भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधील भवितव्याबाबत सध्या बरीच चर्चा केली जात आहे. बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी सुरू असलेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका, त्यापूर्वी मायदेशात बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील निराशाजनक कामगिरीमुळे रोहितचे कसोटी संघातील धोक्यात आल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी (३ जानेवारीपासून) येथे होणारा अखेरचा कसोटी सामना रोहितसाठी निर्णायक ठरू शकेल. या सामन्यात निराशा केली आणि भारताने मालिका गमावल्यास, रोहित कसोटी संघातील स्थान कायमचे गमावू शकेल. तसे झाल्यास कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी दावेदार कोण असू शकतील आणि मुळात रोहितची कसोटी कारकीर्द धोक्यात का आली, याचा आढावा.
रोहितच्या भवितव्याबाबत इतकी चर्चा का?
साधारण वर्षभरापूर्वीपर्यंत रोहितकडे क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांत मिळून विश्वातील सर्वोत्तम सलामीवीर म्हणून पाहिले जात होते. मात्र, २०२४ हे वर्ष फलंदाज म्हणून रोहितसाठी निराशाजनक ठरले. अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यात (६९ चेंडूंत नाबाद १२१ धावा) शतक, ट्वेन्टी-२० विश्वचषकात ‘सुपर एट’ फेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची (४१ चेंडूंत ९२) शानदार खेळी आणि वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत (१३१ आणि १०३) दोन शतके वगळता, रोहितला फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्यातच भारताने वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहितने क्रिकेटच्या या प्रारूपाला अलविदा केले. त्यामुळे ३७ वर्षीय रोहितमध्ये आणखी किती क्रिकेट शिल्लक आहे, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. त्यानंतर सलग तीन कसोटी मालिकांमध्ये रोहित सपशेल अपयशी ठरल्याने त्याच्या भवितव्याबाबतची चर्चा अधिकच वाढली.
हेही वाचा >>> ‘Ghost Particle’ शोधण्यासाठी शास्त्रज्ञ आता समुद्राखाली बसवणार दुर्बिणी; कसं चालणार त्यांचं काम?
अलीकडच्या काळातील कामगिरी कशी?
सप्टेंबर २०२४ पासून बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळून खेळलेल्या आठ कसोटींच्या १५ डावांत रोहितला केवळ एकदा अर्धशतकी मजल मारता आली. या १५ पैकी दोनच डावांत तो २० धावांचा टप्पा ओलांडू शकला. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने अवघ्या ६.२० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. विशेषत: वेगवान गोलंदाज उजव्या यष्टीला लक्ष्य करून त्याला अडचणीत टाकत आहेत. त्यामुळेच रोहितबाबतची चिंता अधिकच वाढली आहे.
फलंदाजीची शैली, तंत्रात त्रुटी…
गेल्या काही वर्षांपासून रोहित सलामीला खेळत होता. २०२४ वर्षापूर्वी त्याने कामगिरीत सातत्यही राखले होते. मात्र, या वर्षभरात त्याच्या फलंदाजीचा स्तर खालावला. ‘रोहितचे पदलालित्य पूर्वीसारखे राहिलेले नाही. त्यामुळे आघाडीच्या फळीत खेळताना त्याला चेंडू मारताना उशीर होत आहे,’ असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी रोहितला अपत्यप्राप्ती झाली आणि त्याने काही काळ मायदेशातच थांबणे पसंत केले. त्यामुळे त्याला पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलने सलामीला खेळताना झुंजार अर्धशतक साकारले आणि भारताने सामनाही जिंकला. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात पुनरागमन झाल्यानंतर रोहितला मधल्या फळीत खेळावे लागले. मात्र, त्याला सूर गवसला नाही. तीन डावांत तो अनुक्रमे ३, ६, १० धावा करून बाद झाला. त्यामुळे मेलबर्न येथे झालेल्या चौथ्या कसोटीसाठी त्याने सलामीला परतण्याचा निर्णय घेतला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून आक्रमक शैली आत्मसात केलेल्या रोहितला अचानक लाल चेंडूविरुद्ध सावध खेळ करणे शक्य झाले नाही. त्याने प्रयत्न केला, पण चेंडू मारण्यात कधी तो पूर्णपणे चुकला, तर कधी चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लीपच्या दिशेने गेला. चेंडूची दिशा आणि टप्पा ओळखताना रोहितला अडचण येत असल्याने फटके मारण्यापूर्वी त्याची द्विधा मन:स्थिती असते असे काही माजी खेळाडूंना वाटते. मेलबर्न कसोटीत हे प्रकर्षाने जाणवले. या सामन्यात रोहितला ३ आणि ९ धावाच करता आल्या.
हेही वाचा >>> आता नायलॉन मांजापासून होणार दुचाकीस्वारांचं रक्षण? काय आहे ‘काइट स्ट्रिंग गार्ड’?
कर्णधार म्हणूनही निराशा…
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपला दशकभरापासूनचा ‘आयसीसी’ जेतेपदाचा दुष्काळ संपवला. जून २०२४ मध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताने बाजी मारली. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये त्याची गणना केली जाऊ लागली. मात्र, याच वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये नकोसा विक्रम त्याच्या नावे झाला. न्यूझीलंडने भारतात येऊन तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमानांना ३-० अशी धूळ चारली. त्यामुळे मायदेशातील कसोटी मालिकेत ‘व्हाइटवॉश’ पत्करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली भारताने विजय मिळवला. मात्र, रोहितचे पुनरागमन झाल्यावर त्याने कर्णधारपदाची सूत्रे सांभाळली आणि भारतीय संघाला तीनपैकी दोन सामन्यांत हार पत्करावी लागली. फलंदाज म्हणून येत असलेल्या अपयशाचा रोहितच्या नेतृत्वावरही परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. धाडसी निर्णय घेण्यात तो अपयशी ठरत आहे. तसेच पूर्वी प्रत्येक सामन्यापूर्वी रोहित खेळाडू, संघ व्यवस्थापनाशी बराच वेळ चर्चा करायचा; पण आता त्याला स्वत:च्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागत असल्याने तो इतरांना फारसा वेळ देऊ शकत नसल्याचे समजते. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने भारताने नेतृत्वबदलाचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे जाणवू लागले आहे.
कर्णधारपदासाठी दावेदार कोण?
नेतृत्वबदलाचा निर्णय घेण्यात आला, तर कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी जसप्रीत बुमराला प्राधान्य दिले जाऊ शकते. अत्यंत हुशार आणि विचारी खेळाडू अशी बुमराची ख्याती आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने पर्थ येथे ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. तसेच या जबाबदारीचा त्याच्या गोलंदाजीवर जराही परिणाम झाला नाही. उलट त्याची कामगिरी अधिकच उंचावली. त्याने आठ गडी बाद करताना सामनावीराचा पुरस्कार पटकावला. मात्र, वेगवान गोलंदाज असल्याने बुमराच्या कार्यभार व्यवस्थापनाचाही विचार करावा लागणार आहे. त्याला अधूनमधून विश्रांती द्यायची झाल्यास तितक्याच तोडीचा उपकर्णधार असणेही गरजेचे आहे. या जबाबदारीसाठी केएल राहुल, शुभमन गिल किंवा ऋषभ पंत यांचा विचार केला जाऊ शकेल. राहुल आणि गिलला आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधारपद भूषविण्याचा अनुभव आहे. पंतला अद्याप ती संधी मिळालेली नसली, तरी गेल्या काही वर्षांपासून ‘आयपीएल’मध्ये तो नेतृत्वाची धुरा सांभाळत आहे. त्यामुळे बुमरासह ते तिघेही कर्णधारपदाच्या शर्यतीत असू शकतील.