भारताचा मोस्ट वँटेड गुन्हेगार आणि खलिस्तानी कमांडो फोर्सचा (KCF) प्रमुख परमजीत सिंग पंजवर याची शनिवारी (६ मे) लाहोर येथे हत्या करण्यात आली. दल खालसा या कट्टरपंथी शीख संघटनेचा नेता कन्वर पाल सिंग याने पंजवरचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. “आमच्या माहितीनुसार, पंजवर सकाळी चालण्यासाठी बाहेर पडले असताना दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली,” अशी प्रतिक्रिया कन्वर पालने दिली. तसेच पाकिस्तानी सरकारने पंजवरला सुरक्षा प्रदान केलेली होती. त्यातील सुरक्षा रक्षकांनी हल्लोखोरांवर गोळीबार केला, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला आहे. ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व करणारे जनरल अरुणकुमार वैद्य हे पुणे येथे वास्तव्यास होते. १० ऑगस्ट १९८६ रोजी खलिस्तानी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या हत्येचा सूत्रधार परमजीत सिंग पंजवर होता.

कोण आहे परमजीत सिंग पंजवर आणि तो लाहोरमध्ये काय करत होता?

पंजाबच्या तरण तारण जिल्ह्यातील पंजवर गावात १९६० रोजी परमजीत सिंगचा जन्म झाला. १९८६ मध्ये खलिस्तानी कमांडो फोर्स या संघटनेत सामील होईपर्यंत त्याने सोहल येथील सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरी केली. पंजवरचा चुलत भाऊ, माजी पोलीस अधिकारी लाभ सिंग तेव्हा केसीएफचा कमांडर होता. लाभ सिंगचा परमजीतवर मोठा प्रभाव होता. १९८६ साली मानबीर सिंह चहेरू यांनी केसीएफची स्थापना केली होती. स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी या संघटनेची स्थापना झाली. केसीएफच्या कारवायांना निधी मिळावा यासाठी बँकेवर दरोडा घालणे, खंडणी उकळणे आणि अपहरण करण्यासारखे गुन्हे केले गेले. त्यातून मिळालेल्या पैशांनी आधुनिक शस्त्रे खरेदी करण्यात आली. केसीएफ संघटनेवर भारतात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. भारतीय भूमीवर हल्ला करणे, तसेच ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये सहभागी असलेले भारतीय लष्कराचे अधिकारी जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या केल्याचाही केसीएफवर आरोप आहे.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

केसीएफचा प्रमुख चहेरूला अटक झाल्यानंतर लाभ सिंग याने संघटनेची सूत्रे हाती घेतली. लाभ सिंग हा सुखदेव सिंग किंवा सुखा सिपाही या नावानेही ओळखला जात असे. १९९० साली लाभ सिंग याचा मृत्यू झाल्यानंतर केसीएफ संघटनेत फूट पडली. त्यांपैकी एका गटाचे नेतृत्व परमजीत सिंग करत होता. त्या वेळी भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या ‘माझा’ पट्ट्यात परमजीतची बरीच दहशत होती. (माझा पट्टा भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागला गेला आहे. फाळणीच्या आधी या माझा पट्ट्यात १३ जिल्हे होते. त्यांपैकी भारतात आता चार जिल्हे आहेत.) भारतीय सुरक्षा यंत्रणाकडून जेव्हा खलिस्तानी संघटनावर मोठ्या प्रमाणात कारवाईची सुरुवात झाली, तेव्हा परमजीत सिंगने पाकिस्तानात पलायन केले. तेव्हापासून तो पाकिस्तानात आश्रयास होता. परमजीत आणि इतर आतंकवाद्यांना पाकिस्तानने भारताच्या ताब्यात द्यावे, यासाठी भारत सरकारने अनेकदा परमजीतचे नाव पुढे केले होते.

जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या

जनरल अरुणकुमार वैद्य यांची १ ऑगस्ट १९८३ रोजी भारतीय सैन्याच्या सर्वोच्च पदी नियुक्ती झाली, तेव्हा पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांचे आंदोलन जोर पकडू लागले होते. ६ जून १९८४ रोजी सुवर्ण मंदिराला लष्करी तळ बनविलेल्या दहशतवाद्यांवर कारवाईसाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारची सुरुवात केली. सुवर्ण मंदिरातील सशस्त्र दहशतवादी विरुद्ध भारतीय लष्कर असा संघर्ष सुरू झाला. भारतीय लष्कराचे नेतृत्व जनरल अरुणकुमार वैद्य करत होते. या संघर्षादरम्यान शिखांसाठी पवित्र असलेल्या सुवर्ण मंदिराचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भारतीय लष्कराच्या कारवाईत खलिस्तानी नेते भिंद्रनवाले मारले गेले. या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी खलिस्तानवाद्यांकडून दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या. ज्यामध्ये ऑक्टोबर १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली आणि ऑगस्ट १९८६ मध्ये जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या झाली.

हे वाचा >> कोण होते जनरल अरुणकुमार वैद्य? कसे झाले ते लष्करप्रमुख

ऑपरेशन ब्लू स्टारनंतर चारच महिन्यांत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यामुळे अरुणकुमार वैद्य यांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. आपल्यावर हल्ला होईल, याची पूर्ण कल्पना असूनही अरुणकुमार वैद्य यांनी आपल्या दैनंदिन कार्यक्रमात बदल केले नव्हते. वैद्य यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सुखविंदर सिंह (परमजीतचा चुलत भाऊ) आणि त्याचा सहकारी जिंदा याला कालांतराने अटक करण्यात आले. दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. खलिस्तान्यांनी या दोघांनाही शहीद दर्जा दिला आहे. या दोघांवर २०१५ साली एक चित्रपट तयार करण्यात आला होता, मात्र भारत सरकारने त्याचे प्रदर्शनास परवानगी दिली नाही.

केसीएफला निधी मिळण्यासाठी अमली पदार्थांची तस्करी

पाकिस्तानात आश्रय घेतल्यानंतर केसीएफ संघटना जिवंत ठेवण्याचे आव्हान होते. यासाठी सीमेपलीकडून हेरॉईनची तस्करी करण्याचे काम परमजीतने केले. भारत सरकारच्या माहितीनुसार, परमजीत सिंग पंजवर पाकिस्तानात युवकांना शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी शिबीर आयोजित करत असे. तसेच भारतात अवैध मार्गाने शस्त्र, दारूगोळा यांची रसद पुरवून अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती आणि आर्थिक संस्थांना लक्ष्य करण्याचे कामही तो करत होता. यासोबतच पाकिस्तानच्या रेडिओ वाहिनीवर परमजीतकडून राष्ट्रद्रोही आणि फुटीरतावादाला खतपाणी घालणारी चिथावणीखोर भाषणे देण्याचा कार्यक्रम प्रसारित केला जात होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतातील अल्पसंख्याकांना सरकारविरुद्ध उभे करण्याचे कारस्थान रचले जात होते. यासोबतच अमली पदार्थांची तस्करी, तसेच दहशतवादी आणि तस्कर यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणूनही परमजीत भूमिका वठवत करत होता. सीमेपलीकडून अमली पदार्थांचा पुरवठा करणे आणि बनावट नोटांचे रॅकेट चालविण्यातही त्याचा सहभाग असल्याचे पुरावे भारत सरकारकडे आहेत.

आणखी वाचा >> जनरल अरुणकुमार वैद्य यांचा मारेकरी सुखदेव सिंग याने न्यायालयात अजब तर्कट का केले?

१९८९ ते १९९० या एका वर्षातच परमजीत सिंग पंजवरवर सात गंभीर गुन्हे दाखल झाले होते. ज्यामध्ये हत्या आणि टाडा (Terrorist and Disruptive Activities (Prevention) Act) सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. १२ फेब्रुवारी १९८७ रोजी लुधियानामधील पंजाब नॅशनल बँकेवर दरोडा टाकून ५.७० कोटींची रोकड लंपास करण्यात आली होती, या गुन्ह्यातही पंजवरचा सहभाग असल्याचा आरोप आहे.

परमजीत सिंग पंजवरचे कुटुंबीय- पत्नी आणि दोन मुले जर्मनीमध्ये राहत असल्याचे बोलले जाते.