Ajmer Sharif Dargah Controversy: २७ नोव्हेंबर (बुधवार) रोजी अजमेर न्यायालयाने हिंदू सेनेची याचिका सुनावणीस स्वीकारली. या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, प्रतिष्ठित अजमेर शरीफ दर्ग्याखाली एक शिवमंदिर आहे. तसेच या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी पुरातत्त्वीय सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दर्गा हे धार्मिक महापुरुषांच्या विशेषतः सूफी संतांच्या, समाधीस्थळांवर बांधलेले स्मारक असते. अजमेरमधील दर्गा ही ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती (मोइनुद्दीन किंवा मो’इन-अल-दिन) यांच्या समाधीचे ठिकाण आहे. भारतीय उपखंडात सूफी विचारसरणीच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. यासंबंधी थोडक्यात इतिहासाचा घेतलेला हा आढावा.
आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात
मोईनुद्दीन यांचा जन्म इ.स. ११४१ साली सिस्तान प्रांतात (आधुनिक इराण) झाला. हा प्रांत सध्याच्या अफगाणिस्तानच्या सीमेवर आहे. मोईनुद्दीन हे प्रेषित मोहम्मद यांचे वंशज होते असे मानले जाते. १४ व्या वर्षीच पोरके झालेल्या मोईनुद्दीन यांच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात एका योगायोगाने झाली. त्यांची भेट इब्राहिम कंदोझी या भ्रमंती करणाऱ्या साधूबरोबर झाली. त्या वृद्ध साधूबरोबर भोजन करत असताना मोईनुद्दीन यांनी त्या साधूला विचारले की, एकटेपणा, मृत्यू आणि विनाश यापलीकडे जीवनात आणखी काही आहे का? यावर कंदोझी यांनी होकार दिला. परंतु असेही सांगितले की, “प्रत्येक माणसाने स्वतःसाठी या सत्याचा शोध घेतला पाहिजे आणि स्वतःच्या अनुभवातून ते समजून घेतले पाहिजे.” (मेहरू जाफर, द बुक ऑफ मोइनुद्दीन चिश्ती, २००८). या संवादामुळे मोईनुद्दीन यांना आत्म-शोध आणि आध्यात्मिकतेच्या मार्गावर जाण्याची प्रेरणा मिळाली. २० व्या वर्षापर्यंत मोईनुद्दीन यांनी बुखारा आणि समरकंद येथील विद्यालयांमध्ये धर्मशास्त्र, व्याकरण, तत्त्वज्ञान, नीतीशास्त्र, आणि धर्म यांचा अभ्यास केला. त्यांच्या प्रवासाने त्यांना शेवटी ख्वाजा उस्मान हारुनी या सूफी संतांपर्यंत पोहोचवले. ख्वाजा उस्मान हारुनी हे चिश्ती परंपरेचे आदरणीय गुरू होते. त्यांचे स्थान सध्याच्या अफगाणिस्तानातील हेरातजवळ होते. ख्वाजा उस्मान यांच्यात मोईनुद्दीन यांना एक मार्गदर्शक मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कठोर आध्यात्मिक शिस्तीत अनेक वर्षे घालवली. अखेरीस, त्यांना चिश्ती परंपरेत दीक्षा देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या गुरूंनी त्यांना स्वतःच्या मार्गाने जाण्यास प्रोत्साहित केले आणि मोईनुद्दीन यांना त्यांच्या स्वतंत्र आध्यात्मिक प्रवासावर पाठवले.
अधिक वाचा: Ajmer Sharif Dargah: अजमेर शरीफ़ दर्गा हे शिवमंदिर होते का? ऐतिहासिक संदर्भ काय सुचवतात?
अजमेरचा गरीब नवाज
अफगाणिस्तानात प्रवास करत असताना मोईनुद्दीन यांनी क़ुतुबुद्दीन बख़्तियार काकी यांना आपला पहिला अनुयायी म्हणून स्वीकारले. क़ुतुबुद्दीन यांच्याबरोबर त्यांनी प्रथम मुलतानला प्रवास केला. मुलतानला त्यांनी सुमारे पाच वर्षे संस्कृतचा अभ्यास केला आणि हिंदू पंडितांशी संवाद साधला. त्यानंतर ते लाहोरला गेले, जिथे त्यांनी विद्वान अली हुज्विरी यांच्या दर्ग्यावर ध्यान केले. लाहोरहून मोईनुद्दीन दिल्लीत गेले आणि नंतर अजमेरला पोहोचले. अजमेर ही चौहान साम्राज्याची राजधानी होती. जाफर यांच्या मते इ.स. ११९१ च्या सुमारास वयाच्या ५० व्या वर्षी मोईनुद्दीन अजमेरला पोहोचले. या काळात अनेकांच्या मते अजमेरचे वैभव चौहान शासक पृथ्वीराज तिसरा यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च शिखरावर होते. मात्र, उत्तर भारतातील चौहान राजवंशाचा काळ रक्तरंजित पद्धतीने संपणार होता. इ.स. ११९२ मध्ये हरियाणाच्या तराइन येथे झालेल्या दुसऱ्या लढाईत मोहम्मद घोरीकडून पराभव पत्करल्यानंतर चौहान राजवंशाचे राज्य संपुष्टात आले. मोहम्मद घोरीच्या सैन्याने चौहान साम्राज्याची राजधानी उद्ध्वस्त केली आणि एका विध्वंसक हत्याकांडाची कहाणी मागे सोडली. त्यांच्या या विध्वंसामुळे चौहान साम्राज्याच्या इतिहासात दुःखद अध्याय कोरला गेला.
अजमेरमधील दुःख पाहून मोईनुद्दीन यांनी त्या शहरात थांबून लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. अजमेरमध्ये भेटलेल्या त्यांच्या पत्नी बिबी उम्मतुल्ला यांच्याबरोबर त्यांनी शहरात मातीचे एक साधे घर बांधले आणि गरजवंतांसाठी सेवा करणे सुरू केले. जाफर लिहितात, “बिबी आणि मोईनुद्दीन यांचे साधे मातीचे घर लवकरच छप्पर, आश्रय किंवा अन्न नसलेल्या लोकांसाठी तसेच शांतता आणि आधार शोधणाऱ्यांसाठी आश्रयस्थान ठरले. त्यांच्या दयाळूपणामुळे आणि आत्मत्यागाच्या अद्वितीय कार्यांमुळे मोईनुद्दीन यांना गरीब नवाज (गरिबांचा मित्र) हा मानाचा किताब मिळाला.” उदाहरणार्थ, जाफर लिहितात, “भटक्या लोकांसाठी बिबी यांच्या देखरेखीखाली एक मोठे लंगरखाना (सार्वजनिक स्वयंपाकघर) चालवत. येथे धर्म किंवा सामाजिक स्थान यांची पर्वा न करता प्रत्येकाचे स्वागत केले जाई आणि अन्न दिले जात असे.” मोईनुद्दीन यांनी हिंदू साधू आणि संतांशी देखील संवाद साधला. त्यांनी लक्षात घेतले की, त्यांच्याप्रमाणेच हे लोकही त्यांच्या सृजनकर्त्याप्रती परिपूर्ण भक्ती व्यक्त करण्यास न घाबरता, परंपरावादी धर्मगुरूंच्या संकुचित विचारांना नाकारत होते. त्यांच्या शिकवणींमध्ये समानता, दैवी प्रेम, आणि मानवतेची सेवा यावर भर दिला गेला, ज्याने धर्माच्या सीमा ओलांडल्या. ही शिकवण भारतीय उपखंडातील इस्लामी आक्रमणाच्या काळात आणि राजकीय अस्थिरतेच्या काळातही एकात्मतेचा संदेश देत राहिली.
अतिंद्रिय वारसा
सूफीवाद सातव्या ते दहाव्या शतकादरम्यान इस्लामिक समाजातील वाढत्या ऐहिकतेला प्रतिकार करण्यासाठी उदयास आला. सूफी पंथाच्या स्वरूपात अधिक तपस्वी आणि भक्तिमय इस्लाम विकसित होत होता. ज्यामध्ये विविध गूढ प्रथांचा समावेश होता. कालांतराने, सूफी साधक विविध परंपरांमध्ये संघटित झाले. त्यांच्या केंद्रस्थानी एखाद्या शिक्षकाच्या किंवा वलीच्या शिकवणी असायच्या. चिश्ती पंथाचा उगम दहाव्या शतकात अबू इशाक शामी यांनी हेरातजवळील चिश्त या गावात केला. परंतु भारतीय उपखंडात या पंथाचा प्रसार ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती आणि त्यांच्या शिष्यांमुळे झाला. मोईनुद्दीन यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक कुतुबुद्दीन बख्तियार काकी (११७३-१२३५) होते. त्यांनी दिल्लीमध्ये चिश्ती पंथाची पायाभरणी केली. काकी दिल्लीचे तिसरे सुलतान इल्तुतमिश यांचे आध्यात्मिक गुरु होते आणि दिल्लीच्या आध्यात्मिक जीवनाचे मध्यवर्ती व्यक्तिमत्त्व ठरले. कुतुब मिनार त्यांच्या नावावरून ओळखला जातो आणि त्यांचा दर्गा दिल्लीतील महरौली येथे या प्रसिद्ध वास्तूला लागून आहे. काकींच्या शिष्यांपैकी एक होते बाबा फरीदुद्दीन (११७३-१२६५). त्यांनी पंजाबात चिश्ती पंथाच्या शिकवणींचा प्रसार केला. बाबा फरीद यांना “गंज शकर” किंवा “गोडव्याचा खजिना” हे नाव मोईनुद्दीन यांनी दिले होते. आणखी एक महत्त्वाचे शिष्य होते ते म्हणजे हमीदुद्दीन नागौरी. त्यांनी नागौर येथे आध्यात्मिक नेतृत्व केले. निझामुद्दीन औलिया (१२३८-१३२५), ज्यांच्या शिकवणी आणि दिल्लीतील दर्गा आजही आदरपूर्वक स्मरणात आहेत आणि त्यांचा उत्तराधिकारी चिराग देहलवी (१२७४-१३५६) यांनी मोईनुद्दीन यांच्या संदेशाचा प्रसार त्यांच्या निधनानंतरही (इ.स. १२३६) केला.
चिश्ती पंथाचा प्रभाव इतिहासभर राजसत्तेच्या आश्रयातून दिसून येतो. मुघल सम्राटांमध्ये, विशेषतः अकबर यांना ख्वाजा मोईनुद्दीन यांच्याबद्दल अपार आदर असल्याचे म्हटले जाते. अकबरने त्यांच्या दर्ग्याला अनेक वेळा भेट दिली, त्यांच्या समाधीचे सौंदर्यीकरण केले आणि अजमेर शहराला नवजीवन दिले. जाफर लिहितात, “मुघल शाही कुटुंबातील सदस्यांनी दर्ग्याला भेट दिल्यामुळे अजमेर इतके लोकप्रिय झाले की, श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांनी शहर भरून गेले. येथे अधिक मशिदी, बंदिस्त अंगणे आणि अनेक विश्रांतीगृहांची उभारणी झाली.” ख्वाजा मोईनुद्दीन यांची शिकवण आजही भारतात आदराने स्मरण केली जाते. प्रेम, करुणा, आणि सर्वसमावेशकतेवर त्यांनी दिलेला भर धार्मिकदृष्ट्या विविधतापूर्ण अशा या प्रदेशात खोलवर पोहोचला. इस्लामिक आध्यात्मिकतेत भारतीय सांस्कृतिक प्रथांचा समावेश करून त्यांनी समाजांमधील दरी कमी करण्याचे कार्य केले. यामुळे ख्वाजा मोईनुद्दीन यांची शिकवण आजही भारताच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.