गुजरातमधील जामनगरजवळ बुधवारी रात्री भारतीय हवाई दलाचे एक जॅग्वार लढाऊ विमान कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात एका वैमानिकाचा मृत्यू झाला. नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान हा अपघात घडला, ज्यात भारतीय हवाई दलाचे तरुण वैमानिक फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिद्धार्थ यादव यांनी आपल्या शेवटच्या क्षणी अगदी तातडीने योग्य निर्णय घेऊन अनेकांचे प्राण वाचवले.
मात्र, या अपघातात त्यांना वीरगती प्राप्त झाली. अपघात होत असल्याचे कळताच त्यांनी विमान दाट लोकवस्तीच्या भागातून दूर नेले आणि त्यांच्या या निर्णयामुळे एक मोठी दुर्घटना टळली. मुख्य म्हणजे त्यांनी स्वतः बलिदान देण्यापूर्वी त्यांच्या सह-वैमानिकांना विमानातून बाहेर काढले आणि त्यांचेही प्राण वाचवले. कोण होते सिद्धार्थ यादव? जाणून घेऊ.
लष्करी सेवेचा वारसा
हरियाणाच्या रेवाडी येथील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांचे संपूर्ण कुटुंब लष्करी सेवेत राहिले आहे. सिद्धार्थ यांचे पणजोबा ब्रिटीश राजवटीत बंगाल इंजिनिअर्समध्ये कार्यरत होते, त्यांचे आजोबा रघुबीर सिंग हे निमलष्करी दलात कार्यरत होते आणि त्यांचे वडील सुशील कुमार यांनीदेखील भारतीय हवाई दलात सेवा दिली होती. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी एलआयसीची नोकरी स्वीकारली. हवाई दलात सामील होणारे सिद्धार्थ यादव हे देशसेवेस समर्पित असणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील चौथी पिढी होती, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.
२०१६ साली सिद्धार्थ यादव यांनी एनडीए परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यानंतर त्यांनी पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये तीन वर्षांचे सखोल प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर ते फायटर पायलट म्हणून सेवेत दाखल झाले. आपल्या दोन वर्षांच्या सेवेनंतर त्यांना फ्लाइट लेफ्टनंट पदावर बढती मिळाली. त्यांच्या करकिर्दीविषयी बोलताना सिद्धार्थ यादव यांचे वडील म्हणाले, “तो अतिशय हुशार विद्यार्थी होता, आम्हाला त्याचा कायम अभिमान वाटायचा.”
सिद्धार्थ यांचे वडील पुढे म्हणाले, “माझे वडील आणि आजोबा हे दोघेही सैन्यात होते आणि मीदेखील हवाई दलात सेवा दिली, मला माझ्या मुलाचा खूप अभिमान आहे. त्याने एका व्यक्तीचा जीव वाचवून आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. पण, तो माझा एकुलता एक मुलगा असल्याने हे दुःख आमच्यासाठी खूप मोठे आहे.” सिद्धार्थ यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात त्यांचे वडील, आई सुशीलादेवी आणि धाकटी बहीण खुशी आहे.
सिद्धार्थ यांचा अपघातापूर्वी झाला होता साखरपुडा
सिद्धार्थ यादव यांच्या वडिलांनी मध्यमांशी बोलताना हेदेखील सांगितले की, अपघाताच्या केवळ दहा दिवसांपूर्वी २३ मार्च रोजी दिल्लीत त्यांचा साखरपुडा झाला होता. रेवाडीतील भालखी-माजरा गावात राहणारे त्यांचे कुटुंब त्यांच्या विवाहाच्या तयारीत होते. २ नोव्हेंबर ही त्यांच्या लग्नाची तारीख होती. रेवाडीत त्यांच्या कुटुंबाबरोबर काही दिवस वेळ घालवल्यानंतर ते ३१ मार्चपासून पुन्हा कामावर परतले आणि सेवेत रुजू झाले.
सिद्धार्थ यादव यांच्या कुटुंबीयांना रात्री ११ वाजताच्या सुमारास कमांडिंग एअर ऑफिसरकडून त्यांच्या अपघाताची बातमी मिळाली. अधिकाऱ्याने त्यांना सांगितले की, एका वैमानिकाला वाचवण्यात यश आले आहे, परंतु सिद्धार्थला या अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या वडिलांनी म्हटले, “सिद्धार्थने इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपले जीवन अर्पण केले, आम्हाला त्याचा अभिमान आहे.” भारतीय हवाई दलाने एक निवेदन जारी करून, या अपघातबद्दल दुःख व्यक्त केले, “जीवहानीबद्दल मनापासून दु:ख व्यक्त करत आहोत आणि शोकग्रस्त कुटुंबाबरोबर आम्ही ठामपणे उभे आहोत” असे म्हटले आहे. भारतीय हवाई दलाने या निवेदनात अपघाताचे कारण स्पष्ट करण्यासाठी न्यायालयीन चौकशीचेदेखील आदेश दिले आहेत.
सिद्धार्थ यांच्या ‘त्या’ निर्णयाने वाचवले अनेकांचे प्राण
भारतीय हवाई दलाच्या निवेदनानुसार, बुधवारी रात्री जामनगर एअरफिल्डवरून दोन आसनी जॅग्वार लढाऊ विमानांनी रोज होणाऱ्या रात्रीच्या प्रशिक्षण मोहिमेसाठी उड्डाण घेतले. उड्डाण घेताच वैमानिकांना विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे जाणवले. विमान स्थिर करण्यासाठी आणि सुरक्षित लँडिंग करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र तरीही विमान अपघात होणे निश्चित आहे, असे त्यांच्या लक्षात आले.
अखेरच्या क्षणाला सिद्धार्थ यांनी त्यांचे सहकारी वैमानिक मनोज कुमार सिंग यांना आपला जीव वाचवण्यासाठी विमानातून बाहेर काढले. पुढे सिद्धार्थ यांनी विमान दाट लोकवस्तीच्या क्षेत्रापासून दूर नेले. अखेरीस त्यांनी हे विमान जामनगर शहरापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुवर्दा गावाजवळील एका मोकळ्या मैदानात नेले. दुर्दैवाने या अपघातात सिद्धार्थ यांनी आपला जीव गमावला. परंतु, सिद्धार्थ यांच्या शौर्यपूर्ण निर्णयाने अनेकांना वाचवले.
विमानातील त्यांचे सहवैमानिक मनोज कुमार सिंग यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे गुरु गोविंद सिंह सरकारी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दीपक तिवारी यांनी सांगितले. फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांच्या पार्थिवावर शुक्रवारी हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील त्यांचे मूळ गाव माजरा भालखी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद सिद्धार्थ यादव यांना भारतीय वायुसेनेच्या जवानांनी सलामी दिली.