चांद्रयान-२ ही मोहीम अशंतः अपयशी ठरल्यानंतर भारताने खचून न जाता चांद्रयान-३ ही मोहीम हाती घेतली. १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून (SDSC ) दुपारी २.३५ वाजता चांद्रयान-३ ने उड्डाण घेतले. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास चांद्रयान-३ चे विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या अवतरण करण्याचा प्रयत्न करणार आहे. दरम्यान, या मोहिमेसाठी सतीश धवन अंतराळ केंद्राच्या निर्मितीसाठी श्रीहरीकोटाची निवड करण्यात आली होती. सतीश धवन अंतराळ केंद्राची निर्मिती कशी झाली? या अंतराळ केंद्राला सतीश धवन यांचे नाव देण्यात आले, ते नेमके कोण आहेत? याबाबत घेतलेला हा आढावा…
इस्रो आणि भारतीय अंतराळ क्षेत्राची जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा डॉ. विक्रम साराभाई, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. डॉ. विक्रम साराभाई यांच्यानंतर इस्रोचा कारभार ज्यांनी सांभाळला त्या प्रा. सतीश धवन यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. इस्रोच्या भरभराटीत आणि नवे वैज्ञानिक घडविण्यामध्ये सतीश धवन यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. अब्दुल कलाम यांचे खंबीर पाठिराखे म्हणून त्यांची ओळख होती. आज इस्रोकडून मंगळयान, चांद्रयान अशा एकापाठोपाठ मोहिमा राबविल्या जात आहेत, अनेक उपग्रहांचे प्रक्षेपण इस्रोच्या विविध तळावरून करण्यात येते, त्याचे श्रेय अंतराळ वैज्ञानिक प्राध्यापक सतीश धवन यांना जाते.
हे वाचा >> Chandrayaan-3 : अंतराळ केंद्राच्या निर्मितीसाठी इस्त्रोने श्रीहरीकोटाचीच निवड का केली?
कोण होते प्रा. सतीश धवन?
प्रा. सतीश धवन यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२० साली श्रीनगर येथे झाला. ब्रिटिश काळात सरकारी सेवेत असलेल्या न्यायाधीशांच्या घरी जन्मलेले सतीश धवन यांचे प्रारंभिक शिक्षण लाहोरमध्ये (आज पाकिस्तानात) झाले. लाहोरमधील पंजाब विद्यापीठातून त्यांनी गणित आणि भौतिक या विषयांमध्ये पदवी घेतली. इंग्रजी साहित्य या विषयात एम.ए. केले. १९४५ साली सतीश धवन बंगळुरू येथे आले आणि त्यांनी नव्याने स्थापन झालेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये एक वर्ष काम केले. यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला निघून गेले. १९४५ साली अमेरिकेच्या मिनेसोटा विद्यापीठातून त्यांनी एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये मास्टर ऑफ सायन्स पदवी पूर्ण केली; तर १९४९ साली कॅलिफोर्निया तंत्रज्ञान निकेतनमधून एरोनॉटिकल अभियांत्रिकीत पदवी आणि १९५१ साली एरोनॉटिक्स आणि गणित विषयामध्ये पीएच.डी पूर्ण केली.
प्रा. सतीश धवन शिक्षण घेत असताना भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले होते. फाळणीमुळे धवन कुटुंबीयांना लाहोर सोडून भारतात यावे लागले होते. शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर धवन यांनी बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थांमध्ये (IISC) १९५१ साली वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून रुजू झाले. १९५५ साली वैमानिकी अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक म्हणून काम हाती घेतले. आपला अनुभव आणि शिक्षणाच्या माध्यमातून भारतात नवे वैज्ञानिक आणि अभियांत्रिक घडविण्याचा चंग त्यांनी बांधला. पुढील १० वर्षातच धवन यांना भारतीय विज्ञान संस्थेचे संचालक पद बहाल करण्यात आले. धवन यांनी आपल्या कार्यकाळात ज्या ज्या संस्थांचे प्रमुखपद भूषविले, त्या त्या ठिकाणी एक नवचेतना निर्माण करण्याचे कार्य केले. मग ते भारतीय विज्ञान संस्था असो किंवा इस्रो.
इंदिरा गांधींची नाराजी आणि इस्रोचे अध्यक्षपद
भारतीय विज्ञान संस्थानात दोन दशकं घालविल्यानंतर १९७१ साली प्रा. सतीश धवन यांनी कामापासून विराम घेतला. त्यांनी पुन्हा एकदा कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जाऊन स्वतःला संशोधन कार्यात मग्न केले. भारताचे अंतराळ संशोधन क्षेत्राचे जनक आणि इस्रोचे अध्यक्ष डॉ. विक्रम साराभाई यांचा डिसेंबर १९७१ साली मृत्यू झाला. इस्रोचे अध्यक्ष असण्यासोबतच विक्रम साराभाई हे पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागारदेखील होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इस्रोच्या नव्या अध्यक्षपदासाठी नावांची चाचपणी केली असता त्यांचे प्रधान सचिव पी. एन. हक्सर यांनी प्रा. सतीश धवन यांचे या पदासाठी नाव सुचविले.
वरिष्ठ वैज्ञानिक व्ही. पी. बालगंगाधरन यांनी ‘Indian Bahirakasha Gaveshana Charithram in India’ या पुस्तकात लिहिले की, पंतप्रधान इंदिरा गांधी प्रा. सतीश धवन यांच्या हातात इस्रोची कमान देण्यापूर्वी सांशक होत्या. काही काळापूर्वी इंदिरा गांधी यांनी धवन यांना कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च (CSIR) या संस्थेचे महासंचालकपद, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिवपद आणि सरंक्षण मंत्र्यांचे सल्लागार अशी तीन पदे देऊ केली होती, पण तीनही प्रस्ताव धवन यांनी स्वीकारले नव्हते. यामुळे इंदिरा गांधी त्यांच्यावर नाराज होत्या. मात्र, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार आणि इस्रोचे प्रभारी अध्यक्ष प्रा. एमजीके मेनन यांनी इंदिरा गांधी यांचे मतपरिवर्तन केले आणि प्रा. सतीश धवन इस्रोचे तिसरे अध्यक्ष आणि भारत सरकार अंतराळ विभागाचे सचिव बनले.
हे पद स्वीकारत असताना प्रा. सतीश धवन यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर तीन अटी ठेवल्या होत्या. एकतर त्यांनी कॅलिफोर्निया येथे सुरू केलेले संशोधन संपविण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली. दुसरे म्हणजे, त्यांनी भारतीय विज्ञान संस्थानचे संचालकपद कायम ठेवण्याची विनंती केली आणि तिसरे म्हणजे इस्रोचे मुख्यालय अहमदाबाद येथून बंगळुरू येथे हलविण्यासाठी परवानगी मागितली. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या तीनही मागण्या मान्य केल्या आणि अखेर इस्रोने बंगळुरू येथे आपले मुख्यालय थाटले. ज्यामुळे अनेक सकारात्मक परिणाम भविष्यात पाहायला मिळाले.
इस्रोची भरभराट
प्रा. सतीश धवन यांनी दशकभरात इस्रोला एका नव्या उंचीवर नेले. इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रा. सतीश धवन यांनी १९७२ ते १९८४ पर्यंत इस्रोची कमान सांभाळली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या काळात त्यांनी नव्या नव्या प्रयोगांना प्रोत्साहन दिले. आज अनेक उपग्रह आणि अंतराळ यान ज्या पीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपित केले जातात, त्याची सुरुवात धवन यांच्या काळात झाली होती. इस्रोमधील धवन यांचे सहकारी आणि कालांतराने इस्रोचे अध्यक्ष झालेले के. कस्तुरीरंगन यांनी इस्रोचे मुख्यालय अहमदाबादहून बंगळुरूला हलविण्याच्या निर्णयाबद्दल भाष्य केले होते. त्यांनी म्हटले की, इस्रोचे मुख्यालय बंगळुरूला आणण्यामागे धवन यांची वैयक्तिक कारणे होती, त्याशिवाय या शहरातील वातावरण चांगले होते. तसेच इतर वैज्ञानिक संस्था, जसे की भारतीय विज्ञान संस्थानं, राष्ट्रीय एरोनॉटिकल (आता एरोसायन्स) प्रयोगशाळा याच शहरात असल्यामुळे त्यांचाही इस्रोला लाभ घेता येईल.
हे वाचा >> अवकाशाशी जडले नाते : भारताची गगनभरारी
सतीश धवन यांना ‘फादर ऑफ एक्सपेरिमेंटल फ्लुइड डायनॅमिक्स रिसर्च’ असे म्हटले जाते. त्यांच्या कार्यकाळात अंतराळ संशोधनात भारताने महत्त्वाची कामगिरी केली. त्यांची मेहनत आणि मार्गदर्शनाखाली इस्त्रोने INSAT- टेलिकम्यूनिकेशन सॅटेलाईट, IRS- इंडियन रिमोट सेंन्सिग सॅटेलाईट, PSLV- पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल अशा वेगवेगळ्या उपग्रहांची निर्मिती केली.
श्रेय सहकाऱ्यांना आणि अपयशाची जबाबदारी स्वतःवर
द बेटर इंडिया या संकेतस्थळाने प्रकाशित केलेल्या लेखामध्ये प्रा. सतीश धवन यांच्या नेतृत्वगुणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. १० ऑगस्ट १९७९ साली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली एसएलव्ही-३ प्रक्षेपकाद्वारे ४० किलो वजनाचा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार होता. काही तांत्रिक कारणास्तव हे प्रक्षेपण अपयशी ठरले आणि उपग्रह बंगालच्या खाडीत जाऊन कोसळला. कलाम यांच्या नेतृत्वाखाली होत असलेले हे पहिलेच प्रक्षेपण होते आणि ते अपयशी ठरले. यानंतर माध्यमांना सामोरे जाऊन याबद्दल माहिती द्यावी लागणार होती. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्रकार या प्रयोगाचा साक्षीदार होण्यासाठी जमले होते. यावेळी अध्यक्ष या नात्याने प्रा. सतीश धवन माध्यमांना सामोरे गेले आणि त्यांनी अपयशाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली.
सतीश धवन म्हणाले, “मित्रांनो, आज आम्ही पहिलाच उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला काही कारणास्तव यश मिळालेले नाही. आतापर्यंत अनेक आघाड्यांवर आम्हाला यश मिळाले आहे, काही बाबींत अजून यश मिळायचे आहे. यासाठी माझे सहकारी जीव ओतून काम करत आहेत. मला खात्री आहे, आम्ही पुढचे मिशन यशस्वीरित्या पूर्ण करू.”
१८ जुलै १९८० साली इस्रोकडून पुन्हा एकदा एसएलव्ही-३ चे प्रक्षेपण केले गेले. यावेळी भारताला चांगले यश मिळाले. एसएलव्ही-३ वर ४० किलोचा रोहिणी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. यावेळी मात्र प्रा. सतीश धवन यांनी अब्दुल कलाम यांना पत्रकार परिषदेत जाऊन या यशाची माहिती देण्यास सांगितले. प्रा. सतीश धवन यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना डॉ. कलाम म्हणाले, “प्रा. सतीश धवन यांचे व्यवस्थापकीय तत्त्वज्ञान पूर्णपणे वेगळे होते. अथक परिश्रमानंतर यश मिळतेच. नेत्याने यशाचे श्रेय आपल्या सहकाऱ्यांना दिले पाहिजे, ही त्यांची धारणा होती. जेव्हा अपयशाचा सामना करावा लागेल, तेव्हा नेत्याने पुढे येऊन त्याची जबाबदारी स्वतःवर घेतली पाहिजे आणि आपल्या सहकाऱ्यांचा बचाव केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी वेळोवेळी घेतली.”
आणखी वाचा >> इस्रोच्या प्रक्षेपकाचे अवशेष ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर कोसळले; स्पेस डेब्रिजबाबत आंतरराष्ट्रीय नियम काय आहेत?
श्रीहरीकोटा अंतराळ केंद्राच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा
श्रीहरीकोटा अंतराळ केंद्राचे निर्माण करण्यातही प्रा. धवन यांचा महत्त्वाचा वाटा होता. अंतराळ केंद्रासाठी या ठिकाणी असलेली दहा हजार झाडे कापावी लागणार होती. पर्यावरणप्रेमी असलेल्या प्रा. धवन यांनी या विषयात स्वतः लक्ष घालून कमीत कमी झाडे कापून अंतराळ केंद्राची निर्मिती कशी होईल, याकडे स्वतः लक्ष घातले. त्यांचे झाड आणि पक्ष्यांवर प्रेम होते. पक्ष्यांच्या उडण्याच्या कौशल्यावर ते प्रभावित झाले होते. या विषयावर संशोधन करून त्यांनी How Birds Fly हे पुस्तकदेखील लिहिलेले आहे.
३ जानेवारी २००२ रोजी जेव्हा प्रा. सतीश धवन यांचे निधन झाले, तेव्हा त्यांचे नाव श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्राला दिले गेले. प्रा. धवन यांनी भारतीय अंतराळ संशोधनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना १९८१ साली पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. इस्रोमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांनी आपले संशोधन कार्य थांबविले नाही. मृत्यू होईपर्यंत ते भारतीय विज्ञान संस्थानाशी जोडले गेलेले होते.