मुसळधार पावसाचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांना फटका बसला. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला, तर काही भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसाने कोकण रेल्वेची सेवादेखील ठप्प झाली होती. सलग दहा वर्षे पावसाळ्यात रेल्वे सेवेत कोणताही मोठा व्यत्यय आलेला नाही, असा दावा कोकण रेल्वे प्रशासन करते. मात्र, दरवर्षी पाणी भरणे, दरडी कोसळणे, रुळांवर माती येणे, रुळांखालील माती वाहून जाणे असे प्रकार या मार्गावर होत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा पावसाळ्यापूर्वी कोणती कामे?

राज्यात सर्वाधिक पाऊस कोकण पट्ट्यात पडतो. मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेला कायम सज्ज राहावे लागते. दरवर्षी पावसाळ्यात कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या ७४० किमी पट्ट्यात पायाभूत सुविधांची देखभाल, वाढीव गस्त, आपत्कालीन यंत्रणा सक्षम करणे असे प्रयत्न पावसाळ्यात रेल्वे सेवा सुरळीत चालवण्यासाठी करण्यात येतात. यंदाही पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेने विविध ब्लाॅक घेऊन, पायाभूत कामे केली होती. तसेच असुरक्षित रेल्वे मार्गांवर २४ तास गस्त घालण्यासाठी ६७२ सुरक्षा कर्मचारी तैनात केले. मुसळधार पावसात कोकण रेल्वेच्या मार्गावर पाणी येऊ नये यासाठी पाण्याचे मार्ग मोकळे करणे, मार्गानजीकच्या दरडींची पहाणी करून धोकादायक वाटणारी दरड काढून टाकण्याचे काम केले. आपत्कालीन स्थितीत तात्काळ मदत मिळावी, यासाठी ठराविक अंतरांवर पोकलेन मशीनसारखी यंत्रणा सज्ज ठेवली. कोकण रेल्वे मार्गावरील सर्व सिग्नल यंत्रणेचे दिवे एलईडी बसविले होते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोकण रेल्वे सज्ज असल्याचा दावा प्रशासनाने केला होता.

हे ही वाचा… आयसीसीच्या बोर्डरूममध्ये भारत वि. पाकिस्तान! चँपियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाईल?

रेल्वेगाड्यांचा वेग का मंदावला?

रेल्वे प्रवासी सुरक्षेसाठी कोकण रेल्वेवर दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते. पावसाळी वेळापत्रकाचा सर्वात जास्त परिणाम अतिजलद रेल्वेगाड्यांवर होतो. त्यामुळे बहुतेक सर्व रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येते. मुसळधार पाऊस पडत असताना दृश्यमानता कमी होत असल्याने, रेल्वेचा वेग ताशी ४० किमी ठेवण्याच्या सूचना लोको पायलटना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेवरील रेल्वेगाड्यांचा वेग मंदावला आहे.

काही वेळा कोकण रेल्वे ठप्प का झाली?

कोकणात जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने ९ जुलै रोजी कोकण रेल्वे मार्गावरील गोव्यातील मालपे (पेडणे-गोवा) बोगद्यामध्ये पाणी व चिखल साचल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे संपूर्ण कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. गेल्या वर्षी देखील असाच प्रकार घडला होता. त्या घटनेमुळे गाड्या ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकात थांबविण्यात आल्या. अनेक रेल्वेगाड्या उशिराने धावत होत्या. त्यातच १४ जुलै रोजी दिवाणखवटी येथे रुळांवर माती वाहून आल्याने पुन्हा एकदा कोकण रेल्वे ठप्प झाली. अखेर १५ जुलै रोजी दिवाणखवटी येथील रेल्वेमार्गावर पडलेली दरड हटविण्यात प्रशासनाला यश आले आणि तब्बल २४ तास ठप्प असलेली वाहतूक सुरू झाली.

हे ही वाचा… दहशतवादाचा केंद्रबिंदू जम्मूकडे सरकतोय का? या भागात सातत्याने हल्ले का होत आहेत?

कोकणात कुठे, किती पाऊस पडला?

१५ जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड २१० मिमी, खेड २११ मिमी, दापोली १३२ मिमी, वाकवली २२३.२ मिमी, चिपळूण २४३ मिमी, गुहागर ५७ मिमी, संगमेश्वर १०५ मिमी, लांजा ९६ मिमी, राजापूर ८३ मिमी पाऊस पडला. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार् १५३ मिमी, कणकवली १६४ मिमी, मालवण १३४ मिमी, कुडाळ १६५ मिमी, सावंतवाडी १२० मिमी, देवगड १७१ मिमी पाऊस पडला.

कोकण रेल्वेचा दावा फोल का ठरला?

रेल्वे सेवांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न वाढविण्यात असल्याचे कोकण रेल्वे प्रशासन सांगते. गेल्या १० वर्षांत पावसाळ्यात रेल्वे सेवेत कोणताही मोठा व्यत्यय आलेला नाही, असा दावा कोकण रेल्वे प्रशासनाने केला आहे. मात्र, यंदा पावसाळ्यापूर्वीपासून अनेक वेळा ब्लाॅक घेऊन पायाभूत सुविधा वाढविल्या होत्या. ब्लाॅक कालावधीत अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले होते. त्यामुळेही प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. मात्र, पावसाळ्यात रेल्वे सेवा सुरक्षितरित्या धावेल, यासाठी प्रवाशांनी ते हाल सोसले. परंतु, कोकणात पडलेल्या जोरदार पावसाने कोकण रेल्वेचे तीनतेरा वाजले. कोकण रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वेगाड्या रत्नागिरी, खेड, संगमेश्वर, चिपळूण, राजापूर रोड, सावंतवाडी, कुडाळसह अन्य स्थानकांवर गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा… विश्लेषण: बांगलादेशात विद्यार्थी आंदोलन का करत आहेत?

गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या घटली?

पावसाळ्यात संपूर्ण कोकण रेल्वेच्या मार्गावर २४ तास गस्त घालण्यासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातात. मात्र, त्यांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. २०२१ साली कोकण मार्गावर ६८१ कर्मचारी होते. तर, यावर्षी ही संख्या ६७२ वर आली आहे. त्यामुळे असुरक्षित ठिकाणी गस्त घालणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why again konkan railway became unreliable during monsoon print exp asj