-सचिन रोहेकर
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा समूहानंतर अदानी समूह हा भारतातील तिसरा सर्वांत मोठा उद्योग समूह आहे. पण ही तुलना त्या-त्या समूहातील कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलाच्या आधारे झालेली आहे. मात्र ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात कमोडिटी व्यापारी म्हणून सुरुवात करणाऱ्या अदानी समूहाच्या गौतम अदानी यांनी वैयक्तिक संपत्तीच्या बाबतीत सर्वांना मात देत, जगातील तिसऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश म्हणून स्थान कमावले आहे. विशेष म्हणजे आशियातील दोन सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोघांची व्यावसायिक साम्राज्य विस्ताराची भूक इतकी प्रचंड आहे की दोहोंमधील संघर्षाच्या ठिणगीचा लवकरच भडका उडालेला दिसल्यास ते आश्चर्याचे ठरणार नाही. त्याचाच माग घेताना हे सामर्थ्यवान उद्योगपती संपत्ती, व्यवसाय आणि मालमत्ता कशी उभी करतात याचा हा एक रंजक वेध…
अदानी समूहाच्या अलिकडच्या वर्षांतील दमदार भरारीचा व्याप किती?
वर्ष १९८८मध्ये स्थापन झालेला अदानी समूहाच्या भांडवली बाजारात सूचिबद्ध सध्या सात कंपन्या आहेत. पण त्यांच्या व्यवसायातील अलिकडची विविधता पाहता कंपन्यांची ही संख्या खूपच तोकडी भासते आणि नजीकच्या भविष्यात ती अकस्मात वाढणेही शक्य आहे. १९८८ ते १९९५ पर्यंत अदानी हे त्यांच्या मूळ प्रांत गुजरातपुरतेच सीमित होते. मुख्यतः बंदरे आणि धक्के हेच त्यांचे व्यवसाय क्षेत्र होते. आजच्या घडीला भारताच्या किनारपट्टीवर आणखी तब्बल १२ अदानी बंदरे कार्यरत झाली आहेत. समूहाच्या अलिकडच्या वार्षिक अहवालानुसार विजेचे वितरण, नैसर्गिक वायू, सौर आणि औष्णिक वीज निर्मिती, डेटा सेंटर्स, स्थावर मालमत्ता, विमानतळ, जल व्यवस्थापन, फळे आणि खाद्यतेलाची किरकोळ विक्री आणि आर्थिक सेवा वगैरेमध्ये समूहातील विविध कंपन्यांचे व्यवसाय आहेत. संरक्षण क्षेत्रात ते विस्तार करू पाहात आहेत. नुकतेच होल्सिम (एसीसी, अंबुजा सीमेंट) या बहुराष्ट्रीय कंपनीचा भारतातील व्यवसाय संपादित करून ते सीमेंट उत्पादनातही उतरले आहेत. तर हरित ऊर्जा आणि दूरसंचार या नव्या क्षेत्रांच्या बरोबरीने माध्यम क्षेत्रातील विस्ताराच्या मनसुब्यांना त्यांनी प्रत्यक्षरूप दिल्याचे दिसून आले आहे.
मुकेश अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचा विस्तारणारा पट कसा आहे?
रिलायन्स इंडस्ट्रीजने आक्रमक विस्ताराची रणनीती आखली आहे. पण त्यासाठी भांडवली गुंतवणूक ही प्रस्थापित प्रमुख व्यवसायांच्या जलद वाढीला केंद्रस्थानी ठेवून सुरू आहे. डिजिटल सेवा आणि किराणा क्षेत्रात स्थान मजबूत केल्यानंतर, वाढीच्या पुढील टप्प्यात येत्या दिवाळीत ५ जी सेवेचे अनावरण आणि दोन वर्षांत संपूर्ण देशभरात ५ जी सेवा जाळे विस्तारण्यासाठी २ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना नुकत्याच झालेल्या कंपनीच्या ४५ व्या वार्षिक सभेपुढे मुकेश अंबानी यांनी मांडली. तर तेल ते रसायन या पारंपरिक व्यवसायातील स्थापित क्षमतांचा विस्तार करण्यासाठी आणखी ७५,००० कोटी रुपये गुंतविले जाणार आहेत. यातून जामनगर, गुजरातमध्ये पूर्णतः एकात्मिक नवीन ऊर्जा उत्पादन परिसंस्थेची स्थापना केली जाणार आहे. कंपनीकडून आखल्या गेलेल्या नवीन ऊर्जा ध्यासामध्ये, इंधनरूपी ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन, बॅटरी आणि २०२५पर्यंत तब्बल २०,००० मेगावॉट सौर वीजनिर्मिती अशा महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांचा समावेश आहे.
अदानींच्या अलीकडच्या उत्तुंग यशाचे गमक काय?
गत दोन-अडीच वर्षे जेव्हा सबंध जग अनिश्चिततेच्या दाट सावटाखाली चाचपडत होते, नेमके त्याच काळात अदानी समूहाचा कल्पनातीत वेगाने उद्योग साम्राज्याचा विस्तार सुरू होता. ऑगस्ट २०२० पासून त्यांच्या समूहातील कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत दहापट वा जास्तच वाढ झाली आहे. समूहाने प्रस्थापित व्यवसायांचा भौगोलिक आणि क्षमता या अंगाने विस्तार करण्यासह, विविध उद्योग क्षेत्रांमध्ये नव्याने पाय जमवण्यासाठी अधिक आक्रमकता दाखविली आहे. अदानींच्या अलीकडच्या वर्षातील यशाचे श्रेय हे अनेकदा त्यांच्या कंपन्यांचे भारतात केंद्रातील सत्ताधारी आणि त्यांच्या नेतृत्वाशी असलेल्या घनिष्ठ सलगीला जाते. उभयतांपैकी कुणाकडूनही याचे खंडन केले जाईल, असे स्पष्टीकरणही करण्यात आलेले नाही.
अदानींचा विस्तार अतिमहत्त्वाकांक्षी आणि जोखीमयुक्त म्हणता येईल काय?
अदानी यांची अतिमहत्त्वाकांक्षी कर्जावर-आधारित उद्योग विस्तार योजना अखेरीस भयानक कर्जसापळ्याचे रूप घेऊ शकते, असा निःसंदिग्ध इशारा पतमानांकन संस्था ‘फिच’ने अलिकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून दिला आहे. अदानींच्या नव्या प्रकल्पांमध्ये भागभांडवली गुंतवणूक झाल्याचे किंवा बड्या गुंतवणूकदारांचा सहभाग झाल्याचे अभावानेच दिसते. बँकांचे कर्ज आणि भांडवली बाजारातून निधी उभारणी तसेच कार्यरत कंपन्यांचा रोख प्रवाहच नवीन विस्तारांसाठी वापरात येतो. परिणामी गेल्या वर्षभरात अदानी समूहाचे कर्जदायित्व ४० टक्क्यांनी वाढून २.२१ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. मात्र एक गोष्ट खरी की, गुंतवणूकदारांना म्हणजेच समभाग धारकांना अदानी यांची ही महत्त्वाकांक्षा आणि आक्रमकता चांगलीच भावते आहे. सत्ताधारी पक्षाशी जोवर त्यांचे चांगले संबंध आहेत, तोपर्यंत त्यांच्या या घोडदौडीला धोकाही नसल्याचे ‘फिच’ने अहवालातूनच स्पष्ट केले आहे. त्या उलट अंबानी यांनी करोना साथीच्या काळात गुगलपासून फेसबुकपर्यंत मोठी विदेशी भांडवली गुंतवणूक आकर्षित करून त्यांच्या व्यवसायांवरील कर्जदायित्व लक्षणीय प्रमाणात कमी करीत आणले आहे.
दोन दिग्गजांची आगामी वाटचाल आणि संघर्षाची शक्यता कितपत?
अंबानी हे उत्तरोत्तर थेट ग्राहकांना भिडणाऱ्या (किराणा, दूरसंचार-इंटरनेट, डिजिटल सेवा व प्रक्षेपण) व्यवसायांमधील क्षमतेत विस्तारासाठी प्रयत्नरत आहेत, तर दुसरीकडे अदानी मुख्यतः पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात जम निर्माण करू पाहत आहेत. अर्थात दिल्ली-दरबारी दखलपात्र आणि सरकारसाठी उपयुक्त क्षेत्रात ते कार्यरत आहेत. म्हणजे बघता बघता देशाच्या बंदर क्षेत्रातील २४ टक्के क्षमतेची मालकी एकट्या अदानींकडे आली, तर विमानतळे, जल व्यवस्थापन, महामार्ग व पथकर, खाणी, धान्य गोदाम सुविधा आणि खासगी रेल्वेतही त्यांनी पुढे याच प्रमाणात बस्तान निर्माण केल्याचे दिसल्यास नवलाचे ठरणार नाही. अर्थात ‘आत्मनिर्भर भारता’च्या घडणीत त्यांनी केलेले ‘राष्ट्रहिताचे योगदान’ म्हणूनच ते गौरविले जाणार आणि कुठेही सत्ताधाऱ्यांच्या वरहस्ताने भांडवलशहांचा तो ‘विकास’ मानला जाणार नाही, याची खुद्द अदानी यांनाही खात्री आहे. अर्थात ‘आत्मनिर्भर भारता’चा उत्कर्ष आणि ‘राष्ट्रवादी’ अविर्भाव दाखविण्याचा वाव अंबानी यांनाही आहेच. जरी दोघे काही समान उद्योगांमध्ये कार्यरत असले तरी, बहुविध क्षेत्रातील या महाकाय कंपन्या एकमेकांशी थेट स्पर्धेपासून दूर आहेत, असे आजवर चित्र होते. परंतु अंबानी यांच्या बरोबरीने अदानी यांनीही ५ जी ध्वनिलहरी लिलावात अलीकडेच यशस्वी बोली लावली. रिलायन्स समूहातील कंपनीच्या व्यवसायाच्या मुख्य स्तंभांपैकी एकामध्ये अदानी यांच्या घुसखोरीची ही सुरुवात म्हणता येईल. अंबानी यांनी बऱ्यापैकी बस्तान बसविलेल्या माध्यम क्षेत्रातही अदानी यांचा शिरकाव झाला आहे. ऊर्जा आणि वायूच्या क्षेत्रातही त्यांच्यात स्पर्धा रंगणार आहे. भारताच्या उद्योग क्षेत्रातील हे दोन दिग्गज एकमेकांना भिडणे केवळ अपरिहार्य दिसत आहे.