भक्ती बिसुरे
सुमारे दोन ते अडीच वर्षे साध्या डोळय़ांना न दिसणाऱ्या करोना नामक विषाणूने जगभर दहशत माजवली. मात्र आता किमान त्याचा संसर्ग हा महासाथीचे रूप घेणार नाही, एका विशिष्ट मर्यादेपलीकडे संसर्ग वाढला तर उपचार, औषधे, प्रतिबंधात्मक लस अशा गोष्टी तरी हाताशी आहेत. तशातच जागतिक आरोग्य संघटनेने मात्र करोना विषाणूचा माग काढण्याच्या कार्यक्रमाचा दुसरा टप्पा पुढे न नेण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका?
करोना विषाणूच्या साथरोग काळात जागतिक आरोग्य संघटना तिच्या संदिग्ध भूमिकांमुळे सातत्याने चर्चेत राहिली. महासाथीने पुरेसे अक्राळविक्राळ स्वरूप घेईपर्यंत करोना विषाणू चीनच्या वुहान शहरातील प्रयोगशाळेतून आला असण्याची शक्यता संघटनेने वेळोवेळी ठामपणे फेटाळून लावली. मात्र, जून २०२२ मध्ये घूमजाव करत करोना विषाणूची उत्पत्ती ही खरोखरच चिनी प्रयोगशाळांमधून झाली का, याची ठोस चौकशी करण्याची गरज व्यक्त करून त्या दिशेने काम सुरू केले. या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला खरा, मात्र दुसरा टप्पा सुरू करण्याच्या ऐन मोक्याच्या क्षणी आता जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा घूमजाव केले आहे. करोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत दुसऱ्या टप्प्यातील संशोधन पुढे न नेण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच जाहीर केला आहे.
निर्णयामागची भूमिका काय?
‘नेचर’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने दिलेल्या वृत्तानुसार जागतिक आरोग्य संघटनेने अत्यंत हताश होऊन करोना विषाणू उत्पत्तीबाबतचे संशोधन पुढे न नेण्याचा निर्णय घेतला आहे. हे संशोधन पुढे नेण्यातील अनेक संभाव्य अडथळय़ांपुढे हताश होऊन हा निर्णय घेतल्याचे संशोधकांकडून ‘नेचर’ला सांगण्यात आले आहे. विषाणूच्या उत्पत्तीबाबत ठोस निष्कर्षांपर्यंत येण्यासाठी चीनचे सहकार्य अत्यावश्यक आहे. साथरोगाच्या प्राथमिक टप्प्यात चिनी नागरिकांमध्ये या विषाणूचा शिरकाव कसा झाला, याची शास्त्रशुद्ध माहिती हाती लागेपर्यंत पुढील सगळेच संशोधन दिशाहीन आहे. मात्र, चीन सरकारचे धोरण पाहता तेथील खरी माहिती समोर येणे हे केवळ अशक्य आहे. सरकारी यंत्रणांपुढे चिनी संशोधकांचे हातही बांधलेले आहेत, त्यामुळे हे संशोधन पुढे नेणे अशक्यच असल्याचे संशोधकांनी नेचर या नियतकालिकाला सांगितले आहे.
यापूर्वी काय काय झाले?
जानेवारी २०२१ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचे एक पथक चीनच्या वुहानमध्ये विषाणूबाबत संशोधनासाठी गेले. त्यानंतर मार्च २०२१ मध्ये विषाणू मानवामध्ये कसा आला असावा याबाबतच्या काही संभाव्य परिस्थितींबाबत तीन ते चार रूपरेषा मांडण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात याच दिशेने पुढील संशोधन करण्याचे नियोजन होते. मात्र, त्या चीन दौऱ्याला दोन वर्षे होऊन गेल्यानंतर आता ते नियोजनच रद्द करण्यात आले आहे. जागतिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या एका शास्त्रज्ञाने म्हटले आहे. आतापर्यंत यासाठीचे संशोधन करण्यात बराच मौल्यवान वेळ गेला आहे, त्यानंतर असा निर्णय घेणे हे दुर्दैवी आहे, असेही जागतिक आरोग्य संघटना म्हणत नाही हे विशेष.
चीनची संदिग्ध भूमिका कायम?
करोना विषाणूच्य उत्पत्तीपासूनच चीनची भूमिका ही नेहमी संदिग्ध आणि असहकाराची राहिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने वेळोवेळी चीनशी संपर्क साधून वुहान शहरातील सुरुवातीच्या टप्प्यातील करोना रुग्णांबाबत, प्रामुख्याने मानवामध्ये संसर्ग आढळलेल्या घटनांबाबत माहिती मागवली. मात्र, चीनने त्याला प्रतिसाद दिला किंवा नाही हे कधीही स्पष्टपणे समोर आले नाही. प्रयोगशाळेतून झालेल्या अपघाती गळतीमुळे विषाणूचा उद्रेक झाल्याच्या सिद्धांताला पुष्टी देणारा कोणताही अभ्यास चीनकडून संघटनेला सादर करण्यात आला नाही, किंवा विषाणूचा उदय नेमका कसा झाला याबाबतचे संशोधनही चीनने प्रकाशात येऊ दिलेले नाही. त्यामुळे त्याबाबत ज्ञात माहिती मर्यादित आहे. उलट, चीनमधून विषाणूचा उद्रेक झाल्याचे वेळोवेळी नाकारण्यातच आले. त्यामुळे या संपूर्ण साथकाळात चीनची भूमिका संदिग्ध राहिली. ती तशीच असल्याचे आजही दिसून येते.
अभ्यास का महत्त्वाचा?
करोनाने वेढले त्या वेळी या महासाथीचे व्यवस्थापन कसे करायचे याबाबत जगभरामध्ये संभ्रमावस्था होती. विशेषत: प्रतिबंधात्मक लस, औषधे उपलब्ध होईपर्यंत साथीला आळा कसा घालायचा याबाबतचे आडाखे बांधणे, प्रयोग करणे यात बराच वेळ गेला. भविष्यात अशी महासाथ किंवा विषाणू उद्रेकांना तोंड देण्यासाठी जागतिक स्तरावर निश्चित धोरण तयार करायचे असल्यास त्यासाठी विषाणूच्या उत्पत्तीपासून ते त्यातील उत्परिवर्तने आणि उपप्रकार यांचा संगतवार अभ्यास असणे आवश्यक मानले जाते. त्या दृष्टीने वुहानमधील उत्पत्तीबाबत संशोधन महत्त्वाचे आणि महत्त्वाकांक्षीही होते. मात्र, आधी चीनचा आडमुठेपणा आणि आता जागतिक आरोग्य संघटनेकडून घेण्यात आलेली माघार यामुळे ते घडण्याची शक्यता धूसर झाली आहे.