सीरियामध्ये झालेल्या सशस्त्र बंडानंतर राष्ट्राध्यक्ष बशर असद यांना देश सोडून पळावे लागले. यामुळे असद घराण्याची ५० वर्षांची एकाधिकारशाही एका रात्रीत संपुष्टात आली. एकीकडे या सत्ताबदलामागील कारणांचा शोध घेतला जात असताना त्याच्या परिणामांची चर्चा होणेही गरजेचे आहे. असद यांना पाठिंबा देणाऱ्या रशिया आणि इराणला हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे. त्याच वेळी इस्रायलला मात्र आपली एक सीमा सुरक्षित करण्याची या निमित्ताने संधी मिळाली आहे. तर तुर्कीयेही सीरियावर आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. सीरियातील उठावामुळे कुणाचा फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार, याचा हा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इराणच्या ‘प्रतिकार अक्षा’ला मोठा हादरा

इराणने इस्रायलच्या भोवती असलेल्या देशांमध्ये अत्यंत नियोजनबद्ध रितीने अतिरेकी संघटनांचे जाळे विणले. काही ठिकाणी स्थानिक सरकारांच्या पाठिंब्याने, काही ठिकाणी त्यांच्या निष्क्रियतेने तर काही देशांमध्ये स्थानिक यंत्रणांना विरोध करून इराणने या संघटना पोसल्या. मात्र गेल्या वर्षभरात इराणच्या या ‘प्रतिकार अक्षा’चे (ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स) एकएक दुवे निखळून पडत आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी गाझा पट्टीतील ‘हमास’ या इराणपुरस्कृत संघटनेने इस्रायलमध्ये मोठा हल्ला केला. याला प्रत्युत्तर देत इस्रायलने गाझामध्ये सैन्य घुसविले. या युद्धात ‘हमास’चे अनेक बडे नेते मारले गेले आणि संघटना खिळखिळी झाली. इस्रायलच्या उत्तरेकडील लेबनॉनची ‘हेजबोला’ ही दहशतवादी संघटना म्हणजे इराणचे या भागातील सर्वांत मोठे ‘अस्त्र’… मात्र इस्रायलने पद्धतशीरपणे हेजबोलाचा काटा काढला. आधी ‘मोसाद’ने केलेला ‘पेजर बॉम्ब’ हल्ला आणि त्यानंतर इस्रायलची लष्करी कारवाई यामुळे ‘हेजबोला’चेही कंबरडे मोडले. इस्रायलने प्रथमच थेट इराणच्या भूमीवर क्षेपणास्त्रे डागली आणि आता इराणचे सीरियातील दीर्घकालीन सहकारी बशर अल असद यांची सत्ता संपुष्टात आली. अयातुल्ला अली खामेनी यांचे प्रमुख सल्लागार अली अकबर वेलायती यांनी असद यांचा उल्लेख ‘प्रतिकाराच्या साखळीतील सोन्याची कडी’ असा केला होता. ही कडी निखळल्यामुळे आता संपूर्ण साखळीच मोडून पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा वाद काय आहे? त्यावर मुस्लिमांचा दावा कसा? किल्ला सरकारच्या ताब्यात देताना न्यायालयाने काय म्हटले?

व्लादिमिर पुतिन यांच्या मर्यादा उघड

बशर अल असद यांचे वडील हाफेज अल असद यांच्या तीन दशकांच्या राजवटीत सोव्हिएट रशिया कायमच त्यांच्या पाठीशी राहिला होता. २०१५ साली झालेल्या बंडानंतर रशियाने इराणच्या साथीने लष्करी हस्तक्षेप करून आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये पाठिंबा देऊन असद यांच्या सरकारला जीवदान दिले. सात वर्षांपूर्वी अंतर्गत यादवी मोडून काढण्यासाठी असद सरकारला सक्रिय मदत केल्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सीरियातील हवाई तळावर आपल्या सैनिकांसह उभे राहून ‘दहशतवाद्यां’वर विजयाची घोषणा केली होती. मात्र शनिवार-रविवारच्या घटनांनी त्यांची ही विजयपताका धुळीस मिळविली. बंडखोरांनी इतक्या जलदगतीने राजधानी दमास्कस ताब्यात घेतली, की असद यांना मॉस्कोला पळून जावे लागले. असद यांचा पाडाव रोखण्यात क्रेमलिनला आलेल्या या अपयशामुळे रशियन सामर्थ्याच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. पुतिन यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला हा सर्वांत मोठा धक्का आहे.

‘सावध’ इस्रायलच्या संधिसाधू हालचाली

सीरियातील नाट्यमय सत्तांतरामुळे इस्रायल अधिक सावध झाला आहे. गेल्या वर्षभरापासून अनेक आघाड्यांवर लढणाऱ्या इस्रायलला सीरियातील अशांतता आपल्या सीमा ओलांडण्याची भीती आहे. मात्र त्याच वेळी असद राजवटीची अखेर ही इस्रायलसाठी एक नामी संधीही आहे. लेबनॉनमधील हेजबोला अतिरेक्यांना इराणमधून शस्त्रे पुरविण्याचा सीरियातून जाणारा मार्ग बंद करता येणे आता शक्य आहे. त्यामुळेच एकीकडे दमास्कसच्या रस्त्यांवर बंडखोर जल्लोष करीत असतानाच सीरियाच्या सीमेवरील गोलान टेकड्यांचा ‘बफर झोन’ ताब्यात घेण्यास इस्रायलने सुरुवात केली आहे. अरब राष्ट्रांनी बिन्यामिन नेतान्याहू यांच्यावर सीरियातील अराजकतेचा फायदा घेत भूभाग बळकावल्याचा आरोप केला असला तरी सध्या इस्रायलला रोखणारे कुणीही त्या परिसरात नाही. उलट असद यांच्या पतनाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न नेतान्याहू यांनी केला. सीरियातील घडामोडींवर भाष्य करताना ‘आम्ही हमास, हेजबोला आणि इराणला दिलेल्या मोठ्या हादऱ्यांचा परिणाम आहे,’ असे नेतान्याहू यांनी सांगून टाकले.

हेही वाचा : एमआयटीने निबंधावरून भारतीय विद्यार्थ्याला केले निलंबित; नेमकं प्रकरण काय? कोण आहे प्रल्हाद अय्यंगार?

सीरियाच्या भूमीत अमेरिका-तुर्कीये संघर्ष

एकीकडे इस्रायल गोलान टेकड्यांचा अधिकाधिक भाग ताब्यात घेत असताना तुर्कीये आणि अमेरिका या दोन्ही देशांनी सीरियामध्ये हल्ले चढविले. विशेष म्हणजे असद राजवटीला विरोध असलेले हे दोन्ही देश आता मात्र एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याचे चित्र आहे. सीरियातील अराजकाचा फायदा उचलत तुर्कीयेने पूर्वेकडील अलेप्पो भागात असलेल्या कुर्द बंडखोरांच्या तळांवर हल्ले चढविले. सीरियन डेमोक्रेटिक फोर्सेस (एसडीएफ) नावाच्या कुर्दी सशस्त्र गटाला अमेरिकेचे पाठबळ आहे. ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’चा (आयसिस) सामना करण्यासाठी अमेरिकेला एसडीएफची गरज आहे, मात्र हा गट तुर्कीयेत दहशतवादी हल्ले करीत असल्यामुळे अध्यक्ष सेरेप तय्यीप एर्दोगन यांच्या गळ्यात अडकलेला काटा आहे. असद यांच्या अत्याचारांमुळे तुर्कीयेत आश्रय घेतलेले लाखो नागरिक सीरियात परतण्यासाठी सीमेवर गर्दी करू लागले आहेत. अर्थातच, एर्दोगन या नागरिकांची आनंदाने पाठवणी करण्यास उत्सुक आहेत. दुसरीकडे सीरियातील परिस्थितीचा आयसिसने गैरफायदा घेऊ नये, यासाठी अमेरिकेनेही त्यांच्या तळांवरील हल्ले वाढविले आहेत.

जाता-जाता…

केवळ तुर्कीयेच नव्हे, तर युरोपातील अनेक देशांमध्ये सीरियाचे नागरिक आश्रयास असून सर्वाधिक विस्थापित हे जर्मनीमध्ये आहेत. मात्र सीरियातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे जर्मनीसह अन्य युरोपीय देशांनी आपल्या स्थलांतरविषयक धोरणांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. आता सीरियामध्ये कशा प्रकारची राजवट येणार, इराण-रशिया-इस्रायल-तुर्कीये आणि अर्थातच अमेरिका यांच्या पुढल्या चाली कशा राहणार, यावर पश्चिम आशियाचे भूराजकीय भविष्य अवलंबून आहे.

amol.paranjpe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who will be benefited from syria civil war russia iran turkey israel print exp css