Gopal Krishna Gokhale Jayanti मुंबईतील वाढती वाहतूककोंडी पाहता उड्डाणपूल हा सोयीस्कर मार्ग असल्याचे सिद्ध होत असताना अंधेरीत महानगर पालिकेकडून झालेल्या एका चुकीमुळे नागरिकांना मनस्ताप भोगावा लागला होता. २०१८ साली अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाचा काही भाग कोसळला होता, त्या दुर्घटनेत दोघांनी प्राणही गमावले. या पुलाचे मूळ बांधकाम १९५० साली करण्यात आले होते. हा केवळ वाहनांसाठी बांधलेला कॅन्टीलिव्हर पद्धतीचा पूल होता, १९७० साली हाच पूल पथपद जोडून पादचारी वाहतुकीसाठीही उपयोगात आणला गेला. त्यानंतर २०२२ पासून महानगर पालिकेकडून या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले होते. पुनर्बांधणीनंतर अंधेरी पूर्व- पश्चिम वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा होती. काही महिन्यांपूर्वीच या पुलाच्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता. यामुळे जुहूकडून येणारी वाहने थेट बर्फीवाला उड्डाणपूलमार्गे गोखले पुलावरून अंधेरी पूर्वेला जाणे अपेक्षित होते. परंतु, बर्फीवाला आणि गोखले पूल यांच्या पातळीत किमान दीड ते दोन मीटरचे अंतर राहिल्याने मिळणारा हा दिलासा लांबणीवर पडला. गोखले पुलाच्या बांधकामासाठी २०० कोटींहून अधिक खर्च आला होता. नवीन उघडकीस आलेल्या या त्रुटीमुळे या खर्चात आणखी भर पडली. या दोन पुलांमधील तफावत दूर करण्यासाठी बर्फीवाला पुलाचा भाग जॅकने उचलून गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूलाच्या समांतर पातळीवर जुळवण्याचे आव्हानात्मक काम मुंबई महानगरपालिकेने नुकतेच पूर्ण केले असून १ जुलै रोजी या दोन पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे.
दरम्यान, विश्वविख्यात भारतीय नेते महात्मा गांधी यांचे गुरू असा परिचय असलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांचे नाव या पुलाला देण्यात आले होते. महापालिकेने अशा प्रकारची त्रुटी ठेवून त्यांचाही मान राखलेला नाही, अशी टीका सर्वत्र झाली. या निमित्ताने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे कार्यकर्तृत्त्व समजून घेणे समयोचित ठरावे.
अधिक वाचा: महात्मा गांधी यांनी पाहिलेला पहिला हिंदी चित्रपट आणि राम यांचा नेमका काय संबंध आहे?
कोण होते गोपाळ कृष्ण गोखले?
१८५७ च्या उठावानंतर भारतीय राजकारणाने उदारमतवादी वळण घेतले. याच प्रवाहातील प्रमुख नेत्यांमध्ये सर फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे इत्यादी नेत्यांचा समावेश होता. ब्रिटिश राजवटीशी निष्ठा राखत घटनात्मक मार्गाने बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये राजकीय सुधारणा आणण्याचे प्रमुख उद्दिष्ट या नेत्यांनी बाळगले होते. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईने देशाला याच विचारसरणीतून निर्माण झालेला आणखी एक उल्लेखनीय नेता दिला. हा नेता म्हणजेच ‘गोपाळ कृष्ण गोखले’. नामदार गोखले यांच्यावर न्यायमूर्ती रानडे आणि ब्रिटिश तत्त्वज्ञ, संसदीय नेते एडमंड बर्क यांचा प्रभाव होता. त्यांच्याच तत्त्वप्रणालीला प्रमाण मानून नामदार गोखले यांनी पुढील ३० वर्षे घटनामक आदर्श साकारण्यासाठी कार्य केले. गोखले यांनी यासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रतिगामी किंवा क्रांतिकारी मार्गांचा पुरस्कार केला नाही, त्यांना तो मान्य नव्हता.
प्राध्यापक ते राजकीय नेते
गोपाळ कृष्ण गोखले हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील होते, त्यांचा जन्म कोतलुक येथे झाला. घरची परिस्थिती हलाखीची असूनही त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी आपले शिक्षण मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयातून पूर्ण केले. १८ व्या वर्षी शिक्षण पूर्ण झाल्यावरही त्यांनी सरकारी नोकरीची कास धरली नाही, समाजकार्य हेच त्यांच्या आयुष्याचे मुख्य उद्दिष्ट होते. पुढे ते वयाच्या विसाव्या वर्षी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात अर्थशास्त्र आणि इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. याच कालखंडात त्यांनी वेगवेगळ्या त्रैमासिक तसेच अनेक पत्रिकांच्या संपादकीयाची जबाबदारी पेलली.
राष्ट्रीय राजकारणात प्रवेश
१८९७ मध्ये गोखले यांनी इंग्लंडमधील वेल्बी कमिशनमध्ये ब्रिटीश वसाहतींच्या खर्चाची उलटतपासणी केल्यानंतर त्यांचा प्रथमच राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. गोखले यांच्या कार्यामुळे भारतात त्यांची प्रशंसा झाली. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याच्या ब्रिटीश लष्करी वित्तपुरवठा धोरणांमुळे भारतीय करदात्यांवर अतिरिक्त भार पडला होता, याविषयी गोखले यांनी भूमिका मांडली होती. नामदार गोखले १८८९ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाले. ते काँग्रेसच्या उदारमतवादी प्रमुख नेत्यांपैकी एक ठरले. काँग्रेसमध्ये सामील झाल्यावर तीन वर्षांनंतर त्यांनी अध्यापन सोडून आपल्या उर्वरित आयुष्यात कायदेमंडळातील महत्त्वपूर्ण कार्य केले.
अधिक वाचा: स्त्रियांचे अश्रू पुरुषांमधील आक्रमकता खरंच कमी करतात? काय सांगते नवीन वैज्ञानिक संशोधन…
वसाहती कायदेमंडळातील पदे
नामदार गोखले हे त्यांच्या ब्रिटिश कायदेमंडळातील व्यापक कार्यासाठी ओळखले जातात. १८९९ ते १९०२ या कालखंडात ते बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य तर १९०२ ते मृत्यूपर्यंत इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य म्हणून कार्यरत होते. १९०२ साली गोखले हे मध्यवर्ती कायदेमंडळावर निवडून गेले. विधिमंडळात त्यांनी अर्थसंकल्पावर एकूण १२ भाषणे केली. आर्थिक, शैक्षणिक अशा अनेक प्रश्नांचा उहापोह केला. नामदार गोखले हे त्यांच्या वक्तृत्त्व शैलीसाठी ओळखले जातात. १९०६ साली गोखले यांच्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर व्हाईसरॉय मिंटो याने दिलेली प्रतिक्रिया विशेष उल्लेखनीय होती. त्यांनी गोखले यांची प्रशंसा करत, अशा प्रकारचे भाषण इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येही क्वचित ऐकायला मिळते, असे नमूद केले. त्यांच्या महत्त्वाच्या कार्यांपैकी गोखले यांनी मुंबईमध्ये ब्रिटीश सरकारच्या जमीन महसूल धोरणांना विरोध केला. मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केला. तसेच अस्पृश्यतेविरुद्ध लढण्यासाठी समान संधी निर्माण करण्याचा आग्रह धरला.
१९१९ साली अस्तित्त्वात आलेल्या मोर्ले-मिंटो कायद्याच्या जडणघडणीत नामदार गोखले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. केंद्र आणि प्रांत या दोन्ही ठिकाणी विधान परिषदांच्या विस्ताराचा त्यांनी पुरस्कार केला. गोखले यांनी विकेंद्रीकरणाला पाठिंबा देत पंचायत आणि तालुका संस्थांच्या पदोन्नतीला अनुकूलता दर्शवली. स्त्री शिक्षणाचा हिरिरीने पुरस्कार केला. इतकेच नाही तर त्यासंबंधीचे विचार त्यांनी सुधारक, सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार इ. वृत्तपत्रांमधूनही मांडले.
वैचारिक मतभेद
गोखले १९०५ साली काँग्रेसच्या बनारस अधिवेशनात अध्यक्ष झाले. याच कालखंडात काँग्रेसमध्ये त्यांना मतभेदाला सामोरे जावे लागले होते. लाला लजपतराय आणि बाळ गंगाधर टिळक यांच्या नेतृत्वाखालील जहाल गट प्रभावी ठरला. जहाल आणि मवाळ यांच्यात कडवट मतभेद निर्माण झाले होते. १९०७ च्या सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये दोन गट पडले. वैचारिक मतभेद असूनही गोखले यांनी त्यांच्या विरोधकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवल्याचे इतिहासकारांनी नमूद केले आहे. १९०७ साली लाला लजपत राय यांना ब्रिटीशांनी अटक करून सध्याच्या म्यानमारमधील मंडाले येथे कैद केले होते. त्यावेळेस नामदार गोखले यांनी लाला लजपत राय यांच्या सुटकेसाठी आग्रही प्रचार केला.
नामदार गोखले आणि महात्मा गांधी
महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर, स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करण्याआधी ते गोखले यांच्या गटात सामील झाले होते. म. गांधींनी नामदार गोखले यांना त्यांचे राजकीय गुरू मानले होते, याचीच परिणती ‘धर्मात्मा गोखले’ या गांधीजी लिखित गुजराती पुस्तकात झाली. नामदार गोखले यांनी १९०६ मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. समाजाचे अंतर्बाह्य स्वरूप पालटल्याशिवाय समाज स्वातंत्र्यासाठी लायक होणार नाही, या न्या. रानडे यांच्या मताला अनुसरून गोखले यांनी निःस्वार्थ समाजसेवकांची संख्या निर्माण करण्यासाठी भारत सेवक समाजाची स्थापना केली. महात्मा गांधी यांनी भारत सेवक समाजाचे सदस्य होण्याची इच्छा व्यक्त केली होती. नामदार गोखले हे आपल्या सनदशीर मार्गाने केलेल्या राजकारणासाठी ओळखले जातात. हाच मार्ग पुढील भविष्यात महात्मा गांधी यांनीही आत्मसात केला होता.
अधिक वाचा: अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
आता मात्र मुंबई महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे वेगळ्याच कारणासाठी गोखले यांचे नाव चर्चेत आले आणि त्यामुळेच सर्वत्र महापालिकेवर टीकेची झोड उठली. गोखले यांच्या नावे बांधलेल्या पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर त्याचे पाडकाम पश्चिम रेल्वेने केले तर बांधकाम महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. जुन्या गोखले पुलाची उंची ५.७५ इतकी होती, हा पूल बर्फीवाला पुलाला जोडला गेला होता. नवीन पुलाचे बांधकाम सुरु असताना रेल्वेच्या हद्दीतील पुलांच्या उंचीचे नवीन धोरण घोषित झाले. या नवीन धोरणानुसार गोखले पुलाची उंची २ मीटरने वाढली, परिणामी नवीन गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्यात दोन मीटरचे अंतर निर्माण झाले. यासाठी गर्डरच्या मदतीने पूल जोडला जाणे आवश्यक आहे. परंतु गोखले पुलाच्या बांधकामाचा दुसरा टप्पा सुरु असल्याने हे काम सध्या लांबणीवर पडले आहे. ज्यावेळेस पुलाच्या दुसऱ्या बाजूचे काम पूर्ण होईल त्यानंतरच जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी किमान अजून एका वर्षाचा कालावधी लागणार असल्याने नागरिकांना करावा लागणारा वाहनकोंडीचा सामना अद्याप सुटण्याची शक्यता नाही.