हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. नॅशनल कॉन्फरन्स (एनसी)-काँग्रेसने एक्झिट पोलच्या अंदाजांना मागे टाकत केंद्रशासित प्रदेशातील ९० पैकी ४९ जागा मिळविल्या. आता लवकरच जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स (एनसी)-काँग्रेस सत्ता हाती घेण्यास तयार आहेत. भाजपानेही जम्मू-काश्मीरमध्ये २९ जागा जिंकून चांगली कामगिरी केली. २०१४ च्या तुलनेत भाजपाने चार जागा अधिक जिंकल्या. भारतीय जनता पार्टीच्या विजयी उमेदवारांमध्ये किश्तवाड मतदारसंघातील शगुन परिहार यांचाही समावेश आहे. २९ वर्षीय शगुन परिहार कोण आहेत? जम्मू-काश्मीरमध्ये त्यांच्या विजयाचे महत्त्व काय? जाणून घेऊ.
शगुन परिहार कोण?
भाजपा नेत्या शगुन परिहार यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे दिग्गज नेते व माजी मंत्री सजाद अहमद किचलू यांना ५२१ मतांनी पराभूत करून, किश्तवाड मतदारसंघ जिंकला. किश्तवाड हा मुस्लीमबहुल मतदारसंघ आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, मुस्लीमबहुल जागेवर परिहार यांना २९,०५३ मते मिळाली; तर किचलू यांना २८,५३२ मते मिळाली. जम्मू आणि काश्मीर निवडणुकीत विजयी झालेल्या तीन महिलांपैकी त्या भाजपाच्या एकमेव महिला उमेदवार आहेत. इतर दोन विजयी महिला आमदारांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या सकिना मसूद व शमीमा फिरदौस यांचा समावेश आहे. सकिना मसूद यांनी कुलगाम जिल्ह्यातील डीएच पुरा विधानसभा मतदारसंघ जिंकला; तर शमीमा फिरदौस यांनी श्रीनगर जिल्ह्यातील हब्बाकडल मतदारसंघ जिंकला.
परिहार यांचे वडील अजित परिहार आणि काका अनिल परिहार हे पंचायत निवडणुकीच्या आधी १ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. त्यांचे काका हे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते; ज्यांना जिल्ह्यातील मुस्लीम समाजाचा काही प्रमाणात पाठिंबा होता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या म्हणण्यानुसार, १९९० च्या दशकात भाजपाच्या दोडा बचाओ आंदोलनादरम्यान ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले होते. सध्या शगुन परिहार या इलेक्ट्रॉनिक्समध्ये पीएच.डी. करीत आहेत आणि त्यांनी इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीममध्ये एम. टेक. ही पदवीदेखील मिळवली आहे. त्या जम्मू-काश्मीर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचीही तयारी करीत आहेत. परिहार यांनी आपले संपूर्ण लक्ष शैक्षणिक क्षेत्रावर केंद्रित केले होते. त्यांची राजकारणात येण्याची कोणतीही योजना नव्हती. परंतु, समाजाप्रति असलेल्या कर्तव्याची जाणीव आणि राजकारणातील कौटुंबिक वारसा यांमुळे त्या निवडणुकीत उतरल्या. त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात एकूण ९२.४ लाख रुपयांची संपत्ती घोषित केली आहे.
परिहार यांना उमेदवारी देण्यामागे भाजपाची रणनीती काय होती?
जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड भाग दहशतवाद्यांच्या प्रभावाखाली होता. किश्तवाडमध्ये परिहार यांना उमेदवारी देण्यामागचा उद्देश म्हणजे या प्रदेशातील विविध धार्मिक लोकसंख्येचा पाठिंबा मिळविणे हा होता. हे मुस्लीमबहुल क्षेत्र आहे. त्यामुळे परिहार यांना उमेदवारी दिल्यास मुस्लीम आणि हिंदू समुदाय यांच्यातील दरी कमी होऊन एकात्मतेची भावना वाढेल, अशी आशा पक्षाला होती. परिहार यांनी आपल्या निवडणूक प्रचारात असे नमूद केले की, त्यांना मते त्यांच्या कुटुंबासाठी नाहीत; तर जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबासाठी हवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात त्यांच्या पहिल्या प्रचार रॅलीत परिहार यांच्या दुःखद पार्श्वभूमीचा उल्लेख केला आणि सांगितले की, त्या केंद्रशासित प्रदेशातील दहशतएवाद संपविण्याच्या भाजपच्या संकल्पाचे उदाहरण आहेत. “त्या फक्त आमच्या उमेदवार नाहीत, तर दहशतवाद संपविण्याच्या भाजपाच्या संकल्पाचे एक जिवंत उदाहरण आहेत,” असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते. किश्तवाड हा एनसीचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २०१४ नंतरच भाजपाने प्रथमच या मतदारसंघात आपली पहिली जागा जिंकली होती.
विजयानंतर शगुन परिहार यांचे लक्ष्य काय?
निवडून आल्यावर परिहार यांनी पत्रकारांना सांगितले, “किश्तवाडच्या लोकांनी माझ्यासह माझ्या पक्षावर जो विश्वास दाखविला त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. त्यांच्या पाठिंब्यासाठी जितके आभार मानावे, तितके कमी आहेत. त्यांच्या समर्थनाने मी इथवर पोहोचले आहे.“ आपला विजय जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रवादी जनतेचा आहे,” असेही त्यांनी अधोरेखित केले. “हा जनतेचा आशीर्वाद आहे,” असे त्या म्हणाल्या. ऐतिहासिक आव्हाने पाहता, त्यांनी जनतेला अशी खात्री दिली की, या प्रदेशाची सुरक्षा त्यांच्या उद्दिष्टांच्या सर्वोच्च स्थानी असेल.
हेही वाचा : भूकंप की अणू चाचणी? इराणमधील रहस्यमयी भूकंपामागे नक्की काय?
“लोकांना माझा संदेश आहे की, प्रदेशात शांतता, प्रगती व समृद्धीसाठी प्रयत्न करा. मी प्रदेशाच्या सुरक्षेसाठी काम करीन,” असे परिहार म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “ही निवडणूक केवळ माझ्याच नव्हे, तर देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व कुटुंबांची होती. माझा विजय हा सर्वांचा सन्मान आहे, ज्यांनी दहशतवादाविरुद्ध लढताना आणि देशाचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.” शगुन परिहार यांच्यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही मोठ्या प्रमाणावर प्रचार केला होता. शगुन परिहार यांच्या विजयाद्वारे या प्रदेशातील दहशतवाद थांबविण्यात भाजपाला कितपत यश येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.