अमेरिकेतील अब्जाधीश जेफ्री एपस्टीन याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्याच्यावर चार वर्षांपूर्वी किशोरवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून खटला चालवण्यात आला होता. तो खटला सुरू असतानाच त्याने आत्महत्या केली. त्यानंतर त्याची ब्रिटीश प्रेयसी गिलॅन मॅक्सवेल हिच्यावर खटला चालवण्यात आला. तिला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्याशी संबंधित दस्तऐवज उघड केले जात आहेत. त्यामधील बडी नावे पाहून लोकांना आश्चर्याचे धक्के बसत आहेत.
जेफ्री एपस्टीन कोण होता?
जेफ्री एपस्टीन हा अमेरिकी वित्तपुरवठादार होता. अमेरिका आणि जगभरातील मोठमोठ्या लोकांमध्ये त्याचा राबता होता. त्यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे राजपुत्र अँड्र्यू अशा उच्चपदस्थांचा समावेश आहे. लैंगिक शोषणाचे आरोप होण्यापूर्वी तो त्याच्या आलिशान राहणीमानासाठी ओळखला जात होता. विशेष म्हणजे २००५ मध्ये त्याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाल्यानंतरही यापैकी अनेकांनी त्याची संगत सोडली नव्हती.
ही नावे अचानक का समोर येऊ लागली आहेत?
या प्रकरणात जेफ्री आणि त्याची प्रेयसी गिलॅन मॅक्सवेल यांच्याशी संबंधित प्रकरणातील लोकांची नावे उघड केली जात आहेत. ३ जानेवारी ते ५ जानेवारी या तीन दिवसांमध्ये न्यायालयाने तीन याद्या जाहीर केल्या. शुक्रवार ५ जानेवारीच्या यादीत माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचे नाव आले आहे. त्याआधीच्या याद्यांमध्ये बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प, स्टीफन हॉकिंग अशी अनेक धक्कादायक नावे उघड झाली आहेत.
या प्रकरणात गिलॅन मॅक्सवेलचा काय संबंध होता?
गिलॅन मॅक्सवेल ही एपस्टीनची प्रेयसी होती. तिला २०२१ मध्ये किशोरवयीन मुलींना फूस लावून लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. मॅक्सवेल या मुलींना अमेरिकी श्रीमंत लोक आणि जेफ्री एपस्टीनकडे पाठवत होती असा तिच्यावर आरोप होता.
आरोपांची सुरुवात कधी झाली?
सर्वात प्रथम चार महिलांनी एपस्टीनवर आरोप केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९० ते २००० दरम्यान त्यांना फ्लोरिडा, न्यूयॉर्क आणि न्यू मेक्सिको येथे एपस्टीनच्या आलिशान बंगल्यावर त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. त्यासाठी मॅक्सवेलने त्यांना फूस लावली होती. या पीडित महिलांना न्याय मिळवण्यासाठी कित्येक वर्षे न्यायालयीन लढाई लढावी लागली. याच साखळीमध्ये २०१५ साली व्हर्जिनिया गिफ्रे नावाच्या महिलेने दिवाणी खटला दाखल केला. तिचा आरोप असा होता की, ती १७ वर्षांची असताना एपस्टीनने तिला मसाज थेरपिस्ट म्हणून नोकरी दिली आणि तिचे लैंगिक शोषण केले. एपस्टीन स्वतः तिचे शोषण करायचा, त्याशिवाय तो तिला इतर पुरुषांकडेही पाठवत होता. यानंतर एपस्टीनवर २०१९ साली लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली. महिनाभर गजाआड राहिल्यानंतर त्याने मॅनहटनच्या तुरुंगातील त्याच्या कोठडीत आत्महत्या केली. त्यानंतर मॅक्सवेलवर खटला चालवण्यात आला.
त्या खटल्याचे पुढे काय झाले?
या प्रकरणात गिलॅन मॅक्सवेलला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपांच्या तपासादरम्यान त्यामध्ये बरीच बडी नावे समोर आली. या माहितीला पाय फुटले आणि अनेक नावे लोकांपर्यंत पोहोचले. त्यानंतर न्यायालयाने ती सर्व नावे उघड करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणातील अक्षरशः शेकडो फायली उघड करण्यात आल्या आहेत. या खटल्यातील पीडित महिलांना प्रत्येकी २० कोटी डॉलर भरपाई मिळू शकतील असे सुनावणीदरम्यान एकदा सांगण्यात आले होते.
या प्रकरणात कोणाकोणाची नावे पुढे आली आहेत?
सर्वात प्रथम, या फायलींमध्ये जी नावे उघड झाली आहेत ते सर्व आरोपी किंवा दोषी नाहीत. त्यामध्ये काही लैंगिक शोषणाच्या पीडित महिला आणि साक्षीदारांचीही नावे आहेत. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचे नाव साक्षीदार म्हणून नोंदवण्यात आले आहे. त्याशिवाय एपस्टीनचे कर्मचारी आणि खटल्यशी संबंधित लोकांचीही नावे आहेत. त्यामध्ये बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प, राजपुत्र अँड्र्यू, मायकेल जॅक्सन, स्टिफन हॉकिंग, जादूगार डेव्हिड कॉपरफिल्ड यासारख्या नावांमुळे वादळ उठले.
पीडितांचे काय काय आरोप आहेत?
विविध पीडितांनी केलेल्या आरोपांनुसार, बिल क्लिंटन या युवतींकडून मसाज करून घ्यायचे. त्यांनी या आरोपांचे खंडन केले. पण विमानांच्या उड्डाणांच्या नोंदी तपासून पाहिल्यानंतर हे लक्षात आले की, बिल क्लिंटन यांनी पॅरिस, बँकॉक आणि ब्रुनेईला जाण्यासाठी एपस्टीनच्या विमानाचा वापर केला होता. अन्य एका पीडित जोहाना सोजबर्ग हिने सांगितले की बिल क्लिंटन कमी वयाच्या मुलींशी सलगी करायचे. तसेच मायकेल जॅक्सन आणि डेव्हिड कॉपरफिल्ड यांनाही ती एपस्टीनच्या घरी भेटली होती. मात्र, आपण जॅक्सनला मसाज सेवा देण्यास नकार दिला होता असे तिने सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टीनबरोबर कॅसिनोचा दौरा केला होता. त्यांनीही एपस्टीनच्या विमानाचा अनेकदा वापर केला होता. सर्वात धक्कादायक उल्लेख दिवंगत शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांचा आहे. गिफ्रेने केलेल्या आरोपांनुसार तिला हॉकिंग यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी भाग पाडण्यात आले होते.
nima.patil@expressindia.com