लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. मात्र, हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिस गाजवीत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३५० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. चित्रपटाची चर्चा सुरू असतानाच, महाराष्ट्रातील ऐतिहासिक शिर्के घराण्याने छावा चित्रपटात दाखविलेल्या काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. चित्रपटात मराठा सेनापती गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या फितुरीमुळेच छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडले, असे दाखविण्यात आले आहे. त्यावरून शिर्के यांच्या वंशजांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नेमका हा वाद काय? कोण होते गणोजी आणि कान्होजी शिर्के? इतिहास काय सांगतो? जाणून घेऊ…

‘छावा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

गणोजी शिर्के आणि त्यांचे भाऊ कान्होजी शिर्के यांची बदनामी केल्याचा आरोप करीत ‘छावा’चे दिग्दर्शक यांच्यावर टीका करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा विश्वासघात केल्याचे आणि त्यामुळेच मुघल सेनापती मुकर्रब खानने त्यांना पकडल्याचे चित्रपटात दाखविल्यामुळे शिर्के कुटुंब नाराज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे वडील पिलाजी शिर्के यांना दिलेले कथित वचन पूर्ण करण्यासाठी शिर्के बंधूंनी छत्रपती संभाजी महाराजांकडे जमिनीची मागणी केल्याचे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या मागणीकडे लक्ष न दिल्याने, दोन्ही बंधू मुघलांच्या बाजूने झुकतात आणि त्यांचे स्थान उघड करतात, असेही चित्रपटात दाखविण्यात आले आहे. १६८९ मध्ये संगमेश्वर येथे झालेल्या लढाईत मुघल सेनापती मुकर्रब खान याने छत्रपती संभाजी महाराजांना पकडले तेव्हा शिर्के बंधू तिथे उपस्थित असल्याचे चित्रपटात दाखविले आहे.

“आमच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. सगळे देशवासीय आम्हाला देशद्रोही समजू लागले. चित्रपट निर्मात्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले, तर आम्ही रस्त्यावर उतरू. महाराष्ट्रात शिर्के कुटुंबीयांची संख्या लाखोंच्या घरात आहे,” असे या कुटुंबातील सदस्य दीपक राजे शिर्के यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. “छावा हा एक चांगला चित्रपट होता आणि छत्रपती संभाजी महाराजांची कथा प्रेक्षकांसमोर यायलाच हवी होती. मात्र, त्यातील काही वादग्रस्त भाग काढून टाकले पाहिजेत,” असे ते पुढे म्हणाले. शिर्के कुटुंबातील वंशज ‘छावा’च्या निर्मात्यांविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्याच्या विचारात आहेत.

शिर्के कुटुंबाने यापूर्वीच दिग्दर्शक, छावा या कादंबरीचे प्रकाशक व कादंबरीच्या हक्कधारकांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मराठी लेखक शिवाजी सावंत यांच्या १९७९ मध्ये आलेल्या छावा या कादंबरीवर आधारित तयार केल्या गेलेल्या ‘छावा’ चित्रपटात विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. “पूर्वी ऐतिहासिक साहित्य हे विशिष्ट वाचकवर्गापुरते मर्यादित होते; पण सोशल मीडियाच्या प्रसारामुळे चुकीची माहिती वेगाने पसरते. लोक विचार केल्याशिवाय या कथांचा वापर करतात; ज्यामुळे आमच्याविषयी चुकीचा संशय निर्माण होतो,” असे दीपक राजे शिर्के यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ (एचटी)ला सांगितले. ‘छावा’ चित्रपटाने इतिहासाचे विकृतीकरण करून, आपल्या पूर्वजांना बदनाम केल्याचा आरोप शिर्के कुटुंबीयांनी केला आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, शिर्के कुटुंबातील अनेक सदस्यांनी सोमवारी त्यांच्या वडिलोपार्जित शिरकोली या गावाला भेट दिली आणि चित्रपटाच्या विरोधात त्यांच्या निषेधाची योजना आखण्यासाठी कुटुंबाच्या कुलदेवतेच्या मंदिरात ते एकत्र आले. शिर्के कुटुंबातील १३ व्या पिढीतील वंशज दीपक राजे शिर्के यांनी वृत्तपत्राला सांगितले की, १४ फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कुटुंबाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर कार्यालयांना भेट दिली होती. “आम्ही चित्रपटाचे दिग्दर्शक आणि त्याच्याशी संबंधित इतरांनादेखील कळवले की, ते जे दाखवत आहेत, ते चुकीचे आहे आणि त्यांनी ते करू नये. त्यांनी या संदर्भात कोणतेही पाऊल उचलले नाही आणि आमच्याकडे दुर्लक्ष करून चित्रपट प्रदर्शित केला,” असे ते म्हणाले.

कोण होते गणोजी आणि कान्होजी शिर्के?

शिर्के कूळ हे अनेक मराठा राजघराण्यांपैकी एक होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी त्यांचा जवळचा संबंध होता. पिलाजी शिर्के हे वंशाचे नेते होते आणि गणोजी व कान्होजी हे त्यांचे पुत्र होते. पिलाजी यांची मुलगी येसूबाई यांचा विवाह छत्रपती संभाजी महाराजांशी; तर गणोजी यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या राजकुंवर यांच्याशी झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी पिलाजींना जमीन देण्याबाबतचे वचन दिले होते, असा दावा करून शिर्के बंधूंनी छत्रपती संभाजी महाराजांकडे जमीन मागितल्याचे चित्रण चित्रपटात दाखविण्यात आले आहे. परंतु, छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या मागणीकडे लक्ष न दिल्याने ते दोघेही मुघलांच्या बाजूने गेले. त्यांनी मुघलांना छत्रपती संभाजी महाराजांचे स्थान सांगितले आणि त्यांना गुप्त मार्ग दाखवला. संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले जातात तेव्हा तेथे गणोजी आणि कान्होजी शिर्के भाऊही उपस्थित असल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

शिर्के यांचे वंशज नक्की काय म्हणाले?

गणोजी आणि कान्होजींचे देशद्रोही म्हणून केलेले हे चित्रण ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे असल्याचा आरोप शिर्के कुटुंबीयांनी केला आहे. वंशज दीपकराजे शिर्के म्हणाले, “खरा इतिहास समोर यावा, अशी आमची इच्छा आहे. चित्रपटात जे दाखवले आहे, त्याचा इतिहासात कोणताही पुरावा नाही. हे काल्पनिक आहे. दिवंगत शिवाजी सावंत यांची छावा ही कादंबरी १९७९ मध्ये प्रकाशित झाली आणि कोणताही आधार न घेता, गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला गेला, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

इतिहास काय सांगतो?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे सहायक प्राध्यापक राहुल मगर म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरमध्ये होते याचे कारण सर्वज्ञात आहे. त्यांनी स्पष्ट केले, “जेधे शकावली (जेधे देशमुखांच्या घटनांचा इतिहास)मध्ये हे स्पष्टपणे नमूद केले आहे की, कवी कलश (छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र) व शिर्के यांच्यात वाद झाला आणि कवी कलश यांना पळून जाण्यास भाग पाडले गेले. ही बातमी कळताच छत्रपती संभाजी महाराजांनी संगमेश्वरला यायचे ठरवले.

मुघल बाजूच्या ऐतिहासिक घटनांचे स्पष्टीकरण देताना मगर यांनी सांगितले, “औरंगजेबाने मुकर्रब खानला पत्र पाठवून, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्थानाची माहिती दिली. पण, मुकर्रब खानला संभाजी महाराजांना पकडण्याच्या मार्गावर असलेल्या स्वतःच्या हेरांकडून हे आधीच कळले होते, असे दिसते. हे हेर शिर्के बंधू असल्याचे मानले जाते. संगमेश्वरला गेल्यावर मुघलांना मराठा सैन्याला टाळण्यात यश आले. येथेही शिर्के बंधूंनी मार्गदर्शन केल्याचे मानले जाते. मुघल कागदपत्रांमध्ये शिर्के यांना मनसब (मनसबदारी) दिल्याचे उल्लेख आहेत. त्यामुळे शिर्के बंधूंनी मुकर्रब खानला मदत केली असावी, असे मानले जाते.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या मुघल दरबाराच्या बातमीपत्रात या मुघल दस्तऐवजांची नोंद आहे. त्यानुसार भाग १ मध्ये कान्होजी शिर्के हे मुघल राजपुत्र बिदर बख्त खानच्या सैन्याचा एक भाग होते, असे नोव्हेंबर १, १६९९ मधील नोंद आहे. तर, १० मार्च १७०१ च्या दुसऱ्या नोंदीनुसार कान्होजी शिर्के औरंगजेबाला भेटले आणि गणोजी शिर्के यांची मनसबदारी वाढली, असे नमूद करण्यात आले आहे. जरी या नोंदी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या असल्या तरी या नोंदी शिर्के बंधूचे मुघलांशी असलेले संबंध दर्शवितात.

शिवपुत्र संभाजी या चरित्रात कमल गोखले लिहितात की, गणोजी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी १६८२-८३ च्या सुरुवातीला मुघलांशी हातमिळवणी केली असावी. परंतु, राहुल मगर असेही सांगतात की, निकोलाओ मानुची आणि ईश्वर दास नागर यांसारखे मुघल बाजूचे इतिहासकार म्हणतात की, कवी कलश हा मुघल गुप्तहेर होता. छत्रपती संभाजी महाराज यांचा विश्वासघात कोणी केला यासंदर्भात अभ्यासकांमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळतात.