जगातली सर्वात सुंदर स्त्री असा लौकिक लाभलेली अभिनेत्री म्हणजे जीना लोलोब्रिगिडा. त्यांचं आज निधन झालं आहे. त्या ९५ वर्षांच्या होत्या. जीना लोलोब्रिगिडा ५० आणि ६० च्या दशकात युरोपियन सिनेसृष्टीत सुपरहिट ठरली होती. जीना लोलोब्रिगिडाला वीसाव्या शतकातली मोनालिसा असं म्हटलं जात होतं. जीना लोलोब्रिगिडा यांचा मृत्यू का झाला ते समजू शकलेलं नाही.
जीनाचं सिनेमासृष्टीतलं पदार्पण कधी झालं?
जीना लोलोब्रिगिडाला लोलो असंही म्हटलं जात होतं. दुसरं महायुद्ध संपल्यानंतरच इटलीत जे चित्रपट तयार होऊ लागले त्यात जीनाने काम करण्यास सुरूवात केली. तिथूनच तिची फिल्मी कारकीर्द सुरू झाली. १९५५ मध्ये जीनाला जगातली सर्वात सुंदर महिला असं म्हटलं गेलं. कारण तिचं सौंदर्य अनन्यसाधारण होतं. जीनाने रॉक हडसन सोबत कम सप्टेम्बर या सिनेमात काम केलं होतं. तसंच गोल्डन ग्लोब अवॉर्डनेही जीनाला सन्मानित करण्यात आलं होतं. याखेरीज ट्रेपेज, बीट द डेव्हिल, बुओना सेरा असे चित्रपट करून जीना लोलोब्रिगिडाने आपली खास अशी ओळख बनवली. ही अभिनेत्री आपल्या करिअरच्या सुरूवातीला मॉडेलिंग करत होती. बीबीसीने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
१९६० च्या दशकानंतर ढासळलं करिअर
आपल्या करिअरची उतरती कळाही जीनाने पाहिली. १९६० चं दशक असं होतं ज्या दशकात तिची कारकीर्द ढासळली. त्यानंतर तिने राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. फोटोग्राफी ती आवड म्हणून करत होती. तिने एक निवडणूकही लढवली होती. पण त्यात तिचा पराभव झाला. ती कायम असं म्हणायची की मी एक फिल्म स्टार आहे कारण कारण लोक मला फिल्म स्टार बनवू इच्छित होते.
जीनाचं शिक्षण रोममध्ये झालं होतं
जीना लोलोब्रिगिडाचा जन्म ४ जुलै १९२७ ला झाला. जीनाचे वडील सुतारकाम करत असत. जीनाने रोमच्या ललित कला अकादमीत शिल्पकलेचा अभ्यास केला. लोलोब्रिगिडाला एका टॅलेंट स्काऊटने ऑडिशनची ऑफर दिली होती. मात्र तिने पहिल्या भूमिकेला चक्क नकार दिला होता. त्यानंतर तिला त्या काळात या भूमिकेसाठी एक हजार लीर देण्याचं कबूल केलं होतं. त्यांना नाकार देण्यासाठी तिने एक मिलियन लीरची मागणी केली. तिला वाटलं आता काही आपल्याला काम मिळणार नाही. मात्र ते चक्क तिला हो म्हणाले. अशा रितीने इटालियन सिनेसृष्टीला जगातली सर्वात सुंदर स्त्री मिळाली. १९४७ मध्ये मिस इटालिया यासंस्पर्धेतही जीनाने भाग घेतला होता. यामध्ये ती तिसरी आली. यानंतर जीनाने डॉ. मिलको स्कोफिकसोबत लग्न केलं. स्कोफिकने जीनाचे काही बिकिनीतले फोटो काढले होते. ज्यावर हॉलिवूडमधल्ये बसलेल्या एका माणसाची नजर पडली.
जीनाच्या आयुष्यात आलेला एक निर्माता..
Howard Hughes नावाचा एक निर्माता होता. जीनाचे बिकिनीतले फोटो त्याने पाहिले. त्यानंतर त्याने जीनाला एका स्क्रिन टेस्टसाठी लॉस एंजल्सला बोलावलं. मात्र त्यावेळी तिला फक्त एक तिकिट पाठवण्यात आलं. जेव्हा जीना एअरपोर्टवर उतरली तेव्हा डिव्होर्स लॉयर्स तिची वाट बघत होते. त्यानंतर जीनाला टाउन हाऊस हॉटेल या ठिकाणी नेण्यात आलं. तिथे तिची व्यवस्था एका शाही सूटमध्ये करण्यात आली होती. तिच्यासाठी सेक्रेटरी, ड्रायव्हर, इंग्लिश ट्यूटर या सगळ्या व्यवस्थाही करण्यात आल्या होत्या. एका मुलाखतीत जीनाने ही माहिती दिली होती.
जीना त्या मुलाखतीत म्हणाली की Howard ला माझ्या अभिनयात नाही तर माझ्यात रस होता. तो माझ्याबाबतीत अतिसंवेदनशील होता. दुसऱ्या पुरुषांना तो मला भेटू देत नव्हता. त्याने माझ्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र मी त्याला नकार दिला. Hughes ने माझा १३ वर्षे पिच्छा पुरवला पण मी त्याला होकार दिला नाही असंही जीनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. जीना लोलोब्रिगिडाने फ्रान्स आणि इटलीमध्ये अनेक सिनेमांमध्ये काम केलं. La Lollo हा तिचा पहिला अमेरिकन सिनेमा होता. अनेक हायप्रोफाईल प्रोजेक्टमध्ये जीना लोलोब्रिगिडा सहभागी झाली होती.
हिंदी सिनेमातही झळकली होती जीना लोलोब्रिगिडा?
१९७८ मध्ये शालीमार नावाचा एक सिनेमा आला होता. या सिनेमात जीना झळकणार होती. या सिनेमात धर्मेंद्र, झीनत अमान, शम्मी कपूर, रेक्स हॅरिसन, जॉन सेक्सन आणि जीना असे कलाकार होते. जीना लोलोब्रिगिडा सिनेमाच्या मुहूर्ताच्या वेळी मुंबईला आलो होती. धर्मेंद्र, जीना लोलोब्रिगिडा आणि झीनत अमान यांचे फोटोही तेव्हा छापून आली होते. त्यानंतर सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालं पण जीना लोलोब्रिगिडा कुठेही दिसली नाही. त्यावेळी अशा अफवा पिकल्या होत्या की धर्मेंद्र आणि जीना यांच्यात वाद झाले आहेत. मात्र धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीत सांगितलं की शालीमार या सिनेमात सुरूवातीला जीनाच असणार होती. पण आम्ही सिल्विया माइल्सला सिनेमात घेतलं.