हृषिकेश देशपांडे
उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघ हा गांधी कुटुंबाचा परंपरागत मतदारसंघ. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव केला. अर्थात राहुल हे अमेठीबरोबरच केरळमधील वायनाडमधूनही उभे होते. तेथून ते विजयी झाले. लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशातून यश मिळाल्याखेरीज सत्ता मिळणे कठीण असते. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये गुजरातबरोबरच उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून निवडणूक लढवत जिंकली. आता यंदा राहुल गांधी वायनाडबरोबरच अमेठीतून लढणार काय, याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसकडून याबाबत काही स्पष्टता नाही. मात्र अमेठीतून राहुल गांधी लढल्यास काँग्रेसला त्याचा लाभ होईल असे इंडिया आघाडीचे गणित आहे. डाव्या पक्षांनीदेखील राहुल यांना हेच सांगितले आहे. आपली लढाई भाजपशी आहे, तर मग केरळमधून का लढता, असा त्यांनी सवाल केलाय.

अमेठीतील समीकरणे

हा मतदारसंघ १९६७ मध्ये अस्तित्वात आला. १९८० पासून अमेठीवर गांधी कुटुंबाचे वर्चस्व आहे. राहुल यांचे काका संजय, वडील राजीव तसेच आई सोनिया गांधी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २००४मध्ये राहुल गांधी येथून सलग तीनदा विजयी झाले, मात्र २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला. या मतदारसंघाअंतर्गत पाच विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपचे तीन तर समाजवादी पक्षाचे दोन आमदार आहेत. यावरून मतदारसंघातील राजकीय पक्षांची ताकद ध्यानात येते. अमेठीच्या आसपास रायबरेली तसेच सुलतानपूर हे गांधी कुटुंबाचा प्रभाव असलेले लोकसभा मतदारसंघ मोडतात. राज्यात काँग्रेसचे दोनच आमदार असून, लोकसभेला या मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर काँग्रेस अवलंबून आहे. 

Rajendra Gavit, Palghar Assembly Constituency,
राजेंद्र गावित पालघरसाठी आग्रही
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
BJP Thackeray group thane,
ठाण्यात भाजप, ठाकरे गटाचा संयुक्त मोर्चा ? कोलशेतमध्ये स्थानिकांच्या रोजगारासाठी ग्रामस्थांनी काढला मोर्चा
lok sabha mp and actress kangana ranaut
Kangana Ranaut : “शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या”; कंगना रनौत यांचं विधान चर्चेत!
ubt chief uddhav thackeray slam maharashtra government over badlapur incident
विरोधकांचे आंदोलन; भाजपचा जागर; आरोपीला पाठीशी घालण्याचे काम – ठाकरे
Woman Naxal Commander, Woman Naxal murder,
नक्षलवाद्यांकडून महिला नक्षल कमांडरची हत्या; पोलिसांशी संबंध असल्याच्या संशयातून…
Raj Thackeray, Gondia, Raj Thackeray on Badlapur,
“बदलापूरची घटना मनसे पदाधिकाऱ्यांमुळे उघड,” राज ठाकरे यांचा दावा
Neelam Gorhe, Maha vikas Aghadi, Ladki Bahin yojana,
Neelam Gorhe : महिलांचा सरकारवरील विश्वास उडावा म्हणून षडयंत्र, लाडकी बहीण योजनेवर नीलम गोऱ्हे यांचे विधान

हेही वाचा >>>प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?

भाजपची मुसंडी

भाजपच्या आघाडीच्या फळीतील नेत्या अशी स्मृती इराणी यांची ओळख. केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली आहेत. २०१४ मध्ये लाखभराच्या मताधिक्याने पराभूत झाल्यावर सातत्याने त्यांनी मतदारसंघात संपर्क ठेऊन राहुल यांना २०१९ मध्ये पराभूत केले. काँग्रेससाठी हा धक्का होता. आता पुन्हा हा मतदारसंघ काबीज करणे काँग्रेससाठी आव्हानात्मक आहे. राज्यात भाजपचे सरकार असून, पक्षाकडे तगडी प्रचारयंत्रणा दिसते. राहुल यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने येथील मतदारांशी संवाद साधला असला, तरी राज्यात काँग्रेसची संघटना फारशी प्रभावी नाही. सोनिया गांधी यांची राज्यसभेवर निवड झाल्याने शेजारच्या रायबरेली मतदारसंघात त्या उमेदवार नसतील. त्याचाही काही प्रमाणात फटका अमेठीत पक्षाला बसेल.

हेही वाचा >>>‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय

रॉबर्ट वढेरा की राहुल गांधी?

प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा हे अमेठीतून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे. अलीकडेच एका मुलाखतीत वढेरा यांनी त्याबाबत संकेतही दिले आहेत. अर्थात राहुल हे जर उमेदवार असतील तर त्यांचा प्रचार करेन असेही त्यांनी स्पष्ट केले. सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यासाठी देशभरातून मला कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत आहे, विशेषत: अमेठीतून अधिक आग्रह आहे असे सांगत, रिंगणात उतरण्याचे सूचित केले. येथे १९९९ पासून प्रचार करत आहे. अमेठीतील जनतेला २०१९ ची चूक दुरुस्त करण्याची इच्छा असल्याचा दावा रॉबर्ट वढेरा यांनी केला. एकूणच मुलाखतीचा त्यांचा सूर पाहता गांधी कुटुंबातीलच उमेदवार अमेठीतून असेल हे स्पष्ट होत आहे. अमेठी तसेच रायबरेलीत पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान असून, काँग्रेस पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे उमेदवारीबाबत उत्सुकता आहे.

मतदारसंघाचे महत्त्व

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रमुख विरोधी पक्षाचा दर्जाही मिळवता आला नाही. लोकसभेच्या सदस्य संख्येच्या किमान दहा टक्के जागा सर्वात मोठ्या विरोधी पक्षाला जिंकता आल्या पाहिजेत. हिंदी भाषिक पट्ट्यात जोपर्यंत काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा होत नाही तोपर्यंत पक्षाला मोठे यश मिळणे कठीण आहे. यासाठीच उत्तर प्रदेशातील अमेठी, रायबरेली या जागा काँग्रेससाठी महत्त्वाच्या ठरतात. या जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्यास देशभर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संदेश जाऊन, आत्मविश्वास निर्माण होईल. दक्षिणेतील केरळमधील वायनाडची जागा काँग्रेससाठी सुरक्षित मानली जाते. तेथील यशापेक्षा अमेठीतील विजय, तो देखील केंद्रीय मंत्र्यांचा पराभव करणारा हा काँग्रेससाठी वेगळा ठरेल. गांधी कुटुंबाने जर येथून माघार घेतली तर भाजपसाठी हा आयताच मुद्दा मिळेल. उत्तर प्रदेशातून त्यांनी पळ काढला असा आरोप भाजप करणार यात शंका नाही. यामुळेच अमेठीतून लढणे हे गांधी कुटुंबासाठी महत्त्वाचे आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाशी त्यांची युती आहे. मित्र पक्ष त्यांच्यासाठी किती ताकद लावतो यावरही अमेठीतील राजकीय गणिते अवलंबून असतील.

hrishikesh.deshpande@expressindia.com