– भक्ती बिसुरे
केवळ आपल्या आजूबाजूच्या शहरी भागांनाच नव्हे तर जगातील सुमारे ९९ टक्के भागाला हवेच्या प्रदूषणाने विळखा घातल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. जगातील थोडेथोडके नव्हे तर ९९ टक्के नागरिक श्वासावाटे दूषित हवा शरीरात घेत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सध्या मानवजातीमध्ये वाढत चाललेल्या विविध असंसर्गजन्य आजारांचे मूळही या हवेच्या प्रदूषणात दडलेले आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालाबाबत समजून घेणे महत्त्वाचे आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल काय सांगतो?
जगातील थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ९९ टक्के जनता श्वासावाटे दूषित हवा शरीरात घेत असून त्यामुळे हवेतील घातक सूक्ष्म कण आणि नायट्रोजन डायऑक्साईड यांचे मानवी शरीरातील प्रमाण वाढत आहे. त्याचे दूरगामी परिणाम मानवी आरोग्यावर होत आहेत. भविष्यात हे प्रमाण वाढणार आहे. त्यावर निर्बंध घालण्यासाठी तसेच मानवाच्या आरोग्यासाठी भविष्यात वायू प्रदूषणाची पातळी कमी करण्याचे आव्हान जगासमोर आहे. त्या दृष्टीने जागतिक पातळीवर ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून अधोरेखित करण्यात आले आहे. जीवाश्म इंधनाचा अतिरेकी वापर हे हवेच्या प्रदूषणास प्रामुख्याने कारणीभूत आहे.
विषारी वायूंच्या कणद्रव्यांच्या प्रमाणात वाढ?
सद्यःस्थितीत जगातील सुमारे सहा हजार शहरे हवेच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करत आहेत, मात्र हे पुरेसे नसून याचे प्रमाण वाढवणे आणि हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी शाश्वत उपाय तातडीने अवलंबणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. २०११ च्या तुलनेत हवेचे प्रदूषण करणाऱ्या विषारी वायूंच्या कणद्रव्यांचे प्रमाण तब्बल सहा पटींनी वाढले आहे. हवेच्या गुणवत्तेची पातळी तपासणाऱ्या ११७ देशांतील शहरांपैकी १७ टक्के शहरे श्रीमंत देशांतील असून त्यांच्या हवेची गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या धोक्याच्या पातळीच्या पलीकडे पोहोचली आहेत. ही पातळी न ओलांडलेली एक टक्क्याहून कमी शहरे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये आहेत.
हवा प्रदूषणाचे दुष्परिणाम किती घातक?
शहरी भागातील वाढत्या इंधन वापरामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणातून बाहेर पडणारे नायट्रोजन डायऑक्साईडचे हवेतील प्रमाण धोक्याची पातळी ओलांडत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. नायट्रोजन डायऑक्साईडसारख्या प्रदूषण करणाऱ्या घटकामध्ये, हवेतील अतिसूक्ष्म कण रक्तप्रवाहात मिसळण्याची क्षमता असते. बहुतांश प्रदूषण करणारे घटक थेट मानवाच्या फुप्फुसांवर हल्ला करतात. त्यामुळेच मानवामध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी विकार, सेरेब्रोव्हास्क्युलर (पक्षाघात सदृश) आणि श्वसनविकार अशा असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नायट्रोजन डायऑक्साईडचा थेट संबंध दमा, कफ, खोकला आणि श्वसनाच्या विविध तक्रारींशी आहे.
जागतिक आरोग्य संघटना काय सुचवते?
सध्या उपलब्ध असलेल्या ऊर्जास्रोतांना पर्याय म्हणून स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इंधनाची निर्मिती करणे, त्यासाठी पूरक तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडून सुचवण्यात आले आहे. जागतिक पातळीवर गडद होत चाललेले तापमान वाढीचे संकट, तसेच वायू प्रदूषण यावर उपाय म्हणून जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व्हावेत. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक सूचना केल्या असून जगभरातील देशांनी त्यांची तातडीने अंमलबजावणी करावी असेही आवाहन या अहवालाच्या निमित्ताने करण्यात आले आहे. येत्या काळात हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण तातडीने करण्यात यावे आणि वायुप्रदूषणाचे स्रोत ओळखून त्यांच्यासाठी पर्याय शोधण्यात यावेत असे आवाहन करण्यात आले आहे. स्वयंपाक, प्रकाश, ऊर्जा अशा दैनंदिन गरजेसाठी नागरिकांनी शाश्वत पर्याय निवडावेत आणि त्यांचा वापर करावा. जगातील देश, शहरे, त्यांची प्रशासने यांनी कचरा व्यवस्थापन या गोष्टीकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. कृषी कचरा जाळणे, जंगलात लागणारी आग किंवा वणवे या गोष्टी मोठ्या प्रमाणावर हवेच्या प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने अशा घटना रोखण्यास प्राधान्य दिले जावे, असे आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आले आहे.
हवेच्या गुणवत्ता तपासणीत सुधारणा आवश्यक?
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील तब्बल सहा हजार शहरे नियमित हवेच्या गुणवत्तेची तपासणी करतात. मात्र, तेवढेच पुरेसे नाही. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हवेच्या प्रदूषणाचा सर्वाधिक धोका आहे. तेथील हवेच्या गुणवत्तेची तपासणी यंत्रणा सुधारण्यास प्राधान्य असावे असे जागतिक आरोग्य संघटना सांगते. हवेतील पार्टिक्युलेट मॅटर्स आणि नायट्रोजन डायऑक्साईडचे उत्सर्जन रोखण्यासाठी युरोप आणि काही प्रमाणात दक्षिण अमेरिकेने केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसत असून त्यांचे अनुकरण जगातील इतर देशांनी करणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधुन जीवाश्म इंधनाचा वापर मर्यादित करणे, त्याला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक इंधन वापरणे आणि कार्बन उत्सर्जन रोखण्यास हातभार लावणे हेच पुढील पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनिवार्य असल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगते.