आग्नेय बंगालच्या उपसागरावरील दाबाचा पट्टा प्रथम खोल दाबामध्ये आणि नंतर सोमवारी चक्री वादळात तीव्र होण्याची अपेक्षा आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. जर ते खरोखरच चक्री वादळात विकसित झाले तर त्याला ‘सायक्लोन असनी’ असे म्हटले जाईल. हे नाव श्रीलंकेने दिले आहे.


‘असनी’ चे साधारणतः सिंहली भाषेत ‘क्रोध’ असे भाषांतर केले जाते. हे ७० किमी आणि ९० किमीच्या वेगाने वाऱ्याचे चक्रीवादळ असण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. हे बहुधा जास्त तीव्रतेच्या चक्रीवादळात रूपांतरित होणार नाही.


जगभरात सहा प्रादेशिक हवामान केंद्रे आहेत ज्यांना उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचे नाव देण्यात आले आहे. भारतीय हवामान विभाग सहापैकी एक आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यासह उत्तर हिंद महासागरावर विकसित होणाऱ्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना नावे देणे अनिवार्य आहे. यासाठी, IMD एक मानक प्रक्रिया अवलंबते. बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या तेरा सदस्य देशांनी नावे प्रस्तावित केली आहेत.


एका समुद्रात किंवा महासागरात एकाच वेळी अनेक हवामान यंत्रणा फिरत असताना गोंधळ टाळण्यासाठी चक्रीवादळांची नावे दिली जातात. नाव दिले की त्या वादळाशी निगडित माहिती मिळवणे व लक्षात ठेवणे सोपे जाते. विशिष्ट भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. फुले, नद्या, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार व थायलंड या आठ राष्ट्रांनी वादळांची नावे ठरवली आहेत. इतर राष्ट्रांकडूनही प्रत्येकी आठ अशी ६४ नावे देण्यात येतात. ही नावे ओळीने देण्यात येतात. याच पद्धतीने पृथ्वीवरच्या इतर भागातील वादळांची नावे ठरवली जातात. काही ठिकाणी विशिष्ट वर्षांनंतर पुन्हा तीच नावेही दिली जातात, अर्थात त्यातून प्रचंड संहारक ठरलेल्या वादळांची नावे वगळली जातात. जगभरातील वादळांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे वादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते.