उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रयागराजमध्ये यमुना, गंगा आणि सरस्वती नद्यांचे संगम असून याच संगमावर स्नान करण्यासाठी भाविक येतात. या महाकुंभमेळ्यात १३ वर्षांच्या मुलीने संसाराचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. आग्रा येथील राखी सिंहचे कायम आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले आहे. परंतु, प्रयागराज येथील महाकुंभ शिबिराच्या भेटीदरम्यान, तिच्या पालकांसह तिने तिचे जीवन बदलणारा निर्णय घेतला. या किशोरवयीन मुलीला महाकुंभमध्ये सांसारिक जीवनापासून अलिप्त राहण्याची तीव्र भावना जाणवली आणि तिने साध्वी होण्याचा निर्णय घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिच्या पालकांनी या परिवर्तनाला दैवी आवाहन म्हणून पाहत तिच्या निर्णयाला मनापासून पाठिंबा दिला आणि अगदी स्वेच्छेने त्यांच्या मुलीला आश्रमात आणून सोडले, असे एक प्रमुख महंत (धार्मिक नेते) यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. १३ जानेवारीपासून महाकुंभ सुरू होणार आहे. राखी हिला आता गौरी गिरी म्हणून ओळखले जात आहे, ती पवित्र त्याग प्रक्रियेतून जाईल आणि तिच्या नवीन आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करेल. कोण आहे राखी सिंह? तिच्या या निर्णयामागील कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : १६ हजार एकरवर अग्नितांडव; कलाकारांसह अनेकांची घरे भस्मसात, अमेरिकेतल्या भीषण आगीचे कारण काय?

गौरी गिरी कोण आहे?

राखीचे कुटुंब आग्रा येथील आहे. त्यांचा जुना आखाड्याचे महंत कौशल गिरी महाराज यांच्याशी संपर्क आला, त्यांचा मठ सर्वात प्रमुख हिंदू मठांपैकी एक आहे. गेल्या तीन वर्षांपासून महंत कौशल गिरी भागवत कथा सत्र आयोजित करण्यासाठी त्यांच्या गावी येत होते, त्या दरम्यान या कथा सत्राला उपस्थित तिच्या कुटुंबासह आलेल्या राखीवर त्यांच्या शिकवणींचा खोलवर प्रभाव पडला. यापैकी एका सत्रादरम्यान राखीने तिची गुरु दीक्षा घेतली आणि तिच्या आध्यात्मिक मार्गाची सुरुवात झाली, असे पीटीआयला मुलीची आई रीमा सिंह यांनी सांगितले. रीमा यांनी स्पष्ट केले की, महंत कौशल गिरी यांनी ती, मिठाईचा व्यवसाय करणारे तिचे पती संदीप सिंह आणि त्यांच्या दोन मुली म्हणजेच राखी आणि आठ वर्षीय निक्की यांना गेल्या महिन्यात प्रयागराज येथील महाकुंभ शिबिरात सेवा देण्यासाठी आमंत्रित केले होते. येथेच राखीने साध्वी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिच्या आई-वडिलांनी देवाची इच्छा म्हणून तिचा निर्णय स्वीकारला. “एक दिवस राखीने साध्वी होण्याची इच्छा व्यक्त केली. ही देवाची इच्छा आहे असे मानून आम्ही कोणताही आक्षेप घेतला नाही,” असे तिची आई म्हणाली.

महंत कौशल गिरी यांनी पुष्टी केली की, कुटुंबाने स्वेच्छेने त्यांची मुलगी आश्रमाकडे सोपवली आणि हा निर्णय कोणत्याही जबरदस्तीशिवाय मुक्तपणे घेण्यात आला यावर जोर दिला. “कोणतीही जबरदस्ती न करता निर्णय घेण्यात आला, हे कुटुंब काही काळापासून आमच्याशी जोडले गेले आहे आणि त्यांच्या विनंतीवरून राखीला आश्रमात स्वीकारण्यात आले आहे,” असे द्रष्टे म्हणाले. राखीला आता गौरी गिरी या नावाने ओळखले जाईल, जे तिच्या अध्यात्माला समर्पित असलेल्या नवीन जीवनाची सुरुवात आहे.

त्याग प्रक्रिया म्हणजे काय?

राखीचा त्याग हा शतकानुशतके जुन्या परंपरेचा एक भाग आहे. या परंपरेत आध्यात्मिक साधक सांसारिक जीवनापासून अलिप्त होऊन सेवा आणि भक्तीपूर्ण जीवनासाठी स्वतःला समर्पित करतात. या पवित्र प्रक्रियेचा एक भाग म्हणून, राखी पिंड दान समारंभासह धार्मिक विधींमध्ये सहभागी होईल. १९ जानेवारी रोजी ती हे संस्कार पार पाडेल आणि अधिकृतपणे गुरूंच्या आध्यात्मिक कुटुंबाची सदस्य होईल.

तिच्या आईला आपल्या मुलीच्या निर्णयाबद्दल चिंता आहे का असे विचारले असता, राखीची आई रीमा म्हणाली, “एक आई म्हणून मला ती कुठे आणि कशी राहील याची काळजी वाटते. आम्ही आमच्या मुलीला आश्रमात का सोपवले, असा सवाल अनेकदा नातेवाईक करतात. आमचा प्रतिसाद असा आहे की ही देवाची इच्छा होती.” अलीकडच्या वर्षांत, अनेक तरुण व्यक्तींनी जगाच्या सुखसोयी सोडून अध्यात्माला समर्पित जीवनाचा स्वीकार करणे पसंत केले आहे. अशीच एक उल्लेखनीय घटना म्हणजे सुरतमधील आठ वर्षांच्या देवांशी संघवीची. हीरे व्यापाऱ्याची मुलगी देवांशीने आपले विलासी जीवन सोडून जैन साध्वी होणे स्वीकारले.

गेल्या वर्षी गुजरातमधील भावेश भाई भंडारी या व्यावसायिकाची चर्चा झाली होती. ते आणि त्यांची पत्नी एका भव्य समारंभात रथातून जमावावर चलनी नोटांचा वर्षाव करताना दिसले होते, त्यांनी इतर ३३ मुलांसह आणि अनेक जोडप्यांसह अहमदाबादमध्ये भिक्षुत्व स्वीकारण्यासाठी त्यांच्या भौतिक सुखसोयींचा त्याग केला होता.

हेही वाचा : तालिबानशी भारताची चर्चा; काय आहे उद्दिष्ट?

महाकुंभ मेळा

प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाकुंभ जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम आहे. या मेळाव्यासाठी जगभरातून भाविक येतात. यंदाचा मेळा नदीकाठच्या ४००० हेलटर क्षेत्रावर होणार आहे. दर १२ वर्षांनी प्रयागराज मध्ये पूर्ण कुंभ मेळा आयोजित केला जातो, तसेच प्रयगराजमध्ये १४४ वर्षांनी आयोजित होणाऱ्या कुंभला महाकुंभ मेळा म्हणतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is the 13 year old girl who has decided to become sadhvi at maha kumbh rac