हिंदू नववर्षाची सुरूवात शक संवत्सर या प्राचीन भारतीय दिनदर्शिकेनुसार होते. हाच दिवस महाराष्ट्रात ‘गुढीपाडवा’ तर कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये ‘युगादी’ म्हणून साजरा केला जातो. विशेष म्हणजे सिंधी उत्सव ‘चेटी चंड’ हा देखील याच दिवशी साजरा करण्यात येतो. भारतीय संस्कृती ही उत्सव प्रिय आहे. प्रांतागणिक येथे विविधता आढळते. ही विविधता सण, उत्सव यांच्या माध्यमातून व्यक्त होणारी आहे. भारतीय परंपरांना सांस्कृतिक महत्त्वासह ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हेच ऐतिहासिक महत्व गुढीपाडवा या सणालाही आहे. आज मोठ्या प्रमाणात ग्रेगोरियन दिनदर्शिका प्रचलित असली तरी भारतीय मातीत निर्माण झालेल्या शक व विक्रम या दोन दिनदर्शिकांचे भारतीय समाजातील महत्त्व अबाधित आहे.
आणखी वाचा : विश्लेषण: Nirma Powder महाराष्ट्राचे राजकारण व ‘दूध सी सफेदी’ देणारी निरमा वॉशिंग पावडर
राजा चष्टनने केली शक संवत्सराची सुरुवात?
शक संवत्सर हे फाल्गुन महिन्यातील शेवटच्या अमावस्येनंतर चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी शुक्ल पक्षात सुरू होते आणि विक्रम संवत्सर हे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येनंतर वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरू होते. म्हणूनच या दोन्ही संवत्सरांनुसार नूतन वर्ष आपण तितक्याच आदराने साजरे करतो. बंगाल, तमिळनाडू, आसाम, ओडिशा, पंजाब आदि राज्यांची नववर्षे वैशाख महिन्यापासून सुरू होतात.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश या राज्यात शक संवत्सर हे ‘शालिवाहन शक’ या नावाने प्रसिद्ध आहे. उर्वरित भारतात प्राचीन लेखांमध्ये ‘शालिवाहन शक’ असा कुठलाही संदर्भ येत नाही. हे संवत्सर केवळ शक या नावानेच ओळखले जात होते. असे असताना महाराष्ट्र किंवा आंध्रप्रदेश या भागात ‘शालिवाहन शक’ असा संदर्भ गुढीपाडवा या सणाच्या उत्पत्ति मागे का देण्यात येतो? हे जाणून घेणे गरजेचे ठरते. ‘शक’ हे मूलतः पर्शिया (इराण) येथिल ‘सिथिया’ या भागातले होते. इसवी सन पूर्व काळात त्यांनी भारतात स्थलांतर केले. सिंध, राजस्थान मार्गे ते भारतात स्थायिक झाले. त्यांनी काही काळ कुषाण राजांचे अधिकारी म्हणून काम पाहिले आणि नंतर स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. म्हणूनच काही अभ्यासक शक संवत्सराचा कर्ता कुषाण राजा कनिष्क (प्रथम) असावा असे मानत होते. परंतु कालांतराने नव्याने उघडकीस आलेल्या पुरातत्वीय तसेच ऐतिहासिक पुराव्यांनुसार शक राजा ‘चष्टन’ यानेच इसवी सन ७८ मध्ये या संवत्सराची स्थापना केल्याचे बहुसंख्य अभ्यासक मान्य करतात.
आणखी वाचा : विश्लेषण : ॲरिस्टॉटल ते २१ वे शतक : कांद्याचा रोचक प्रवास
चष्टन संवत्सराआधीही कालगणना अस्तित्वात होती का?
काही अभ्यासक या शक संवत्सराचे ‘जुने शक संवत्सर’ व ‘चष्टन राजाचा संवत्सर’ असे दोन प्रकार मानतात. चष्टन या शक राजापूर्वी कोरलेल्या काही जैन व बौद्ध लेखांमध्ये शक सदृश्य कालगणना आढळते. त्यामुळे हे संवत्सर चष्टनापूर्वी म्हणजेच चष्टन राजाने सुरुवात करण्याआधीपासून अस्तित्त्वात होते का हा प्रश्न आजही अनुत्तरीत व अभ्यासकांमध्ये मतमतांतरे दर्शविणारा ठरतो. तरी महाराष्ट्र-आंध्रप्रदेश या राज्यात येणारा संदर्भ हा शालिवाहनांशी जोडला गेला, आहे हे दुर्लक्ष करून चालणार नाही. शालिवाहन म्हणजे सातवाहन घराण्यातील एक आद्य राजा. या राजवंशाने साधारण ४०० वर्षे राज्य केले. या कालावधीत अनेकदा सातवाहन व शक यांच्यात झालेल्या युद्धाचे पुरावे उपलब्ध आहेत.
आणखी वाचा : विश्लेषण : पुरातन वस्तू कायद्याचे महत्त्व काय?
शक क्षत्रप आणि शालिवाहन यांचा इतिहास काय सांगतो?
महाराष्ट्राच्या इतिहासात सातवाहन या राजवंशाचा कालावधी समृद्ध होता. हा काळ भारतीय इतिहासात भारत व रोम यांच्यातील समुद्री व्यापारासाठी ओळखला जातो. या व्यापारात पश्चिम किनारपट्टीची (कोकण प्रांताची) भूमिका महत्त्वाची होती. या भागात राज्य म्हणजे या व्यापारावर राज्य हे गणित अगदीच स्पष्ट होते. तत्कालीन गुजरात या प्रांतातील (शक) क्षहरात वंशीय क्षत्रप नहपान राजा व त्याचा जावई उसवदत्त (ऋषभदत्त) यांनी महाराष्ट्राच्या उत्तरेस राज्यविस्तार केला. सातवाहन राजांचा पराभव करून उत्तर कोकण हा भाग आपल्या अखत्यारीत घेतला. त्यांच्या या भागातील राज्यकाळात त्यांनी काही चांदीची नाणी पाडली. नंतर सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी (इसवी सन पहिले शतक) याने क्षहरात क्षत्रप नहपान याचा पराभव केला. त्यावेळेस हीच नाणी गोळा करून त्याने आपल्या नाव व शिक्यानिशी वापरात आणली. त्यांच्यात झालेल्या या संघर्षाचा तपशील वशिष्ठ पुलुमावी याच्या नाशिक लेणीतील शिलालेखात मिळतो.
आणखी वाचा : विश्लेषण : इजिप्तमधील पिरॅमिड्सचा भारताशी काही संबंध आहे का?
चष्टन राजाचे इतिहासातील योगदान काय?
विशेष म्हणजे गौतमीपुत्र याने नहपान याचा पराभव करूनही त्याचे गुजरात येथिल राज्य आपल्या राज्याला जोडले नाही. उलट गुजरात येथे नहपनानंतर शक वंशाचा कार्दमक राजा चष्टन याने राज्य स्थापन केले व नवीन संवत्सर सुरू केले. पुढील काळात इतर राजवंशानी हेच संवत्सर त्यांच्या कोरीव लेखात वापरल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. चष्टन राजाने हे संवत्सर स्थापन केल्यावर ते पुढील काही शतके वापरात होते. विशेष म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी याने हे संवत्सर वापरल्याचे निदर्शनात येत नाही. म्हणूनच गुढीपाडवा, शक संवत्सर व सातवाहन या तीन गोष्टींचा संबंध मध्ययुगीन काळात लावण्यात आला असावा असे काही अभ्यासक मानतात. हे जरी खरे असले तरी सातवाहन राजांनी राज्य केलेल्या भागात शक संवत्सरानुसार नवीन वर्ष का? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.
इतिहास अभ्यासकांचे म्हणणे काय?
सातवाहनांनी शकांचा पराभव केल्यानंतर त्या विजयाच्या स्मृती प्रीत्यर्थ हा संवत्सर सातवाहनांच्या आद्य राजाच्या नावाने ‘शालिवाहन शक’ म्हणून ओळखला गेला, असे पुरातत्त्व अभ्यासक दिनेशचंद्र सरकार यांनी नमूद केले आहे. हे जरी मान्य केले तरी सातवाहन राजा गौतमीपुत्राने शक क्षहारात राजा नहपान याचा पराभव केला होता. त्या नंतर आलेल्या चष्टन या राजाचा नाही. मग चष्टन राजाने स्थापिलेल्या संवत्सराला शालिवाहन हे बिरूद का लागले असावे? हा प्रश्न कोड्यात टाकणारा आहे. सातवाहन व शक संवत्सर यांचा संबंध नाही हे आज अनेक अभ्यासक मान्य करतात. त्यामुळेच चष्टनाचे शकसंवत्सर, नहपान व गौतमीपुत्र यांच्यातील संघर्ष, गुढी पाडवा साजरी करण्याची पद्धत यांच्यात किती व कसा संबंध आहे हा विवादास्पद मुद्दा आहे. यावर अजूनही सखोल संशोधनाची गरज आहे.
ऋतूबदल आणि भारतीय संवत्सरांचा काही संबंध आहे का?
आपले भारतीय सण हे निसर्गबदलानुसार साजरे केले जातात. शक संवत्सर असो किंवा विक्रम संवत प्रत्येक राज्यात साजऱ्या होणाऱ्या नववर्षात स्थानिक निसर्गबदल हा प्रकर्षाने जाणवतो. चैत्र महिन्यात सुर्य भू-मध्य रेखा पार करतो व उत्तरायणाची सुरुवात होते. वातावरणात नवीन बदल अनुभवास येतात. हेच होणारे बदल आपल्या सणांच्या माध्यमातून व्यक्त होतात. गुढी पाडव्याच्या दिवशी सूर्याच्या दिशेने उभारण्यात येणारी गुढी, प्रसादात कैरी, कडुलिंबाच्या पानांचा वापर किंबहुना ‘चेटी चंड’ या त्याच दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सिंधी नववर्षात दूध व तांदूळ पीठाच्या मिश्रणाचा (पाण्याच्या साठ्याला अर्पण करण्यात येणारा) प्रसाद हे वातावरणातील बदलांचे निदर्शक आहेत. त्यामुळे ही परंपरा ही आज कालची नसून मानव व निसर्ग यांच्या उत्क्रांती प्रक्रियेतून विकसित झालेली आहे.
शालि या शब्दाचा इतरही काही अर्थ आहे का?
शालिवाहन या शब्दाचा अर्थ शालि म्हणजे साळी भाताने भरलेली गाडी असा आहे. आंध्रप्रदेश व भारताच्या इतर भागात मार्च ते जून हा काळ रब्बी तांदळासाठी योग्य समजला जातो. म्हणूनच शालिवाहन शकातील शालिवाहन हा शब्द नक्की कोणत्या हेतूने आपली जागा भूषवितो आहे हे नव्याने पडताळण्याची गरज आहे हे येथे वेगळे नमूद करायला नको.