बिग बॉसमधील सर्वात लहान स्पर्धक सुंबूल तौकीर खान सध्या चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर सुंबूलवर सगळ्यांची नजर होती शिवाय ती बिग बॉसच्या विजेतेपदाची दावेदार असल्याचीही चर्चा होती, पण गेले काही दिवस तिचा खेळ पाहता सुंबूल सर्वात दुबळी स्पर्धक ठरत आहे. एकूणच बिग बॉसच्या घरातील डावपेच आणि राजकारण यामध्ये ती बरीच मागे पडत असून तिच्याबद्दल बऱ्याच उलट सुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. शिवाय सुंबूल कार्यक्रमात फक्त शालीनसोबत दिसते. दोघांमधील वाढती जवळीक हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे सोशल मीडियावरही तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

नुकतंच सुंबूलच्या वडिलांनी मोठं विधान केलं आहे. ‘आजतक’शी बोलताना तिचे वडील म्हणाले, “मी माझ्या १८ वर्षांच्या मुलीला काहीतरी शिकण्याच्या उद्देशाने बिग बॉसमध्ये पाठवलं होतं. माझ्या मुलीने आयुष्यात कधीच नकारात्मकपणा पाहिलेला नाही. ती नेहमी माझ्या सावलीत राहिली आहे. बिग बॉसमध्ये जाऊन तिने लोकांना समजून घ्यावं, जग किती निष्ठूर आहे हे तिला कळावं अशी माझी अपेक्षा होती” पण आता तिला या कार्यक्रमात पाठवल्याचा पश्चात्ताप होत असल्याचं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलं आहे, तिला होणारा त्रास त्यांना सहन होत नसून तिने लवकरात लवकरात घराबाहेर पडावं अशी त्यांची इच्छा आहे. ही सुंबूल तौकीर नेमकी आहे तरी कोण? बिग बॉसमध्ये जाण्याएवढी ती केव्हा चर्चेत आली होती? ती नेमकी कशामुळे लोकप्रिय झाली याविषयी आपण जाणून घेऊयात.

आणखी वाचा : पत्नी अन् चार मुलं असूनही सलीम खान यांचं अफेअर; कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता सलमानच्या वडिलांनी हेलनशी केलं होतं लग्न

१५ नोव्हेंबर २००३ या दिवशी जन्मलेल्या सुंबूलला घरात लाडाने गूनगून म्हणून हाक मारतात. २०१६ मध्ये सुंबूल ही तिच्या परिवारासह मनोरंजनसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी दिल्लीवरुन मुंबईत आली. मध्यप्रदेशमध्ये हसन खान या प्रसिद्ध कोरिओग्राफरच्या पोटी जन्मलेल्या सुंबूलने मालिकांपासून बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे. सुंबूल ६ वर्षांची असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला तेव्हापासून तिच्या वडिलांनी एकट्याने तिचा आणि तिच्या बहिणीचा सांभाळ केला, त्यांना लहानाचं मोठं केलं.

लहानपणीपासून सुंबूलला नृत्य आणि अभिनयाची आवड होती. शाळेत असतानाही तिने छोट्या नाटकांमध्ये रामलीलामध्ये भाग घेतला होता. तिला मनोरंजसृष्टीत काम करण्यासाठी तिच्या वडिलांनीही चांगलंच सहकार्य केलं. २०११ च्या ‘चंद्रगुप्त मौर्य’ या मालिकेतून तिने या क्षेत्रात पदार्पण केलं. याबरोबरच २०१३ च्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘जोधा अकबर’ या चित्रपटातही सुंबूलने छोटीशी भूमिका साकारली होती. यामध्ये तिने अकबरची भाची म्हणून भूमिका साकारली होती. सुंबूलने ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’सारख्या रीयालिटि शोमध्येसुद्धा भाग घेतला आहे.

आणखी वाचा : तापसी पन्नूची नवी इनिंग, अभिनेत्री दिसणार नव्या भूमिकेत; आगामी थरारपट ओटीटीवर

स्टार प्लसवरील ‘इमली’ या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली आणि तिच्या अभिनयाची लोकांनी दखल घ्यायल सुरुवात केली. या मालिकेत तिने मराठी अभिनेता गशमिर महाजनीबरोबर काम केलं आहे. याबरोबरच आयुष्मान खुरानाच्या ‘आर्टिकल १५’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं आणि तिच्या कामाचं कौतुक झालं. सुंबूलच्या वडिलांनीच तिच्यातील या कलागुणांना वाव दिला आणि या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहनदेखील दिलं. इतर वडिलांप्रमाणे सुंबूलच्या वडिलांचीही तिने आयुष्यात खूप मोठं व्हावं अशी इच्छा आहे, पण एकंदरच बिग बॉसमध्ये गेल्यावर तिचं चारित्र्यहनन होत असल्याचं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे, आणि म्हणूनच सुंबूल लवकर घरातून बाहेर यावी यासाठी ते प्रार्थना करत आहेत.

Story img Loader