झोप आणि मानवी आरोग्याचा जवळचा संबंध आहे. दिवसभर आलेला थकवा, कंटाळा झोपल्यानंतर नाहीसा होतो. पूर्ण झोप ही कधीही आरोग्यासाठी लाभदायकच असते. माणसाने दिवसातून कमीत कमी आठ तास झोपायला हवे, असे सांगितले जाते. मात्र, खरंच आठ तासांची झोप मानवासाठी पुरेशी आहे का? असे विचारले जाते. याच पार्श्वभूमीवर किती तास झोपावे? झोपेच्या सवयीत अनियमितता असेल तर शरीरावर काय परिणाम होतो? हे जाणून घेऊ या…
नियमितपणे किती तास झोपता, हे अधिक महत्त्वाचे
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कमीत कमी आठ तास झोप मिळतेच असे नाही. मात्र, एखाद्या व्यक्तीला रोज आठ तास झोप मिळत नाही, म्हणजे तिचा अकाली मृत्यू होईल किंवा त्याला अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागेल, असे गृहित धरणे चुकीचे आहे. तुम्ही रोज किती तास झोपता, यापेक्षा तुम्ही नियमितपणे किती तास झोपता, हे अधिक महत्त्वाचे आहे. याबाबत वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. या अभ्यासानुसार झोपेच्या तासांपेक्षा नियमित झोप अधिक महत्त्वाची आहे.
झोपेची वेळ, नियमितता का महत्त्वाची?
रोज सहा तासांची नियमित झोप आठ तासांच्या अनियमित झोपेपेक्षा अधिक चांगली आहे. नियमितपणे रोज सहा तास झोप झाली तरी आरोग्य उत्तम राहते. म्हणजेच तुम्ही किती तास झोपता यासह तुमच्या झोपेत सलगता आहे का? ही बाबदेखील तेवढीच महत्त्वाची आहे.
अनियमित झोपेमुळे आजार वाढण्याची शक्यता?
याबाबत जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशनने २००३ सालचा एक अभ्यास प्रदर्शित केला. या अभ्यासानुसार अनियमित झोपेमुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार वाढण्याची शक्यता असते. त्यापेक्षा रोज ठराविक तास झोपणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत रोजच्या झोपेत साधारण एक आठवडा किंवा दोन तासांची अनियमितता असणाऱ्या व्यक्तीच्या धमन्यांत कॅल्सिफाईड फॅट्स जमा होण्याची शक्यता अधिक असते. अनियमित झोपेमुळे आरोग्याच्या अन्य समस्यादेखील निर्माण होऊ शकतात.
झोप कशी लागते हेदेखील गरजेचे
Mind Ease च्या संकेतस्थळावर नियमित झोपेच्या महत्त्वाबद्दल सविस्तर सांगण्यात आलेले आहे. “आपल्याला रोज सलग आणि ठराविक तास झोप घेण्याची सवय असेल तर आपल्या शरीराला स्वत:मध्ये सुधारणा करण्याची संधी मिळते. तुम्ही नियमितपणे किती तास झोपता हे महत्त्वाचे नाही, तर तुम्हाला झोप कशी लागते, यावरही तुमचे आरोग्य अवलंबून आहे”, असे Mind Ease च्या संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे.
प्रत्येकाला सारख्याच तासांची झोप पाहिजे का?
गोल्डस्मिथ्स युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधील मानसशास्त्राच्या प्राध्यापिका ॲलिस ग्रेगरी यांनी प्रत्येकाला किती तासांची झोप आवश्यक आहे, याबाबत सांगितले आहे. “प्रत्येक माणसाला कमी-अधिक प्रमाणात झोपेची आवश्यकता असते. यासह माणसाच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यात आवश्यक असणाऱ्या झोपेचा कालावधी बदलतो. काही लोकांसाठी सहा तासांची झोपदेखील पुरेशी असते”, असे ग्रेगरी म्हणाल्या. नॅशनल स्लीप फाऊंडेशन या संस्थेने माणसाला किती तासांची झोप आवश्यक आहे, याबाबत सांगितलेले आहे. यासह आठ तासांपेक्षाही कमी-अधिक प्रमाणातील झोपदेखील पुरेशी आहे, असे नॅशनल स्लीप फाऊंडेशनने सांगितल्याचे ग्रेगरी म्हणाल्या.
माणसाला किती तासांची झोप गरजेची आहे?
डोव प्रेस या शास्त्रीय आणि वैद्यकीय संशोधनासाठीच्या खुल्या मंचावर झोपेसंबंधी एक अभ्यास प्रसिद्ध झाला होता. या अभ्यासानुसार मेंदूच्या प्रभावी कार्यासाठी झोपेच्या कालावधीसह झोपेची गुणवत्तादेखील गरजेची असते. काही लोक कमी तास झोपले तरी प्रभावीपणे काम करू शकतात, असे या अभ्यासात म्हटलेले आहे. तसेच जास्त झोपेची गरज नसणे ही अनुवांशिक देण असावी, असे काही वैज्ञानिकांना वाटते, असे स्लीप फाऊंडेशनने सांगितलेले आहे.
प्रत्येकाच्या झोपेची गरज वेगळी
प्रत्येक व्यक्ती ही विशेष असते. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीच्या सवयी, गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी झोपेची गरजही वेगवेगळी असते. आठ तासांच्या झोपेचा अट्टहास करण्यापेक्षा तुमचे शरीर काय सांगते, याकडे लक्ष द्यायला हवे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.