Oscar Awards 2024 ऑस्कर नावाने प्रसिद्ध असलेला ९६ वा अकादमी पुरस्कार सोमवारी (११ मार्च) मोठ्या दिमाखात पार पडला. ऑस्करला जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार म्हणून पाहिले जाते. परंतु या पुरस्काराचे अधिकृत नाव ऑस्कर नसून अकादमी अवॉर्ड ऑफ मेरिट असे आहे. अकादमी पुरस्काराला ऑस्कर हे नाव कसे पडले, यामागे अनेक रंजक गोष्टी आहेत. याच रंजक गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
या पुरस्काराच्या अधिकृत वेबसाइटवर दिले आहे, “अधिकृतपणे या पुरस्काराचे नाव अकादमी अवॉर्ड ऑफ मेरिट असे आहे. पुरस्कारातील ट्रॉफीला ऑस्कर या टोपणनावाने ओळखले जाते.” हे नाव नेमके कुठून आले, हे यात दिलेले नाही. नेमके हे नाव आले कुठून? गोष्टींमध्ये या नावाचे रहस्य दडले आहे का? यावर एक नजर टाकुया.
ऑस्कर ट्रॉफी
१९२७ मध्ये सिनेक्षेत्रात काम करणार्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अकादमी पुरस्काराची सुरुवात झाली. याचवर्षी १५ मिनिटांच्या अकादमी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपणही झाले नाही.
काही आठवड्यांनंतर, मनोरंजन कंपनी एमजीएमचे कला दिग्दर्शक सेड्रिक गिबन्स यांनी एका चित्रपटाच्या रीलवर तलवार घेऊन उभा असलेल्या शूरवीराची आकृती रेखाटली. या डिझाइनच्या आधारेच आताची ऑस्कर ट्रॉफी तयार झाली. २० वर्षे अकादमीचे कार्यकारी संचालक राहिलेले ब्रूस डेव्हिस यांनी त्यांच्या “द अकॅडमी अँड द अवॉर्ड” या पुस्तकात लिहिले की, १९३० मध्यापर्यंत पुरस्कारासाठी लहान नावाची गरज भासू लागली.
‘व्हरायटी’या व्यापार मासिकाने ‘द आयर्न मॅन’ हे नाव सुचवले. परंतु या नावाला मान्यता मिळाली नाही. यावेळी ‘गोल्ड मॅन’ नावाचीदेखील खूप चर्चा होती. “अकादमीच्या पुरस्काराला शोभणारे नाव शोधणे आवश्यक होते आणि ते लवकरच मिळाले,” असे डेव्हिस यांनी आपल्या पुस्तकात लिहिले. ऑस्कर हे नाव ठरण्यापूर्वी एमीज, टोनीस, सीझर, एडगर, क्लिओस यांसारखे बरेच नाव सुचवण्यात आल्याचे, डेव्हिस यांनी सांगितले. ब्रूस डेव्हिस यांच्यानुसार ऑस्कर नावामागे चार वेगवेगळे सिद्धांत आहेत. यात ब्रूस डेव्हिस अभिनेत्री बेट डेव्हिस, ग्रंथपाल आणि अकादमीचे कार्यकारी संचालक मार्गारेट हेरिक, हॉलीवूड स्तंभलेखक सिडनी स्कोल्स्की आणि एलिनोर लिलबर्ग यांच्याबद्दल सांगतात.
बेट डेव्हिस
बेट डेव्हिसने १९३६ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. १९६२ मध्ये तिने तिच्या ‘द लोनली लाइफ’ या पुस्तकात त्या क्षणाबद्दल लिहिले. यात ती म्हणाली की, ट्रॉफी मागून पाहिल्यास तिचा संगीतकार पती हार्मन ऑस्कर नेल्सनसारखी सारखी दिसते. यामुळे पुरस्काराचे नाव ऑस्कर पडले. परंतु, ब्रूस डेव्हिसने या दाव्यावर शंका व्यक्त केली आणि म्हटले की, बेट डेव्हिसला पुरस्कार मिळण्याच्या किमान दोन वर्षांपूर्वीच ऑस्कर हे नाव पुरस्कारासाठी वापरले गेले होते.
मार्गारेट हेरिक
‘अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट अँड सायन्स’च्या कार्यकारी संचालक मार्गारेट हेरिक यांनी अकादमीमध्ये ग्रंथपाल म्हणून काम केले होते. तिला ट्रॉफी संदर्भातील कागदपत्र ग्रंथालयातील एका टेबलावर दिसले. तेव्हा तिने असा दावा केला की, ऑस्कर हे नाव तिचे काका ऑस्करच्या नावावर ठेवण्यात आले आहे. परंतु हेरिकला हे सिद्ध करता आले नाही की, तिचा ऑस्कर नावाचा काका आहे. मात्र एका दूरच्या नातेवाईकाचे तेच नाव असल्याचे आढळून आले.
सिडनी स्कोल्स्की
हॉलिवूड स्तंभलेखक सिडनी स्कोल्स्की यांनी ऑस्कर टोपणनाव मीच शोधले, असा दावा केला. त्यांनी १९३४ मध्ये लिहिलेल्या एका लेखात अकादमी पुरस्कारासाठी ऑस्कर नाव वापरले होते.
एलिनोर लिलबर्ग
ब्रूस डेव्हिसने लिहिले की, एलिनोर लिलबर्गने हे नाव दिले, मात्र नाव देण्याचे श्रेय कधीही घेतले नाही. एलिनोर लिलबर्ग अकादमीमध्ये सेक्रेटरी आणि जनरल ऑफिस असिस्टंट म्हणून काम होती. ती ती नॉर्वेची होती. ऑस्कर फ्रेडरीक याचा नॉर्वे आणि स्वीडनचा राजा म्हणून राज्याभिषेक होण्याच्या एक वर्षआधी, १८७१ साली नॉर्वेमध्ये तिचा जन्म झाला. डेव्हिसचा विश्वास होता की, हे नाव इथूनच आले असावे.
हेही वाचा : ऑस्कर जगातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार कसा झाला? पुरस्कारांची सुरुवात कधी झाली?
अकादमीचा सदस्य राहिलेल्या लिलबर्गच्या भावाने एका आत्मचरित्रात लिहिले की, एलिनोरची प्रेरणा शिकागोमध्ये राहणारा नॉर्वेजियन जनरल होता. ट्रॉफी सरळ आणि उंच असल्याने तिला नॉर्वेजियन जनरलची आठवण झाली. अकादमीच्या कार्यालयात येणाऱ्या इतर दोन लोकांनीही या नावाचे श्रेय एलिनोरला दिले. अकादमीने ई.डी. लिलबर्गचे योगदान कबूल केले नसले तरीही ते स्वीकारले असल्याचे डेव्हिस यांनी लिहिले आहे.
परंतु नेमके हे नाव कुठून आले, याबद्दल आजपर्यंत कुठलीही अधिकृत माहिती नाही. अकादमीनेदेखील स्वतः याबाबत कधीही स्पष्टीकरण दिले नाही.