सिद्धार्थ खांडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
व्लादिमीर पुतीन यांच्या उन्मादासमोर आणि बलाढ्य रशियन फौजा राजधानी कीव्हच्या वेशीवर येऊन धडकल्यानंतरही कीव्हमध्ये राहून युक्रेनचे ठामपणे नेतृत्व करणारे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हे या युद्धातील आतापर्यंतचे प्रमुख नायक (हिरो) ठरले आहेत. त्यांच्यासमोरील आव्हान अजिबात सोपे नव्हते आणि रशियाने अण्वस्त्रदलेच सज्ज केल्यामुळे वाटाघाटी करण्यावाचून पर्याय नसल्याचेही झेलेन्स्की यांच्या ध्यानात आले आहे. परंतु या अत्यंत कसोटीच्या काळात देश सोडून जाण्याची संधी असतानाही धोका पत्करून झेलेन्स्की राजधानीत राहिले आणि युक्रेनवासियांना मानसिक बळ देतानाच कोणत्याही क्षणी त्यांनी स्वतःचा निर्धार सैल होऊ दिला नाही हे विशेष.
कोण हे झेलेन्स्की?
युक्रेनचे निर्नाझीकरण करण्याचा चंग पुतीन यांनी बांधला आहे आणि त्यांनी विशेषतः झेलेन्स्की यांच्यावर वैयक्तिक आरोप सातत्याने केले. परंतु खुद्द झेलेन्स्की हे यहुदी आहेत. युक्रेनच्या आग्नेयेकडील एका शहरात ते वाढले. त्यांचे कुटुंबीय रशियन भाषा बोलायचे. झेलेन्स्की यांना इस्रायलमध्ये जाऊन उच्च शिक्षण घ्यायचे होते. पण त्यांच्या वडिलांनी युक्रेनमध्येच शिकण्याचा सल्ला दिला. तो मानून झेलेन्स्की यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. तेथून काहीसे अनपेक्षितपणे अभिनयाकडे वळले. युक्रेनचे अध्यक्ष होण्यापूर्वी विनोदी अभिनेते म्हणून ते लोकप्रिय होते. या लोकप्रियतेचाच त्यांना अध्यक्षपदी निवडून येण्यासाठी मोठा उपयोग झाला. त्यांनी रंगवलेले एक पात्र राजकारणातील भ्रष्टाचाराला कंटाळून स्वतःच एक दिवस राष्ट्राध्यक्ष बनते! झेलेन्स्की यांच्या बाबतीतही तेच घडले.
मध्यममार्ग, विनोदबुद्धी, निर्धाराचा आधार…
युक्रेनमध्ये युक्रेनियन आणि रशियन भाषकांमधील दरी खूप मोठी आहेत. परंतु झेलेन्स्की यांनी ती मिटवण्याचा प्रयत्न केला. युक्रेनला यहुदीविरोधाचा मोठा इतिहास. परंतु इस्रायलव्यतिरिक्त यहुदी राष्ट्रप्रमुख असलेला युक्रेन हा एकमेव देश आहे हे फार कुणाला ठाऊक नाही. रशियन भाषकांच्या संख्येचे अवडंबर माजवत पुतीन युक्रेनचे एकामागोमाग एक प्रांत गिळंकृत करत निघाले आहेत. झेलेन्स्की यांनी वंश, भाषा, विचारधारा, इतिहास यांच्या आधारावर दुभंगलेल्या युक्रेनला सांधण्याचा प्रयत्न केला हे त्यांच्या लोकप्रियतेचे गमक आहे. संकटसमयीदेखील त्यांची विनोदबुद्धी शाबूत आहे. रशियन आक्रमणाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांनी ट्विटरवरून दर्शन दिले आणि झेलेन्स्की देश सोडून पळून गेल्याच्या रशियन प्रचाराला सडेतोड प्रत्युत्तर दिले. अमेरिकेने त्यांना देश सोडून देण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले, त्यावेळी मला दारूगोळा हवा, ‘राईड’ नको असे उत्तर त्यांनी दिले! कोणत्याही परिस्थितीत युक्रेनचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य रशियाला सुपूर्द करायचे नाही हा त्यांचा निर्धार जगभरातील असंख्यांना भावला.
चाचपडती सुरुवात, मग उभारी…
झेलेन्स्की हे काही मुरलेले राजकारणी नव्हेत. त्यामुळे युक्रेनच्या भवितव्यासाठी त्यांच्याकडे ठोस कार्यक्रम वगैरे काही नव्हता. २०१४मध्ये रशियाधार्जिणे अध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांचे सरकार उलथून टाकल्यावर बिथरलेल्या पुतीन यांनी क्रिमियावर ताबा मिळवला. त्यातून युक्रेनमधील जनमत प्रक्षुब्ध झाले. या घटनेनंतर वर्षभरातच युक्रेनच्या एका वाहिनीवरून एक मालिका दाखवली जाऊ लागली. त्या मालिकेचा नायक एक शाळामास्तर होता, जो झेलेन्स्की यांनी रंगवला. भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांविरोधात भूमिका घेत हे मास्तर चक्क युक्रेनचे अध्यक्ष बनतात अशी ही कथा. रशियाविरोधी जनमत, युक्रेनच्याही आघाडीच्या भ्रष्ट राजकारण्यांविरोधात गेलेली विशेषतः युवा पिढी अशा वातावरणात नंतर झेलेन्स्की निवडणुकीस उभे राहिले आणि निवडूनही आले. सत्य कल्पिताहून अद्भुत असल्याचाच तो प्रकार होता. परंतु रशियाची पकड असलेल्या दोन्बास टापूत शस्त्रसंधी घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. शिवाय पुतीन यांच्या गुरकावण्यांसमोर सुरुवातीला झेलेन्स्की पुरेसे बावचळून गेल्याचेही दिसून आले. अमेरिका आणि नाटो देशांच्या प्रभावाखाली येऊन त्या संघटनेत जाण्याची थोडी अपरिपक्व घाई झेलेन्स्की यांना झाली. या काळात त्यांची लोकप्रियताही ओसरली होती. परंतु रशियन आक्रमणानंतर ते पुन्हा निर्धाराने उभे राहिले. पुतीन यांच्या २६ फेब्रुवारीच्या युद्धपूर्व प्रदीर्घ धमकीवजा भाषणावर झेलेन्स्की इतकेच म्हणाले, की इतिहासाचा तास ऐकण्याची आमची इच्छा नाही. वर्तमान आणि भविष्याचीच आम्हाला चिंता वाटते!