Who named planet ‘Earth’?: पृथ्वी म्हणजे श्री, भूदेवी, विश्वगर्भा, धात्री, धारित्री, रत्नगर्भा, वसुंधरा अशा अनेकविध नावांनी परिचित आहे. वैदिक वाङ्‌मयात श्री हा शब्द शोभा, सुंदरता आणि सजावट या अर्थाने प्रयुक्त झाला आहे. पौराणिक संदर्भानुसार विष्णू हा प्रजापती आहे, तर श्री ही सृष्टी-पृथ्वी आहे. ऋग्वेदातील एक देवतायुग्म म्हणेज द्यावापृथिवी. द्यौ म्हणजे आकाश हे पुरुषतत्त्व आणि पृथिवी हे स्त्रीतत्त्व असे मानले गेले आहे. द्यौ म्हणजे शक्तिशाली वृषभ आणि पृथिवी म्हणजे प्रजननशील गाय असून उत्तम प्रजोत्पादन क्षमता त्यांच्यात आहे, त्यामुळेच त्यांचा उल्लेख ‘भूरिरेतस्’ असा केला आहे (Macdonell, A. A. Ed. A Vedic Reader for Students, Oxford, 1917). एकूणच पृथ्वीच्या समानार्थी शब्दांच्या मागे उत्पत्ती, सर्जनशीलता, भूगर्भातून जन्माला येणाऱ्या सृष्टीविषयीचा आणि पृथ्वीच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या सजीव सृष्टीचा संदर्भ मिळतो. त्यामुळेच भारतीय संस्कृतीत असलेल्या पृथ्वी किंवा तिच्या इतर नावांचा गर्भितार्थ आपल्याला माहीत असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या सौरमालेतील ग्रहांपैकी पृथ्वी हा ग्रह केवळ जीवनास अनुकूल वातावरणासाठीच नव्हे तर त्याच्या इंग्रजी भाषेतील वेगळ्या नावासाठीही ओळखला जातो. इंग्रजीत पृथ्वीला ‘अर्थ’ असे म्हटले जाते तर बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनि, युरेनस आणि नेपच्यून यांसारखे पृथ्वीचे खगोलीय शेजारी ग्रीक किंवा रोमन देवतांच्या नावांवरून ओळखले जातात. पृथ्वीचे इंग्रजी नाव ‘अर्थ’ या शब्दाची व्युत्पत्ती प्राचीन भाषा आणि सांस्कृतिक परिवर्तनाच्या एका मनोरंजक प्रवासाचे प्रतिबिंब आहे. पण हे नाव नेमके कोणी दिले आणि पृथ्वी Earth म्हणून कशी ओळखली गेली? याचाच शोध इतिहास, पुराणकथा आणि भाषाशास्त्राच्या माध्यमातून या लेखात घेण्याचा प्रयत्न केला आहे.

ग्रहांची इंग्रजी नावे आणि त्यांचे पौराणिक संदर्भ

प्राचीन काळात ग्रीक आणि रोमन पौराणिक कथांचा खगोलीय बाबींच्या नामकरणावर मोठा प्रभाव होता. प्रमुख रोमन देवता ज्युपिटर आणि युद्धाचा देव मार्स यांच्या नावांवरून त्यांची वैशिष्ट्ये प्रतिबिंबित करणाऱ्या ग्रहांची नावे ठेवली गेली. त्याचप्रमाणे ग्रीक देवी गैआ (Gaia) हीला पृथ्वीचे प्रतिक मानले जाते तर रोमन परंपरेत टेरा मॅटर (Terra Mater) ही पृथ्वीच्या पालन पोषण करणाऱ्या गुणधर्मांचे प्रतिनिधित्त्व करते. एकूणच इतर ग्रहांच्या नामकरणामध्ये पौराणिक कथांचा मोठा वाटा असला तरी पृथ्वीचे नाव एखाद्या विशिष्ट देवतेशी जोडले गेले नाही. त्याऐवजी ते अधिक व्यावहारिक आणि भाषिक उत्पत्तीमधून विकसित झाले.

‘Earth’ या शब्दाची भाषिक मुळे

Earth या शब्दाची व्युत्पत्ती जुन्या इंग्रजी (Old English) मधील eorþe या शब्दातून झाली आहे. eorþe म्हणजे माती, जमीन, कोरडी भूमी आणि देश असा होतो. जुनी इंग्रजी (सुमारे ४५० CE ते ११५० CE पर्यंत प्रचलित) ही भाषा प्रोटो-जर्मॅनिक (Proto-Germanic) या प्राचीन भाषेपासून विकसित झाली आहे. याच भाषेतून अनेक आधुनिक जर्मॅनिक भाषांचा उगम झाला आहे.

गायीच्या रूपातील पृथ्वी (फोटो: विकिपीडिया)

विविध भाषांतील ‘Earth’शी संबंधित शब्द

Earth या शब्दाचा संदर्भ अनेक भाषांमध्ये आढळतो. जर्मन भाषेत Erde हा शब्द माती किंवा जमिनीच्या संदर्भातही वापरला जातो. डच मध्ये माती किंवा जमिनीसाठी Aarde हा शब्द वापरात येतो. जुन्या सॅक्सन आणि फ्रिशियन भाषांमध्ये Ertha आणि Erthe हे शब्द जर्मॅनिक परंपरेचे द्योतक आहेत. भाषाशास्त्रज्ञांनी या समानतेमागे Ertho नावाचा एक प्रोटो-जर्मॅनिक मूळ शब्द असल्याचे अनुमान काढले आहे. परंतु याचे थेट लिखित पुरावे उपलब्ध नाहीत. या संज्ञेचा व्यापक उपयोग प्राचीन लोकांच्या जमिनीशी असलेल्या प्रत्यक्ष नात्याचे प्रतिक असावा. आकाशातील एखाद्या ग्रहापेक्षा प्रत्यक्ष भौतिक भूमीला अधिक महत्त्व देत होता.

आरा पॅकिसचे पॅनेल (फोटो: विकिपीडिया)

पृथ्वीला ग्रह म्हणून ओळखायला कधी सुरुवात झाली?

Eorþe किंवा Erde यांसारख्या शब्दांचा संपूर्ण ग्रहासाठी उपयोग कधी सुरू झाला याबाबत निश्चित माहिती नाही. प्राचीन काळी आजच्या प्रमाणे पृथ्वीला इतर ग्रहांपैकी एक म्हणून पाहिले जात नव्हते. त्यावेळी लोकांची समज त्यांच्या आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीवरच केंद्रित होती. पृथ्वीला ग्रह म्हणून स्पष्टपणे मान्यता १६ व्या शतकातील कोपर्निकन क्रांतीनंतर मिळू लागली. हेलिओसेंट्रिझम (सूर्यकेंद्री सिद्धांत) मांडल्यानंतर पृथ्वीही इतर ग्रहांप्रमाणे सूर्याभोवती फिरते हे मान्य केले गेले. मात्र, Earth हा शब्द संपूर्ण ग्रहासाठी प्रचलित नामरूपाने वापरण्याचा भाषिक बदल हळूहळू घडत गेला. हा अनेक शतकांचा प्रवास आहे. जगातील प्रत्येक संस्कृतीने पृथ्वीला वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले आहे. काहींनी तिला देवीच्या रूपात पूजले तर काहींनी तिला पौराणिक संदर्भांशी जोडले. विविध प्राचीन भाषांमध्ये पृथ्वीचे उल्लेख असे आढळतात. चिनी भाषेत पृथ्वीला 地球 (Dìqiú) म्हणतात. ‘地’ (dì) म्हणजे ‘जमीन’ आणि ‘球’ (qiú) म्हणजे ‘गोळा’, म्हणजेच ‘जमिनीचा गोळा’.

पृथ्वीच्या तुलनेत इतर ग्रहांची नामकरण पद्धती

इतर ग्रहांना प्राचीन संस्कृतींनी त्यांची दृश्यमान वैशिष्ट्ये आणि पौराणिक संदर्भांवरून स्पष्टपणे नावे दिली. उदाहरणार्थ: मंगळाचा (Mars) त्याच्या तांबड्या रंगामुळे रोमन युद्धदेव मार्सशी संबंध जोडला गेला. शुक्राचा (Venus) संबंध त्याच्या आकाशातील तेजस्वी गुणधर्मामुळे प्रेम आणि सौंदर्याची देवी व्हिनसशी जोडला गेला. बृहस्पति (Jupiter) हा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह असल्याने तो देवतांचा राजा ज्युपिटर याच्या नावाने ओळखला गेला. याच परंपरेनुसार नंतर शोधले गेलेले ग्रह युरेनस (Uranus) आणि नेपच्यून (Neptune) यांची नावेही ग्रीक देवतांवरून ठेवली गेली. युरेनस आकाशाच्या देवतेशी, तर नेपच्यून समुद्राच्या देवतेशी संबंधित आहे.

पृथ्वीच वेगळी का आहे?

पृथ्वीच्या नावामध्ये एक वास्तववादी आणि व्यावहारिक दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो. इतर खगोलीय ग्रहांमध्ये तिचे स्थान अधोरेखित करण्यापेक्षा हे नाव जमीन, भूमी या संकल्पनेवर अधिक भर देते. ग्रहशास्त्राच्या प्रारंभिक आकलनापेक्षा प्राचीन मानवांचे लक्ष प्रामुख्याने जगण्यासाठी आवश्यक गोष्टींवर, शेतीवर आणि जमिनीशी असलेल्या संबंधांवर केंद्रित होते, हे यातून सिद्ध होते.

आधुनिक वापर आणि Earth हा शब्द लिहिण्याचा नियम

आधुनिक इंग्रजीमध्ये Earth हा शब्द कॅपिटल किंवा लोअर केसमध्ये कधी लिहावा यासाठी नियम आहे. अर्थ या ग्रहाचा उल्लेख करताना Earth हे capital केसमध्ये लिहिले जाते. उदा. The astronauts returned to Earth (अंतराळवीर पृथ्वीवर परतले) माती किंवा जमिनीच्या संदर्भात हा शब्द lowercase मध्ये लिहिला जातो. उदा. They dug into the earth (त्यांनी जमिन खोदली). हा लहानसा फरक भाषेतील आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातील बदल दर्शवतो.

आधुनिक नावं: पृथ्वीला ‘ब्लू मार्बल’ आणि ‘गोल्डीलॉक्स प्लॅनेट’ का म्हणतात?

७ डिसेंबर १९७२ रोजी अपोलो १७ मिशनच्या अंतराळवीरांनी पृथ्वीचा फोटो काढला होता. तो फोटो प्रसिद्ध झाला होता. या छायाचित्रात पृथ्वी आकाशात निळसर संगमरवरी गोळ्यासारखी दिसते, म्हणून तिला ‘Blue Marble’ असे नाव दिले गेले. गोल्डीलॉक्स प्लॅनेट हे नाव गोल्डीलॉक्स आणि तीन अस्वलांची (Goldilocks and the Three Bears) गोष्ट यावरून घेतला आहे. त्या गोष्टीत गोल्डीलॉक्सला खूप गरम किंवा खूप थंड नसलेले, योग्य तापमानाचे अन्न आवडते. त्याचप्रमाणे, पृथ्वीही खूप गरम किंवा खूप थंड नसून योग्य वातावरण असलेला ग्रह आहे, म्हणून तिला ‘Goldilocks Planet’ म्हणतात. पृथ्वीचा Earth असण्याचा हा प्रवास असाच रोचक आहे