अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची २२ नोव्हेंबर १९६३ रोजी झालेली हत्या आजही जगभर चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरतो. त्या दिवशी अमेरिकाच नव्हे, तर संपूर्ण जग हादरले. ही हत्या कुणी घडवून आणली याविषयी आजही तर्कवितर्क लढवले जातात. त्या दिवशी केनेडी वाचू शकले नाहीत, पण त्यांची पत्नी जॅकलीन केनेडी यांचे प्राण केनेडी यांच्या एका अंगरक्षकाने वाचवले. तो होता सिक्रेट सर्विस एजंट क्लिंट हिल. त्या दिवशी नेमके काय झाले हे सविस्तर सांगू शकणारे क्लिंट हिल यांचे नुकतेच वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले. आपण जॉन केनेडींना वाचवू शकलो नाही ही सल मात्र त्यांच्या मनात अखेरपर्यंत राहिली.

२२ नोव्हेंबर १९६३

अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन फिट्झगेराल्ड केनेडी हे पत्नी जॅकलीन केनेडीसमवेत टेक्सासमधील डॅलसच्या दौऱ्यावर होते. २२ नोव्हेंबर १९६३ या दिवशी दुपारी एक वाजता त्यांच्या मोटारींचा ताफा डीली प्लाझा या ठिकाणी आला. यावेळी टेक्सास स्कूल डिपॉझिटरी या जवळच्याच एका इमारतीतून केनेडी यांच्या मोटारीच्या दिशेने दोन किंवा तीन गोळ्या काही सेकंदांच्या अंतराने झाडण्यात आल्या. यावेळी केनेडी दाम्पत्याबरोबर टेक्सास राज्याचे तत्कालीन गव्हर्नर जॉन कॉनाली आणि त्यांच्या पत्नी होत्या. केनेडी दाम्पत्य मागील सीटवर आणि कॉनाली दाम्पत्य आलिशान अध्यक्षीय लिमोझिनच्या पुढील सीटवर बसले होते. क्लिंट हिल त्यांच्या मागील मोटारीच्या साइडबोर्डवर उभे होते. पहिल्या गोळीचा आवाज ऐकताक्षणी हिल झटक्यात मागील मोटारीच्या साइडबोर्डवरून उतरले नि अध्यक्षीय लिमोझिनवर पाठीमागून झेपावले. फटाक्यासारखा आवाज आल्याने आपण सावध झालो आणि अध्यक्षांना (केनेडी) पाहिले, तेव्हा ते हातात गळा धरून पुढील बाजूस झुकलेले दिसले. त्याचवेळी मिसेस केनेडी मोटारीच्या मागील बाजूस चढू लागल्या, त्यांना वाचवणे आवश्यक वाटले. आपण मोटारीपर्यंत पोहोचेपर्यंत आणखी एक (गोळीचा) आवाज आला. मोठ्या प्रमाणात रक्ताचा फवारा उडाला, असे हिल यांनी केनेडी हत्या चौकशी आयोगासमोर सांगितले. क्लिंट हिल चटकन अध्यक्षांच्या मोटारीवर चढले आणि त्यांनी जॅकलीन केनेडींना पुन्हा त्यांच्या आसनावर ढकलले आणि केनेडी दाम्पत्याभोवती स्वतःच्या शरीराची रक्षक ढाल बनवली. तोपर्यंत अर्थात उशीर झाला होता, कारण दुसऱ्या गोळीने केनेडी यांची कवटीच उद्ध्वस्त केली. जॅकलीन केनेडी मात्र वाचल्या. केनेडींवर गोळ्या येत असताना, भान गमावल्याने जॅकलीन केनेडी लिमोझिनच्या मागील बाजूस चढल्या. त्या मोटारीतून पडल्या असत्या, तर मागील मोटारींच्या चाकांखाली आल्या असत्या. त्यामुळे क्लिंट हिल यांच्या दक्षतेने त्यांचे प्राण वाचले, हे नंतर सिद्ध झाले.

क्लिंट हिल कोण?

क्लिंट हिल यांचा जन्म १९३२ मधला. ते सुरुवातीस अनाथाश्रमात वाढले. पुढे ख्रिस हिल यांनी त्यांना दत्तक घेतले. १९५४मध्ये इतिहास आणि शारीरिक शिक्षण या विषयांत पदवी घेतल्यानंतर ते प्रथम लष्करात भरती झाले. तेथे गुप्तवार्ताविरोधी विभागात (काउण्टर इंटेलिजन्स) काम केल्यानंतर त्यांची बदली सिक्रेट सर्विस विभागात झाली. ते थेट व्हाइट हाउसमध्ये तत्कालीन अध्यक्ष ड्वाइट आयसेनहॉवर यांच्या सुरक्षा पथकात रुजू झाले. पुढे जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे अध्यक्ष बनले तेव्हा आपणही त्यांच्या सुरक्षा पथकात राहू अशी आशा हिल यांना वाटत होती, पण तसे घडले नाही.

अध्यक्ष नव्हे, अध्यक्षपत्नींचे सुरक्षारक्षक

याचे कारण जॉन केनेडी नव्हे, तर अध्यक्षपत्नी किंवा फर्स्ट लेडी जॅकलीन केनेडींच्या सुरक्षा पथकात क्लिंट हिल यांची बदली झाली. ही ‘साइ़ड पोस्टिंग’ असल्याची त्यावेळी हिल यांची भावना झाली. कदाचित आपण वयाने जॅकलीन यांच्या बरोबरीचे होतो, त्यामुळे आपल्या सान्निध्यात त्या अधिक मोकळ्या राहतील असा विचार त्यामागे असावा, ही भावना हिल यांनी बऱ्याच नंतर एका मुलाखतीत बोलून दाखवली. केनेडी हत्येच्या दिवशी थेट अध्यक्षांनाच वाचवण्याची जबाबदारी हिल यांची नव्हती. त्यांच्यावर जॅकलीन केनेडी यांच्या जीवितरक्षणाची जबाबदारी होती. ती त्यांनी व्यवस्थित निभावली. जॅकलीन यांना धावत्या मोटारीतून पडण्यापासून हिल यांनी वाचवलेच, शिवाय अध्यक्ष केनेडी आणि जॅकलीन या दोघांभोवती त्यांनी शरीराचे कवच उभे केले आणि संभाव्य गोळीबारापासून दोघांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला.

सन्मान तरीदेखील खंत

जॉन केनेडी हल्ल्यानंतर अर्ध्या तासाने रुग्णालयात मरण पावले. जॅकलीन यांना इजा झाली नाही. केनेडी यांच्याबरोबरच गव्हर्नर कोनालीदेखील जखमी झाले. पण ते वाचले. या सगळ्या दुःखद घटनेत अभूतपूर्व शौर्य आणि तत्परता दाखवून क्लिंट हिल यांनी अध्यक्षपत्नींचे प्राण वाचवले, याबद्दल त्यांचा काही महिन्यांनी जॅकलीन केनेडी यांच्या उपस्थितीत शौर्यपदक देऊन सत्कार करण्यात आला. पुढे काही काळ जॅकलीन केनेडी आणि त्यांच्या दोन मुलांच्या सुरक्षा पथकात क्लिंट हिल होते. नंतर लिंडन जॉन्सन, रिचर्ड निक्सन आणि गेराल्ड फोर्ड या अमेरिकेच्या पुढील तीन अध्यक्षांच्या पथकातही ते होते. मात्र आपण अध्यक्ष केनेडी यांना वाचवू शकलो नाही याचे शल्य त्यांना आयुष्यभर राहिले.

तर केनेडी वाचले असते…

गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर एखादा सेकंद अधिक त्वरेने आपण हालचाल केली असती, तर केनेडी यांचे प्राण वाचवता आले असते हे क्लिंट हिल पुढे नेहमी सांगत राहिले. एका टीव्ही मुलाखतीदरम्यान तसे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. पुढे चौकशीतून जेव्हा स्पष्ट झाले, की पहिल्या गोळीच्या जखमेतून केनेडी वाचले असते. पण दुसऱ्या गोळीने त्यांच्या कवटीचाच वेध घेतल्यामुळे ते जगणे अशक्य होते, त्यावेळी तर क्लिंट हिल सैरभैर झाले. त्यांनी नंतर तीन अध्यक्षांच्या सुरक्षा पथकात काम केले, पण वयाच्या ४३व्या वर्षीच मुदतपूर्व निवृत्ती घेतली. अपराधी भावनेतून ते मानसिक तणावाच्या आहारी गेले. दारू पिऊ लागले. या विमनस्क अवस्थेत ते पार काळ जगणार नाहीत, असे डॉक्टरांनी जाहीर केले. अखेर १९९०मध्ये ते पुन्हा एकदा घटनास्थळी – डॅलासमधील डेली प्लाझा रस्ता – गेले. त्यांना थोडे बरे वाटले. आपण प्रयत्न तर केला, या भावनेने ते सावरले. १९९४मध्ये जॅकलीन केनेडी मृत्युशय्येवर असताना तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी हिल यांना व्हाइट हाउसला बोलावून घेतले. त्यांना क्लिंटन ‘थँक यू’ म्हणाले. या दोन घटनांमुळे मानसिक तणावाच्या गर्तेतून क्लिंट हिल बाहेर पडू शकले. पुढे अनेक पुस्तके, चित्रपटांसाठी त्यांनी सल्ले दिले. शल्य होते, पण उत्तरायुष्य थोडेफार समाधानात गेले.

Story img Loader