हमासचा क्रमांक दोनचा नेता सालेह अरोरी याचा लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये झालेल्या स्फोटामध्ये मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणी स्वीकारली नसली, तरी संशयाची सुई इस्रायलकडेच आहे. काही इस्रायली नेत्यांनी जवळजवळ तशी कबुलीही दिली आहे. अशा ‘टिपून हत्यां’मुळे अल्पविजयाचे समाधान मिळत असले, तरी दीर्घकाळासाठी नुकसानच अधिक होत असल्याच्या या पार्श्वभूमीवर अरोरीच्या हत्येची कारणे आणि परिणामांचा हा आढावा…
बैरुतमधील स्फोटामागे इस्रायलचा हात?
बैरुतमधील एका इमारतीमध्ये बुधवारी स्फोट झाला. यामध्ये अरोरीसह अन्य सहा जणांचा मृत्यू झाल्याचे लेबनॉनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार इमारतीचा विशिष्ट मजला लक्ष्य करून ड्रोनमधून क्षेपणास्त्र डागल्यामुळे हा स्फोट झालेला असू शकतो. अर्थात याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नसला तरी इस्रायलने यापूर्वी अनेकदा असे ड्रोन वापरून हल्ले केले आहेत. इस्रायल अशा ‘टिपून हत्यां’ची जबाबदारी अभावानेच स्वीकारतो. मात्र त्या देशातील अनेक नेत्यांनी अरोरीच्या हत्येचा जाहीर उदो-उदो करून आपले काही पत्ते उघड केले आहेत.
हेही वाचा : विश्लेषण : हाजीमलंग की श्रीमलंगगड…? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याविषयी जाहीर बोलण्याची गरज का भासली?
सालेह अरोरीची हत्या कशामुळे?
अरोरी हा हमासचा सर्वोच्च राजकीय नेता इस्माइल हानिये याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा नेता मानला जात होता. पश्चिम आशियात हमासचे जाळे विणण्याचे श्रेय अरोरीला जाते. इराणच्या ‘प्रतिकारअक्षा’तील (ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स) एक महत्त्वाचा चेहरा अशी त्याची ओळख होती. लेबनॉनमधील हेजबोला आणि सीरियातील बंडखोरांना इराणच्या जवळ नेण्यात अरोरीचा महत्त्वाचा सहभाग मानला जातो. सीरियातील यादवीनंतर बंडखोर आणि राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांच्यात समेट घडवून आणण्याचे कामही अरोरीने केले होते. एकूणच ज्या कोणी अरोरीची हत्या केली आहे, त्याने केवळ हमास नव्हे तर हेजबोला, सीरियन बंडखोर इराण या सर्वांना एकाच वेळी धक्का दिला आहे. २०१४ साली तीन इस्रायली तरुणांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात त्याचा हात होता. तेव्हापासून इस्रायल अरोरीवर डूख धरून होता.
‘टिपून हत्यां’चा उपयोग किती?
हमाससारख्या अतिरेकी संघटनांमध्ये एखाद्या नेत्याला टिपल्याचा अल्पकाळासाठीच परिणाम होत असल्याचा इतिहास आहे. उदाहरणार्थ, १९९२ मध्ये हेजबोलाच्या तत्कालीन नेत्याला इस्रायलने हवाई हल्ल्यात ठार केल्यानंतर विद्यमान नेता हसन नरसल्ला याचा उदय झाला. आता तो त्याच्या पूर्वसुरींपेक्षा इस्रायलला अधिक त्रासदायक ठरला आहे. मात्र इस्रायलने या पद्धतीचा प्रभावी वापर यापूर्वी एकदा केला आहे. २००४ मध्ये हमासच्या राजकीय शाखेचा नेता अब्देल अझिझ रन्तिसी आणि या गटाचा संस्थापक धर्मगुरू अहमद यासिन यांच्या एका महिन्याच्या अंतराने हत्या झाल्या. परिणामी हमासच्या नेतृत्वात पोकळी निर्माण झाली आणि अंतर्गत सत्तासंघर्ष चिघळला. यामुळे २०००च्या दशकात ‘इत्तिफाद’ (पॅलेस्टिनी मुक्तिसंग्राम) नियंत्रणात आला, असे मानले जाते. मात्र अरोरीला मारून इस्रायलला तोच परिणाम साधता येईल का, याची अनेकांना शंका आहे. कारण उच्चपदस्थ नेते मारले गेल्याचा परिणाम हा मध्यवर्ती नेतृत्व असलेल्या संघटनांमध्ये अधिक होतो. हमासची रचना ही विस्कळीत स्वरूपाची आहे. धार्मिक, राजकीय, लष्करी अशा वेगवेगळ्या शाखा आहेत. शिवाय गाझा आणि वेस्ट बँक परिसराखेरीज पश्चिम आशियातील अन्य देशांमध्येही त्यांचे नेते पसरलेले आहेत.
हेही वाचा : मोफत कायदेशीर मदतीसंदर्भात भारतीय कायदा काय सांगतो? ही मदत कुणाला मिळते? कशी?
संघर्ष चिघळण्याची शक्यता किती?
विविध देशांतील सशस्त्र बंडखोर संघटनांचे नेते आणि त्यांच्या पाठीराख्यांशी वैयक्तिक पातळीवर अरोरीचे चांगले संबंध होते. तो मारला गेल्यामुळे पश्चिम किनारपट्टी – लेबनॉन- सीरिया आणि इराण यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा निखळल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे त्याची जागा लगेच घेऊ शकेल असा दुसरा नेता सध्या तरी हमासमध्ये नाही. अरोरीची हत्या इस्रायलने केली असेलच, तर ती या पातळीवर यशस्वी ठरेल. मात्र आता हमास या हत्येचा बदला घेण्यासाठी इस्रायलवर एखादा मोठा आघात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय ही हत्या लेबनॉनमध्ये झाली आहे, हा आणखी एक कळीचा मुद्दा आहे. हेजबोला आणि इस्रायलमध्ये अधूनमधून चकमकी झडत असल्या तरी इस्रायलच्या उत्तर आघाडीवर सर्वंकष युद्धाला तोंड फुटलेले नाही. आता हमासचा वजनदार नेता लेबनॉनच्या भूमीत मारला गेल्याने हेजबोला संघटनेला युद्धात खेचण्याचा हमासकडून प्रयत्न होऊ शकतो. गाझा पट्टीच्या पलीकडे संघर्ष चिघळू नये यासाठी युरोप-अमेरिकेसह अन्य अरब राष्ट्रांचे प्रयत्न सुरू असले तरी अरोरीच्या हत्येमुळे परिस्थिती वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे.
amol.paranjpe@expressindia.com