इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटोत्सवाच्या सामन्यांइतकीच खेळाडू लिलावाची चर्चा रंगते. कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लागणार, आपला लाडका संघ कोणत्या खेळाडूला खरेदी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष असते. ‘आयपीएल’च्या आगामी हंगामासाठी येत्या मंगळवारी (१९ डिसेंबर) खेळाडू लिलाव प्रक्रिया दुबई येथे पार पडणार आहे. यात भारतासह विविध देशांतील आघाडीच्या क्रिकेटपटूंवर मोठी बोली लागणे अपेक्षित आहे. मात्र, ही बोली लावण्यासाठी कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे आणि संघात किती जागा रिक्त आहेत याचा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खेळाडू लिलावाचे महत्त्व काय?

‘आयपीएल’मधील दहाही संघांनी आगामी म्हणजेच २०२४च्या हंगामासाठी संघात कायम ठेवलेल्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावे गेल्या महिन्यात जाहीर केली होती. यात काही आश्चर्यकारक निर्णयही पाहायला मिळाले होते. तसेच काही संघांनी खेळाडूंची अदलाबदल (ट्रेड) करून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजूनही बहुतांश संघ समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यासाठीच खेळाडू लिलाव महत्त्वाचा ठरतो. यात उपलब्ध असलेल्या आणि आपल्याला गरज असलेल्या खेळाडूंवर बोली लावून त्यांना संघात दाखल करून घेण्याचा फ्रेंचायझींचा प्रयत्न असतो.

हेही वाचा : विश्लेषण : नाताळ सणाचा आगमन काळ म्हणजे काय? जांभळ्या, गुलाबी, पांढऱ्या मेणबत्त्या का प्रज्वलित करतात?

लिलाव प्रक्रिया कशी राबवली जाते?

प्रत्यक्ष लिलावाच्या काही महिन्यांआधी खेळाडूंना आपली नावे नोंदवावी लागतात आणि आपली मूळ किंमत (बेस प्राइज) निश्चित करावी लागते. यातून छाननी करून ‘बीसीसीआय’कडून अंतिम यादी जाहीर केली जाते. लिलावादरम्यान प्रथम फलंदाज, मग अष्टपैलू, यष्टिरक्षक, वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू अशा प्रकारे बोली लागते. यातही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंना प्राधान्य असते. त्यानंतर भारताच्या युवा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूंवर बोली लावली जाते. खेळाडूंची मूळ किंमत ही २० लाख ते २ कोटी रुपये या दरम्यान असते. मूळ किमतीपासून पुढे खेळाडूवर बोली लागण्यास सुरुवात होते. अखेरीस जो संघ त्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लावतो, त्या संघाकडून तो खेळाडू खेळतो.

यंदा लिलावात किती खेळाडू उपलब्ध आहेत?

लिलावासाठी खेळाडूंची यादी ‘बीसीसीआय’ने काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. यात एकूण ३३३ खेळाडूंचा समावेश असून यापैकी २१४ खेळाडू हे भारतीय, तर ११९ परदेशी खेळाडू आहेत. दोन खेळाडू कसोटीचा दर्जा प्राप्त नसलेल्या (असोसिएट) देशांचे आहेत. या खेळाडूंपैकी ११६ हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले, तर २१५ हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले आहेत.

हेही वाचा : विश्लेषण : फसवणुकीविरोधात तक्रार करूनही विख्यात बुद्धिबळपटू कार्लसनलाच दंड का झाला? काय होते प्रकरण?

कोणत्या संघाकडे किती रक्कम आणि किती जागा शिल्लक?

‘आयपीएल’मधील दहाही फ्रेंचायझींना यंदा संघबांधणीसाठी एकूण १०० कोटी रुपये वापरता येणार आहेत. मात्र, यापूर्वीच्या लिलावात ज्या खेळाडूंना ज्या किमतीत खरेदी केले होते, ती रक्कम संघांच्या खात्यातून (पर्स) कमी केली जाणार आहेत. उर्वरित रक्कम त्यांना यंदाच्या लिलावात वापरता येईल. संघांकडे शिल्लक असलेली रक्कम आणि रिक्त जागा खालीलप्रमाणे –

  • गुजरात टायटन्स : ३८.१५ कोटी रुपये; आठ जागा रिक्त (दोन परदेशी खेळाडूंसाठी)
  • सनरायजर्स हैदराबाद : ३४ कोटी रुपये; सहा जागा रिक्त (तीन परदेशी खेळाडूंसाठी)
  • कोलकाता नाइट रायडर्स : ३२.७ कोटी रुपये; १२ जागा रिक्त (चार परदेशी खेळाडूंसाठी)
  • चेन्नई सुपर किंग्ज : ३१.४ कोटी रुपये; सहा जागा रिक्त (तीन परदेशी खेळाडूंसाठी)
  • पंजाब किंग्ज : २९.१ कोटी रुपये; आठ जागा रिक्त (दोन परदेशी खेळाडूंसाठी)
  • दिल्ली कॅपिटल्स : २८.९५ कोटी रुपये; नऊ जागा रिक्त (चार परदेशी खेळाडूंसाठी)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु : २३.२५ कोटी रुपये; सहा जागा रिक्त (तीन परदेशी खेळाडूंसाठी)
  • मुंबई इंडियन्स : १७.७५ कोटी रुपये; आठ जागा रिक्त (चार परदेशी खेळाडूंसाठी)
  • राजस्थान रॉयल्स : १४.५ कोटी रुपये; आठ जागा रिक्त (तीन परदेशी खेळाडूंसाठी)
  • लखनऊ सुपर जायंट्स : १३.१५ कोटी रुपये; सहा जागा रिक्त (दोन परदेशी खेळाडूंसाठी)

हेही वाचा : विश्लेषण: आदिवासी जिल्ह्यंतील बालमृत्यूंचे प्रमाण घटत का नाही?

कोणत्या खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता?

यंदाच्या खेळाडू लिलावात सर्वाधिक बोलीसाठी ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रवींद्र हे तीन प्रमुख दावेदार आहेत. स्टार्क २०१५ सालापासून ‘आयपीएल’मध्ये खेळलेला नाही. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची विश्वातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. सुरुवातीच्या षटकांत गडी बाद करण्यासह अखेरच्या षटकांत यॉर्करचा वापर करून फलंदाजांना अडचणीत टाकण्यात त्याचा हातखंडा आहे. तसेच ऑस्ट्रेलियन संघातील त्याचा सहकारी कमिन्सवरही चांगली बोली लागू शकेल. २०२०च्या लिलावात कमिन्स सर्वांत महागडा खेळाडू ठरला होता. कोलकाता संघाने त्याच्यावर तब्बल १५.५० कोटी रुपयांची बोली लावली होती. तसेच न्यूझीलंडचा डावखुरा अष्टपैलू रचिनकडेही सर्वांचे लक्ष असेल. त्याने नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली होती. तसेच त्याचे भारताशीही नाते आहे. आघाडीच्या फळीत फलंदाजी करतानाच डावखुऱ्या फिरकीने गडी बाद करण्याची त्याच्यात क्षमता आहे. त्याचप्रमाणे वेगवान गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड, दक्षिण आफ्रिकेचा जेराल्ड कोएट्झी, भारताचे हर्षल पटेल आणि शिवम मावी, फलंदाजांमध्ये इंग्लंडचा हॅरी ब्रूक आणि ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड, अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताचा शार्दूल ठाकूर, न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल, अफगाणिस्तानचा अझमतुल्ला ओमरझाई, फिरकीपटूंमध्ये श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा, दक्षिण आफ्रिकेचे केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांना चांगली किंमत मिळणे अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who will be the most expensive player in the ipl auction how much money left with the teams print exp css