे. मी अखेर एवढेच सांगू शकतो की, मला माफ करा. मला आशा आहे की तुम्ही मला एक माणूस म्हणून माफ कराल.” कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी वादग्रस्त भाग काढून टाकले आहेत.