अन्वय सावंत
महिलांच्या प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पहिल्या पर्वातील पाच संघांची लिलावप्रक्रिया बुधवारी (२५ जानेवारी) पार पडली. पाच संघांच्या विक्रीतून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तब्बल ४६६९.९९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘अदानी स्पोर्ट्सलाइन’ने १२८९ कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावत अहमदाबाद येथील संघाचे मालकी हक्क मिळवले. तसेच पुरुषांच्या ‘आयपीएल’मधील तीन संघांच्या मालकांनी ‘डब्ल्यूपीएल’मधील संघही खरेदी केले आहेत.
अदानी समूहाने हजार कोटींहून अधिकची बोली का लावली?
विश्वातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने २०२१ मध्ये ‘आयपीएल’मधील लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघांच्या खरेदीसाठी बोली लावली होती. मात्र, त्यावेळी त्यांना मालकी हक्क मिळवण्यात अपयश आले होते. त्यामुळे ‘डब्ल्यूपीएल’मधील संघाच्या खरेदीसाठी अदानी समूहाने सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरले. त्यांनी अहमदाबाद, बंगळूरु, चेन्नई, गुवाहाटी आणि कोलकाता या पाचही शहरांवर १२८९ कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावली. ‘बीसीसीआय’च्या नियमांनुसार, एकाच कंपनी/समूहाने एकाहून अधिक शहरांवर सर्वाधिक बोली लावल्यास त्यांना एका शहराला पसंती देण्याची संधी मिळते. अखेरीस अदानी समूहाने अहमदाबादचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला. तसेच संघांची लिलावप्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांनी या संघाचे नाव ‘गुजरात जायंट्स’ असेल अशी घोषणा केली. हा संघ अहमदाबाद येथील १ लाख ३२ हजार आसनसंख्या असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आपले घरचे सामने खेळेल.
‘आयपीएल’मधील कोणत्या संघांनी ‘डब्ल्यूपीएल’मधील संघ खरेदी केले?
‘आयपीएल’मधील मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांनी ‘डब्ल्यूपीएल’मध्ये याच शहरांचे प्रतिनिधित्व करणारे संघ खरेदी करण्यासाठी अनुक्रमे ९१२.९९ कोटी, ९०१ कोटी आणि ८१० कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. तसेच ‘काप्री ग्लोबल होल्डिंग्ज’ने लखनऊ येथील संघाचे मालकी हक्क ७५७ कोटी रुपयांत प्राप्त केले. रॉयल चॅलेंजर्स समूहाने कोलकाता (६९१ कोटींची बोली) येथील संघ खरेदी करण्यासाठीही बोली लावली होती. मात्र, त्यांनी अखेरीस बंगळूरु येथील संघच खरेदी करण्यास पसंती दिली.
कोणत्या शहरांवर सर्वाधिक कंपन्या/समूहांनी बोली लावली?
दक्षिण भारतातील दोन मोठी शहरे असलेल्या बंगळूरु आणि चेन्नई यांवर ‘डब्ल्यूपीएल’च्या संघ लिलावात सर्वाधिक कंपन्या/समूहांनी बोली लावली. या दोन शहरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्येकी १२ कंपन्या/समूह उत्सुक होते. मात्र, अखेरीस चेन्नईची मालकी कोणीही मिळवली नाही. त्यानंतर इंदूरवर ११ कंपन्या/समूहांनी बोली लावली. मुंबईचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केवळ चार कंपन्या/समूह उत्सुक होते.
मुंबईच्या मालकांची योजना सर्वांत वेगळी का ठरली?
पाच वेळा ‘आयपीएल’ विजेत्या मुंबई इंडियन्सची मालकी असणाऱ्या ‘इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ने ‘डब्ल्यूपीएल’मधील संघाच्या खरेदीसाठी सर्वांत वेगळी योजना आखली. त्यांनी आठ शहरांवर बोली लावली आणि प्रत्येक बोलीमध्ये ०.०३ कोटी रुपयांचा फरक होता. त्यांनी गुवाहाटीवर ९१२.७८ कोटी, इंदूरवर ९१२.८१ कोटी, लखनऊवर ९१२.८४ कोटी, कोलकातावर ९१२.८७ कोटी आणि मुंबईवर ९१२.९९ कोटी रुपयांची बोली लावली. अखेरीस त्यांनी मुंबईचे प्रतिनिधित्व करण्यास पसंती दिली. मुंबई इंडियन्सकडे ‘आयपीएल’ व ‘डब्ल्यूपीएल’सह अमिराती येथील ‘आयएलटी२०’ आणि दक्षिण आफ्रिकेतील ‘एसए२०’ या स्पर्धांमधील संघांचीही मालकी आहे.
‘बीसीसीआय’कडून काय प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली?
‘‘क्रिकेटसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. ‘डब्ल्यूपीएल’मधील संघांच्या विक्रीने २००८ मध्ये पुरुषांच्या ‘आयपीएल’मधील संघांच्या विक्रीसाठी लावण्यात आलेल्या बोलींचा विक्रम मोडला आहे. संघांची मालकी मिळवलेल्यांचे अभिनंदन. आम्हाला संघांच्या विक्रीतून एकूण ४६६९.९९ कोटी रुपये इतकी रक्कम मिळाली आहे,’’ अशी प्रतिक्रिया ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी व्यक्त केली. अनेकांकडून या स्पर्धेला महिला ‘आयपीएल’ म्हणून संबोधले जात होते. मात्र, या स्पर्धेचे नाव ‘महिलांची प्रीमियर लीग’ (डब्ल्यूपीएल) असे ठेवण्यात आल्याचेही शाह यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वीच ‘डब्ल्यूपीएल’च्या पहिल्या पाच पर्वांसाठीचे प्रसारण हक्क ‘व्हायकॉम १८’ने ९५१ कोटी (सामन्यामागे ७.०९ कोटी) रुपयांना मिळवले होते. ‘डब्ल्यूपीएल’ची खेळाडू लिलावप्रक्रिया फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित असून मार्चमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.