गेल्या आठवड्यात इराणमधील तेहरान येथे इस्त्रायली हल्ल्यात इस्माईल हानिया याची हत्या करण्यात आली. ७ ऑक्टोबरला इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून या हत्येकडे पाहिले गेले. इस्माईल हानिया याच्या मृत्यूनंतर हमासचा प्रमुख कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, आता हमासचा प्रमुख म्हणून याह्या सिनवार याचे नाव समोर आले आहे. याह्या सिनवार लवकरच या दहशतवादी गटाचा पुढील प्रमुख होणार आहे. इस्रायलवर ७ ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याचा तो सूत्रधार मानला जातो. हा हल्ला इस्रायलच्या इतिहासातील सर्वांत प्राणघातक हल्ला होता. पश्चिम आशियातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता ही घोषणा करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे हानियाच्या हत्येनंतर इराणने इस्रायलचा बदला घेण्याचे वचन दिले आहे. इस्रायली तुरुंगात याह्या सिनवारबरोबर अनेक वर्षे असणारा हमास सदस्य अबू अब्दल्लाह याच्या मते, याह्या सिनवारमध्ये उत्कृष्ट निर्णयक्षमता आहे. “तो अत्यंत शांततेने निर्णय घेतो; परंतु हमासच्या हिताचे रक्षण करताना तो अडखळतो,” असे अबू अब्दल्लाहने याह्या सिनवार २०१७ मध्ये गाझा प्रमुख झाल्यानंतर ‘एएफपी’ला सांगितले होते. याह्या सिनवार आधीपासूनच इस्रायलच्या हिट लिस्टवर होता; परंतु या घोषणेनंतर तो त्यांचे सर्वांत मोठे लक्ष्य असेल. कोण आहे याह्या सिनवार? जाणून घेऊ.
हेही वाचा : बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू धोक्यात; भारतासमोर हिंदू निर्वासितांच्या आश्रयाचे संकट?
प्रारंभिक जीवन आणि हमासचा अतिरेकी
सिनवारचा जन्म दक्षिण गाझा येथील खान युनिस निर्वासित शिबिरात झाला. जेव्हा १९८७ मध्ये पहिला पॅलेस्टिनी इंतिफादा (संघर्ष) सुरू झाला तेव्हा शेख अहमद यासीनने एक गट तयार केला होता. त्याच वर्षी सिनवार हमासमध्ये सामील झाला. इस्त्रायलला माहिती पुरविल्याचा आरोप असलेल्या पॅलेस्टिनींना बाहेर काढण्याबरोबरच निर्दयीपणे शिक्षा देण्यासाठी सिनवारने त्याच्या पुढच्या वर्षी गटाची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा स्थापन केली. तसेच, या यंत्रणेच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. इस्रायली माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या प्रतिलिपीनुसार, सिनवारने खान युनिस स्मशानभूमीत कथित सहकाऱ्याचा स्कार्फने गळा दाबल्याची कबुली दिली होती. गाझामधील इस्लामिक विद्यापीठातून त्याने पदवी प्राप्त केली होती. इस्त्रायली तुरुंगातील २३ वर्षांच्या काळात सिनवार परिपूर्ण हिब्रू शिकला. त्याला इस्रायली संस्कृती आणि समाजाची सखोल माहिती असल्याचे म्हटले जाते.
चार वेळा जन्मठेपेची शिक्षा
२०११ मध्ये सिनवारला इस्रायली सैनिक गिलाड शालित याच्या बदल्यात सोडण्यात आले होते. सिनवारसह इतर १,०२७ पॅलेस्टिनींनादेखील सोडण्यात आले होते. इस्रायलमध्ये तो दोन इस्रायली सैनिकांच्या हत्येबद्दल जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याला चार वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हमासचे, गाझामधील चळवळीचे संपूर्ण नेतृत्व घेण्यापूर्वी सिनवार एजेदिन अल-कसाम ब्रिगेड या लष्करी शाखेचा वरिष्ठ कमांडर झाला. एकीकडे हानियाने एक सामान्य चेहरा म्हणून हमासच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले होते; तर सिनवारने अधिक हिंसक मार्गाने पॅलेस्टाईनचा मुद्दा पुढे आणण्यास प्राधान्य दिले आहे. हमासच्या नियंत्रणाखालील गाझामधील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलने केलेल्या हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यात पॅलेस्टिनी प्रदेशात किमान ३९,६५३ लोक मारले गेले आहेत.
पॅलेस्टिनी राज्याचे स्वप्न
सिनवारचे एका पॅलेस्टिनी राज्याचे स्वप्न आहे; ज्यात वेस्ट बँकेच्या नियंत्रणातील गाझा पट्टी, महमूद अब्बासच्या फताह पक्षाच्या नियंत्रणाखालील पूर्व जेरुसलेमचादेखील समावेश असेल. यूएस थिंक-टँक द कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सच्या मते, २००६ च्या निवडणुकांनंतर फताह आणि हमास यांच्यात वाद आहे. ते एकत्र येणे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, इस्रायलशी नोव्हेंबरमध्ये झालेल्या संक्षिप्त युद्धविराम कराराच्या परिणामी कैद्यांची सुटका झाल्याने वेस्ट बँकमध्ये हमासची लोकप्रियता वाढल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा : भारतीय वंशाच्या न्यायमूर्तींनी गूगल विरोधात दिला महत्त्वाचा निकाल; कोण आहेत अमित मेहता? नेमकं प्रकरण काय?
पॅरिसमधील अरब सेंटर फॉर रिसर्च अॅण्ड पॉलिटिकल स्टडीज (CAREP)च्या लाईला सेउरत यांच्या मते सिनवारने राजकारणात व्यावहारिक होण्याचा मार्ग अवलंबला आहे. “तो इस्रायलशी वाटाघाटी घडवून आणण्यासाठी बळाचा वापर करतो”, असे त्या म्हणाल्या. २०१५ मध्ये हमास प्रमुखाचा अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यात आला होता. गाझाबाहेरील सुरक्षा सूत्रांचे म्हणणे आहे की, सिनवारने इस्रायली बॉम्बचा सामना करण्यासाठी बांधलेल्या बोगद्यांच्या नेटवर्कमध्ये आश्रय घेतला आहे. इस्रायली संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी नोव्हेंबरमध्ये सिनवारला शोधून काढण्याचे वचन दिले होते.
© IE Online Media Services (P) Ltd