भारताला थोर क्रांतिवीरांची परंपरा आहे. त्यातील एक प्रमुख क्रांतिकारक म्हणजे राम प्रसाद बिस्मिल. ११ जून, १८९७ रोजी जन्मलेल्या बिस्मिल यांना काकोरी रेल्वे अॅक्शन घटनेकरिता ब्रिटिशांनी फाशी दिली. परंतु, राम प्रसाद बिस्मिल कोण होते आणि काकोरी रेल्वे अॅक्शन ही घटना काय आहे, हे जाणून घेणे उचित ठरेल.
राम प्रसाद बिस्मिल कोण होते ?
११ जून १८९७ रोजी राम प्रसाद बिस्मिल यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील शाहजहानपूर जिल्ह्यातील एका गावात झाला. राजपूत तोमर कुटुंबात जन्मलेल्या राम प्रसाद बिस्मिल आपल्या वडिलांकडून हिंदी आणि जवळच राहणाऱ्या मौलवीकडून उर्दू शिकले. त्यांचे शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातील शाळेत झाले. त्यामुळे लहानपणीच त्यांचा विविध भाषांशी संपर्क आला. केवळ भाषा शिकून ते थांबले नाही, तर त्यातील साहित्याविषयीही त्यांना ओढ होती. यामुळेच लहान वयातच त्यांच्यातील कवित्व विकसित होत गेले. ते लेखक-कवी म्हणून उदयास आले ते आर्य समाजामुळे. १८-१९ व्या शतकात उत्तर प्रदेशच्या भागात आर्य समाजाचे वर्चस्व होते. या वर्चस्वाच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी आर्य समाजामध्ये प्रवेश घेतला. यामध्ये त्यांनी समाज जागृतीसाठी काव्यरचना, लेखन केले. ‘अज्ञात’, ‘राम’, ‘बिस्मिल’ या नावांनी त्यांनी हिंदी आणि उर्दूमध्ये काव्यरचना केली. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी, त्यांनी आर्य समाजाचे भाई परमानंद यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेबद्दलचा राग व्यक्त करून, मेरा जनम ही कविता लिहिली.
हेही वाचा : विश्लेषण : बलात्काराची प्रकरणे का वाढत आहेत? बलात्काराची मानसिकता आणि ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे काय ?
मणिपूरचा कट
शालेय शिक्षण झाल्यावर बिस्मिल राजकारणात सामील झाले. परंतु, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी याचना करणे, वाटाघाटी करणे त्यांना मान्य नव्हते. ब्रिटिश स्वातंत्र्य देत नसतील तर हिसकावून घेतले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. या संदर्भात त्यांनी ‘गुलामी मिटा दो’ ही कविता लिहिली.
“दुनिया से गुलामी का मैं नाम मिटा दूंगा,
एक बार जमाने को आझाद बना दूंगा.”
आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी ‘मातृवेदी’ नावाची क्रांतिकारी संघटना सुरू केली आणि सहकारी क्रांतिकारक गेंदालाल दीक्षित यांच्याबरोबर सैन्यात सामील झाले. दीक्षित यांचा राज्यातील अनेक लोकांशी चांगला परिचय होता. त्यातील काही लोक हे गुंड वर्गातील होते. हे गुंड ब्रिटिशांविरुद्ध लढताना उपयोगी ठरतील, अशी त्यांची भावना होती.
१९१८ मध्ये बिस्मिल यांनी ‘मैनपुरी की प्रतिज्ञा’ ही वादग्रस्त आणि सुप्रसिद्ध ठरलेली कविता लिहिली. या कवितेच्या प्रती संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यात वाटण्यात आल्या. लोकांमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीबद्दल जागृती व्हावी, ब्रिटिशांविरुद्ध चीड निर्माण व्हावी, अशी त्यांची अपेक्षा होती. ही अपेक्षा पूर्ण झाली खरी परंतु, बिस्मिल ब्रिटिशांच्या रडारवर आले. त्यात त्यांनी आपल्या संस्थेला निधी मिळावा यासाठी मणिपूरमधील सरकारी कार्यालये लुटली. तीन वेळा झालेल्या या लुटमारीमुळे ब्रिटिशांनी शोधमोहीम हाती घेऊन बिस्मिल यांना शोधून काढले. या दरम्यान झालेल्या गोळीबारापासून वाचण्यासाठी त्यांनी यमुना नदीत उडी मारली आणि तात्पुरती ब्रिटिशांपासून सुटका केली.
‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ची स्थापना
ब्रिटिशांपासून सुटका झाल्यानंतर बिस्मिल पुढील काही वर्षे भूमिगत राहिले. स्वानंदासाठी लेखन करेन परंतु, क्रांतिकार्य करणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. याच काळात त्यांनी ‘मन की लहर’ नावाचा कवितासंग्रह प्रसिद्ध केला, तसेच ‘बोल्शेविकोन की करटूत’ या बंगाली ग्रंथाचे भाषांतरही केले. फेब्रुवारी १९२० मध्ये, मणिपुरी कट खटल्यातील सर्व कैद्यांची सुटका झाल्यावर बिस्मिल शाहजहानपूरला घरी परतले. तेथे त्यांनी सुरुवातीला काँग्रेसच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळीला पाठिंबा मिळवून देण्याचे काम केले. परंतु, १९२२ मध्ये चौरी चौरा येथील घटनेनंतर म. गांधींनी असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर बिस्मिलने स्वतःचा पक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला.
अशा प्रकारे बिस्मिल, अशफाकुल्ला खान, सचिंद्र नाथ बक्षी आणि जोगेश चंद्र चटर्जी संस्थापक सदस्यांसह ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ची स्थापना झाली. नंतरच्या काळात क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांसारखे नेतेही ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’मध्ये सामील झाले.
हेही वाचा : विश्लेषण : ‘अखंड भारता’ची कल्पना आणि इतिहास… नवीन संसद भवनातील ‘ते’ भित्तिचित्र काय सुचवते ?
‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’चा जाहीरनामा मुख्यत्वे बिस्मिल यांनी १ जानेवारी, १९२५ रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केला. त्याचे शीर्षक ‘क्रांतिकारक’ असे होते. या जाहीरनाम्यात असे घोषित केले होते की, ‘राजकारणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक पक्षाचा तात्कालिक उद्देश म्हणजे संघटित आणि सशस्त्र क्रांतीद्वारे युनायटेड स्टेट्स ऑफ इंडियाचे संघराज्य प्रजासत्ताक स्थापन करणे. या क्रांतिकारकांकडे दहशतवादी किंवा अराजकवादी नाहीत. त्यांना दहशतवादासाठी दहशतवाद नको आहे. तरीही काहीवेळेस सूडासाठी किंवा जशास तसे उत्तर देण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून या पद्धतीचा अवलंब करू शकतात. हा पक्ष सार्वभौमिक मताधिकार आणि समाजवादी तत्त्वांवर आधारित असेल. मनुष्याद्वारे माणसाचे शोषण शक्य करणाऱ्या सर्व व्यवस्थांचे उच्चाटन करणे, हा या पक्षाचा उद्देश आहे.’
काकोरी ट्रेन अॅक्शन
ऑगस्ट १९२५ मध्ये काकोरी येथे रेल्वेवर दरोडा घालणे ही ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ची पहिली मोठी कारवाई होती. शाहजहानपूर आणि लखनौ दरम्यानची रेल्वे लुटण्याची योजना क्रांतिकारकांनी आखली. या रेल्वेत महसुलाच्या थैली लखनौला पाठवण्यात येणार होत्या. भारतीयांचा असणारा हा पैसा क्रांतिकार्यासाठी वापरावा, तो ब्रिटिशांच्या हाती जाऊ नये, यासाठी रेल्वे लुटण्याची त्यांची योजना होती.
९ ऑगस्ट, १९२५ रोजी लखनौपासून १५ किमी अंतरावर असलेल्या काकोरी स्टेशनवरून रेल्वे जात असताना आत बसलेले ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’चे सदस्य राजेंद्रनाथ लाहिरी यांनी चेन ओढून ट्रेन थांबवली. त्यानंतर, राम प्रसाद बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान यांच्यासह सुमारे दहा क्रांतिकारकांनी रेल्वेमध्ये प्रवेश केला आणि गार्डला बंदिस्त केले. महसुलाच्या थैली अंदाजे ४,६०० रुपये लुटले आणि लखनौला पळून गेले. या दरोड्याने ब्रिटिश संतप्त झाले. तसेच या दरोड्याच्या वेळी नकळत एका प्रवाशाला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर काकोरी ट्रेन अॅक्शनमध्ये सहभागी असलेल्या जवळजवळ प्रत्येकावर कारवाई झाली.
शब्दरूप उरलेले बिस्मिल…
अठरा महिने चाललेल्या खटल्यानंतर बिस्मिल, अशफाकुल्ला आणि राजेंद्रनाथ लाहिरी यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. १९ डिसेंबर, १९२७ रोजी शिक्षा सुनावण्यात आली. राम प्रसाद बिस्मिल यांचा मृत्यू झाला तेव्हा ते अवघ्या ३० वर्षांचे होते. पण त्यांचा वारसा जिवंत राहिला तो त्यांच्या कवितांमधून. त्यांच्या कविता केवळ भारतीयांना स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्यासाठी प्रेरित करण्यासाठीच नव्हत्या, त्यामध्ये समाज आणि समानता आणि मानवी प्रतिष्ठेच्या वैश्विक तत्त्वांची खोल चिंतादेखील त्यातून दिसून येते. ‘गुलामी मिटा दो’मध्ये बिस्मिल म्हणतात-
जो लोग गरीबों पर करते है सितम नहक,
गर दम है मेरा कयाम, जिन जिन के साजा दूंगा.
सहकारी क्रांतिकारक कवी अशफाकुल्ला खान यांच्याशी असलेल्या घनिष्ठ मैत्रीमुळे आज राम प्रसाद बिस्मिल हे जातीय सलोख्याचे प्रतीक बनले आहेत. फाशीपूर्वी लिहिलेल्या त्यांच्या शेवटच्या पत्रात बिस्मिल यांनी राष्ट्रसेवेसाठी हिंदू-मुस्लिम ऐक्य कायम राहण्याची आवश्यकता आहे, असे नमूद केले होते.
त्यांनी लिहिले पत्र (भाषांतरित)- “जर अशफाकसारखा धर्मनिष्ठ मुस्लिम क्रांतिकारी चळवळीत रामप्रसाद सारख्या आर्य समाजाचा उजवा हात असू शकतो, तर इतर हिंदू आणि मुस्लिम त्यांचे क्षुद्र हित विसरून एकत्र का येऊ शकत नाहीत? आता माझ्या देशबांधवांना माझी एकच विनंती आहे की, जर त्यांना आमच्या मृत्यूचे थोडेही दु:ख असेल, तर त्यांनी कोणत्याही मार्गाने हिंदू-मुस्लिम ऐक्य प्रस्थापित केले पाहिजे; हीच आमची शेवटची इच्छा आहे आणि तेच आमचे स्मारक होऊ शकते.”
अशा तरुण वयात क्रांतिकारी विचार करणाऱ्या राम प्रसाद बिस्मिल यांना १२६ व्या जयंती निमित्त अभिवादन…