पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी १७ डिसेंबर रोजी गुरू तेग बहादूर (१६२१-१६७५) यांच्या हौतात्म्याचे स्मरण केले, गुरू तेग बहादूर हे शिखांचे नववे गुरू होते, त्यांचा गौरव करताना पंतप्रधान मोदी यांनी त्यांना धैर्य आणि सामर्थ्याचा दीपस्तंभ म्हटले. “स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठेसाठी त्यांचा अतुलनीय त्याग काळाच्या ओघात प्रतिध्वनीत होतो, मानवतेला सचोटीने आणि करुणेने जगण्यासाठी प्रेरणा देतो. त्यांची शिकवण, एकता आणि नीतिपरायणात, बंधुता आणि शांतता यांवर भर देणारी आहे,” असे पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले. गेल्या वर्षी, मुघल सम्राट औरंगजेबच्या आदेशानुसार शिरच्छेद करण्यात आलेल्या गुरू तेग बहादूर यांच्या ४०० व्या जयंती उत्सवादरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, गुरू तेग बहादूर यांनी काश्मिरी पंडितांना मुघलांच्या क्रूरतेपासून वाचवण्यासाठी आपले प्राण दिले. त्याच पार्श्वभूमीवर गुरू तेग बहादूर, औरंगजेब आणि काश्मिरी पंडित यांच्यातील संबंध जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरू तेग बहादूर यांचे जीवन

पहिले शीख गुरू ‘गुरू नानक देव यांच्यानंतरच्या ,१० शीख गुरूंमध्ये सर्वाधिक प्रवास करणारे गुरू तेग बहादूर होते. त्यांनी पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, आसाम, बांगलादेश असा प्रवास केला. गुरू तेग बहादूर यांच्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण त्यांच्या भेटींच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापित केलेल्या गुरूद्वारांच्या स्वरूपात केले गेले आहे, त्यात अयोध्येतील एका गुरूद्वाराचाही समावेश आहे. गुरू नानक देव यांच्यानंतर, भारताच्या विविध भागांतील अनेक शीख कुटुंबांना त्यांच्या कोणत्याही गुरूंना जवळून पाहता आले नाही. गुरू तेग बहादूर यांच्या प्रवासामुळे पंजाबपासून दूर असलेल्या शीख केंद्रांचे पुनरुज्जीवन झाले. १६९९ सालामध्ये दहावे शीख गुरू ‘गुरू गोविंद सिंग’ यांनी खालशाची स्थापना केली तेव्हा हे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे ठरले. गुरू तेग बहादूर हे एक महान कवी देखील होते आणि त्यांची स्तोत्रे गुरू ग्रंथ साहिबचा भाग आहेत.

अधिक वाचा: Gwalior ‘city of music’: अकबरालाही संगीताच्या प्रेमात पाडणाऱ्या शहराला जागतिक ओळख; काय आहेत या शहराशी संबंधित संगीत परंपरा?

गुरू तेग बहादूर यांचे पूर्वीचे नाव ‘त्याग मल’ होते. त्यांचे वडील आणि शिखांचे सहावे गुरू, गुरू हरगोविंद साहिब (१५९५-१६४४) यांनी त्यांचे नाव बदलून तेग बहादूर ठेवले. रणांगणावरील त्यांच्या लढाई आणि तलवारीच्या कौशल्यातून त्यांना नाव मिळाले. गुरू तेग बहादूर हे केवळ योद्धाच नव्हते तर एक महान मुत्सद्दीही होते. अनेक समकालीन राजांशी त्यांचे जवळचे संबंध होते. भारताच्या ईशान्य प्रदेशाच्या दौऱ्यादरम्यान, तेग बहादूर साहिब यांनी राजा बिशन सिंग आणि राजा परणपाल यांच्यातील सलोखा घडवून आणला, त्यामुळे मोठे युद्ध टळले. १६६५ मध्ये औरंगजेबाच्या आदेशानुसार त्यांना मुघलांनी पहिल्यांदा अटक केली; परंतु त्यांच्या प्रस्थापित केलेल्या राजनैतिक संबंधांमुळे त्यांची सुटका झाली आणि ते पूर्वेकडे प्रवास करू शकले. त्या नंतर त्यांना १० वर्षांनंतर १६७५ साली त्यांना फाशी देण्यात आली.

गुरू तेग बहादूर यांना औरंगजेबाने फाशी का दिली?

दशम ग्रंथ (१६००), गुरबिलास (१७२०), गुरबिलास पातशाही दासवी (१७५१), आणि बन्सावलिनामा (१७६९) या शीख सूत्रांनुसार, काश्मिरी पंडित आनंदपूर साहिब येथे गुरू तेग बहादूर यांच्याकडे मदतीसाठी गेले होते, औरंगजेबाची अधिकृत मंडळी त्यांना सक्तीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडत होती. म्हणूनच ते संरक्षण मिळविण्यासाठी गुरू तेग बहादूर यांच्याकडे आले होते. गुरूंनी पंडितांना त्यांच्या संरक्षणाचे आश्वासन दिले. यासाठीच जेंव्हा ते नवी दिल्लीला पोहोचले तेव्हा त्यांना भाई मट्टी दास, भाई सत्ती दास (बंधू) आणि भाई दियाला जी यांच्यासोबत औरंगजेबकडून अटक करण्यात आली. गुरू तेग बहादूर यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगण्यात आले, तशी धमकी ही देण्यात आली, त्यांच्या तीन शिष्यांची एकामागून एक हत्या करण्यात आली. तरीही ते त्यांच्या नकारावर ठाम राहिले, यामुळेच त्यांना चांदणी चौकात फाशी देण्यात आली. जिथे गुरू तेग बहादूर यांचा शिरच्छेद झाला होता, तेथेच गुरूद्वारा सिस गंज आहे. हा गुरूद्वारा १७८३ मध्ये बांधण्यात आला. संसद भवनाजवळ रकाब गंज येथे आणखी एक गुरूद्वारा आहे. या ठिकाणी गुरू तेग बहादूर यांच्या पार्थिवावर भाई लखी शाह यांनी स्वतःचे घर पेटवून अंत्यसंस्कार केले होते, असे मानले जाते.

अधिक वाचा: Mumbai 26/11 Attacks: …आणि तुकाराम ओंबळे शहीद झाले! गड आला पण सिंह गेला…!

गुरू तेग बहादूर यांच्या हुतात्मा तारखेवरून गोंधळ

गुरू तेग बहादूर यांच्या हौतात्म्याच्या तारखेबाबत गोंधळ आहे. श्री गुरू ग्रंथ साहिब वर्ल्ड युनिव्हर्सिटी, फतेहगढ साहिब येथील धर्म अभ्यास विभागातील डॉ. हरदेव सिंग यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, गेल्या काही वर्षांमध्ये कॅलेंडरमध्ये झालेल्या बदलांमुळे हे घडले आहे. “गुरुजींचा शिरच्छेद झाला तेव्हा इस्लामिक हिजरी कॅलेंडर लागू होते. नंतर, शीख इतिहासकार भारतीय उपखंडात पारंपारिकपणे वापरल्या जाणार्‍या चंद्र-सौर विक्रम संवत कॅलेंडरवर अवलंबून राहू लागले. आणि मग ब्रिटिशांनी ग्रेगोरियन कॅलेंडर सुरू केले. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला”. काही वर्षांपूर्वी काही शीख विद्वानांनी शीख इतिहासातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांच्या तारखा निश्चित करण्यासाठी नानकशाही कॅलेंडर लागू करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावर एकमत झाले नाही. म्हणून हा गोंधळ आहे. त्यांच्या तिथींबद्दल घोळ असला तरी त्याचा परिणाम त्यांच्या बलिदानावर झालेला नाही. भाविकांच्या मनातील त्यांचे स्थान अढळ आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who was guru tegh bahadur who brought death closer than islam svs
Show comments