प्रवासात मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करता यावीत म्हणून लोक सामान्यतः पॉवर बँकचा वापर करतात. अनेक ठिकाणी चार्जर बरोबर असूनही चार्ज करण्याची सुविधा नसते. त्यामुळे लोक पॉवर बँकचा वापर करतात. अनेक प्रवासी विमानातही पॉवर बँक घेऊन प्रवास करतात. ही अगदी सामान्य बाब आहे. मात्र, हीच पॉवर बँक घेऊन प्रवास करण्यावर अनेक विमान कंपन्या बंदी घालत आहेत. आशियातील अनेक विमान कंपन्या आता उड्डाणादरम्यान पॉवर बँक घेऊन जाण्याबाबतचे नियम कडक करताना दिसत आहेत.
या पोर्टेबल उपकरणाचा वापर प्रवासी फोन, टॅबलेट, लॅपटॉप व कॅमेरे चार्ज करण्यासाठी करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासात मनोरंजन आणि कनेक्टिव्हिटी कायम राहावी, हा त्यामागील हेतु असतो. परंतु, आशियातील विमान कंपन्या पॉवर बँकवर बंदी का घालत आहेत? कोणत्या विमान कंपन्यांनी त्यांचे नियम बदलले आहेत? त्यामागील उद्देश काय? त्याविषयी जाणून घेऊ.
विमान प्रवासात पॉवर बँकवर बंदी घालण्याचे कारण काय?
पोर्टेबल पॉवर बँकमध्ये सामान्यतः लिथियम बॅटरी असते. ही बॅटरी ज्वलनशील असते. जानेवारीमध्ये एअर बुसान विमानात टेक ऑफच्या वेळी लागलेल्या आगीचे संभाव्य कारण लिथियम बॅटरी असल्याचे सांगितले गेले होते. दक्षिण कोरियाच्या वाहतूक मंत्रालयाने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, तपासकर्त्यांना पॉवर बँकच्या तुकड्यांमध्ये वितळण्याची चिन्हे दिसून आली. परिणामी, विमान कंपन्यांनी उड्डाणांमध्ये लिथियम बॅटरी नेण्यावर कडक नियम लादण्यास सुरुवात केली आहे. विमानातील आगीच्या घटना वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘सीएनएन’च्या वृत्तानुसार, उत्पादनातील समस्या, अयोग्य पद्धतीचा वापर व बॅटरी जुनी झाल्यास जोखीम आणखी वाढू शकते. लिथियम बॅटरीमध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याने उड्डाणादरम्यान आगीचा धोका निर्माण होऊ शकतो. यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए)ने २० वर्षांत लिथियम बॅटरीमुळे धूर, आग किंवा अतिउष्णता निर्माण होण्याच्या ५०० हून अधिक घटना नोंदवल्या आहेत.

जागतिक विमान वाहतूक नियमांचे निरीक्षण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने २०१६ मध्ये प्रवासी विमानांच्या कार्गो होल्डमध्ये लिथियम-आयन बॅटरी नेण्यास मनाई केली होती. परंतु, वेगवेगळ्या एअरलाइन्सचे नियम वेगवेगळे असतात. ऊर्जा साठवण्याची क्षमता व परवडणाऱ्या किमतींमुळे पॉवर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात लिथियम-आयन बॅटरीज वापरल्या जातात, असे आरएमआयटी विद्यापीठाच्या एसटीईएम कॉलेजमधील असोसिएट प्रोफेसर क्रिस्टल झांग यांनी ‘सीएनएन’ला सांगितले.
लिथियम-आयन बॅटरीजचा धोका
लिथियम-आयन बॅटरीज सामान्यतः मोबाईल फोन, लॅपटॉप, ड्रोन, स्मार्ट वेअरेबल्स, तसेच इलेक्ट्रिक बाइक्स, स्कूटर आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आढळतात. ‘थर्मल रनअवे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका प्रक्रियेमुळे या बॅटरी जास्त गरम होऊ शकतात. परिणामी आग किंवा स्फोटदेखील होऊ शकतो. ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील एरोस्पेस डिझाइनमधील वरिष्ठ व्याख्याता सोन्या ब्राउन यांनी ‘सीएनएन’ला सांगितले की, लिथियम-आयन बॅटरीज असणाऱ्या पॉवर बँकमध्ये अत्यंत ज्वलनशील पदार्थ असतात.
सोन्या ब्राउन यांनी पुढे सांगितले, “लिथियम बॅटरीज इग्निशन किंवा इतरत्र लागलेल्या आगीसाठी इंधनाचा स्रोत म्हणून कारणीभूत ठरू शकतात. जेव्हा लिथियम बॅटरीज खराब होतात, फुगतात, जास्त चार्ज होतात किंवा जास्त गरम होतात, तेव्हा संभाव्य धोका वाढतो.” सोन्या ब्राउन यांनी असेही सांगितले की, इतर बॅटरीशी याचा संपर्क आल्याने स्फोट होऊ शकतो. त्यांनी शिफारस केली की, पॉवर बँक आणि स्पेअर बॅटरीज यांचा इतर धातूंशी संपर्क टाळण्यासाठी त्या नॉन-कंडक्टिव्ह मटेरियलने झाकल्या पाहिजेत किंवा वेगळ्या पॅक केल्या गेल्या पाहिजेत.”
कोणत्या आशियाई विमान कंपन्यांनी पॉवर बँकवर बंदी घातली?
लिथियम-आयन बॅटरीशी संबंधित आगीच्या वाढत्या घटना आणि सुरक्षिततेसाठी विमान कंपन्यांनी पॉवर बँकवर निर्बंध लादले आहेत. सिंगापूर एअरलाइन्स (एसएआय) १ एप्रिलपासून कठोर नियम लागू करणार आहे. प्रवाशांना ऑनबोर्ड यूएसबी पोर्टद्वारे पॉवर बँक चार्ज करण्यास किंवा वैयक्तिक उपकरणे चार्ज करण्यासाठी पॉवर बँकचा वापर करण्यास मनाई असेल. दक्षिण कोरियामध्ये याच महिन्यापासून नवीन निर्बंध लागू झाले आहेत. सर्व देशांतर्गत विमान कंपन्यांच्या ओव्हरहेड केबिनमध्ये प्रवाशांना पॉवर बँक आणि ई-सिगारेट ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
थाई एअरवेजने घोषणा केली की, १५ मार्चपासून प्रवाशांना उड्डाणादरम्यान पॉवर बँक वापरण्याची किंवा चार्ज करण्याची परवानगी दिली जाणार नाही. कंपनीने नमूद केले की, आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणात आगीच्या घटना घडल्या आहेत, ज्या पॉवर बँक वापराशी संबंधित असल्याचा संशय आहे. कमी किमतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या एअर एशिया या विमान कंपनीनेदेखील निर्बंध लादले आहेत. प्रवाशांना सीटखाली किंवा सीटच्या खिशात पॉवर बँक ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण उड्डाणादरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करण्यास बंदी घातली आहे.
तैवानच्या प्रसिद्ध विमान कंपन्या, ईव्हीए एअर, चायना एअरलाइन्स व युनि एअर यांनीही उड्डाणादरम्यान पोर्टेबल चार्जरच्या वापरावर बंदी घातली आहे. हाँगकाँगच्या विमान वाहतूक प्राधिकरणाने प्रवाशांना उड्डाणात पॉवर बँक वापरण्यावर किंवा ओव्हरहेड कम्पार्टमेंटमध्ये लिथियम बॅटरी ठेवण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी ७ एप्रिलपासून लागू होईल.
भारतातील नियम काय?
भारतात विमान कंपन्या प्रवाशांना चेक-इन सामानात पॉवर बँक घेऊन जाण्यास मनाई करतात. विमान वाहतूक तज्ज्ञ व विश्लेषक धैर्यशील वांडेकर यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, पॉवर बँक केवळ कॅबिन बॅगमध्येच ठेवता येते. अहवालानुसार, विमान कंपन्या प्रवाशांना १०० वॅट प्रतितास क्षमतेच्या दोन पॉवर बँक कॅबिनमध्ये नेण्यात येणाऱ्या सामानात घेऊन जाण्याची परवानगी देतात. १०० वॅट प्रतितास आणि १६० वॅट प्रतितास दरम्यानच्या पॉवर बँकना विमान कंपनीची पूर्वपरवानगी आवश्यक असते आणि १६० वॅट प्रतितासपेक्षा जास्त क्षमतेच्या पॉवर बँकांना विमानात परवानगी नसते.
तपास करण्यात आलेल्या सामानात पॉवर बँक असल्यास काय होईल?
बॅटरी तीव्र उष्णता निर्माण करू शकतात आणि शॉर्ट सर्किट झाल्यास किंवा इतर प्रकारचे नुकसान झाल्यास आगदेखील लागू शकते. या बॅटरी पाणी किंवा इतर घटकांच्या संपर्कात आल्याने आग किंवा स्फोटदेखील होऊ शकतो; ज्यामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. जर बॅटरीने धूर सोडण्यास सुरुवात केली किंवा उड्डाणादरम्यान पेट घेतला, तर केबिन क्रू सदस्यांना बॅटरीला लागलेली ती आग पाण्याने न विझवण्याचे किंवा थर्मल कंटेन्मेंट बॅगमध्ये सुरक्षित ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जाते, असे ‘द टेलिग्राफ यूके’च्या वृत्तात म्हटले आहे. काही घटना अशा असतात, ज्यात आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण असते. अशा प्रकरणांमध्ये विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागू शकते.
तुम्हाला पुढील प्रवासात पॉवर बँक घेऊन जाता येणार का?
विमानांमध्ये पॉवर बँक घेऊन जाण्यास परवानगी आहे; परंतु प्रशासनाने ठरवलेल्या नियमांनुसार त्या कॅरी-ऑन बॅगेजमध्ये पॅक करणे महत्त्वाचे असते. ‘सीएनएन’च्या वृत्तानुसार, बहुतेक एअरलाइन्स प्रत्येक प्रवाशाला केबिनमध्ये १०० ते १६० वॅट प्रतितास क्षमतेच्या दोन लिथियम-आयन पॉवर बँक घेऊन जाण्याची परवानगी देतात. परंतु, प्रवासी उड्डाणादरम्यान त्यांचा वापर करू शकतात की नाही हे वेगवेगळ्या एअरलाइनच्या नियमांवर अवलंबून असते.