काही दिवसांपूर्वीच आटोपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या पुरस्कार सोहळ्यात यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला डच्चू देण्यात आला. या प्रकरणाची चर्चा शमतेय तोवर इंग्लंडमध्ये द हंड्रेड स्पर्धेच्या ड्राफ्ट कार्यक्रमात पाकिस्तानच्या ५०हून अधिक खेळाडूंपैकी एकालाही बोली न लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पण यामागे अप्रत्यक्ष भारताचीच भूमिका असल्याने पाकिस्तानी चाहते संतापले आहेत.
या स्पर्धेचं संयोजन पाकिस्तानकडे होतं. भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवण्यात आले. भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारल्याने अंतिम लढत दुबईत खेळवण्यात आले. पाकिस्तानच्या संघाला प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. त्यात भर म्हणून अंतिम लढतही देशाबाहेर गेल्याने चाहत्यांची निराशा झाली. पाकिस्तानच्या खेळाडूंची कामगिरी सर्वसाधारण झाल्याने माजी खेळाडूंनी जोरदार टीका केली.
द हंड्रेड स्पर्धा काय आहे?
आयपीएल स्पर्धा यशस्वी झाल्यानंतर जगभरात याची प्रारुपं सुरू झाली. द हंड्रेड हे लीग स्पर्धेचं आणखी एक आधुनिक रुप आहे. नावानुसार, १०० चेंडूंचा सामना असतो. ईसीबी अर्थात इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डातर्फे ही स्पर्धा आयोजित केली जाते. दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात ही स्पर्धा होते. स्पर्धेत ८ संघ असतात. इंग्लंडच्या खेळाडूंच्या बरोबरीने जगभरातील ट्वेन्टी२० विशेषज्ञ खेळाडू या स्पर्धेत खेळतात. २०२१ मध्ये पहिल्यांदा द हंड्रेड स्पर्धा सुरू झाली. अडीच तासात सामना संपेल अशी संरचना आहे. बर्मिंगहॅम फोनिक्स, लंडन स्पिरिट, मँचेस्टर ओरिजिनिल्स, नॉदर्न सुपरचार्जर्स, ओव्हल इनव्हिजिबल्स, सदर्न ब्रेव्ह, ट्रेंट रॉकेट्स, वेल्श फायर असे ८ संघ स्पर्धेत सहभागी होतात. ओव्हल इनव्हिजिबल संघाने दोनदा जेतेपदाची कमाई केली आहे.
द हंड्रेड ड्राफ्ट काय असतो?
आयपीएलमध्ये जसा लिलाव असतो तसं द हंड्रेड मधल्या संघांना खेळाडू मिळवण्यासाठी ड्राफ्ट असतो. जगभरातल्या खेळाडूंची नावं या ड्राफ्टमध्ये असतात. संघ आपापल्या आवश्यकतेनुसार खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करतात. यंदाच्या हंगामासाठी असा ड्राफ्ट आयोजित करण्यात आला होता. ड्राफ्टसाठी ५०हून पाकिस्तानच्या खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. या स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवणं गरजेचं असतं. ड्राफ्टसाठी वेगवान गोलंदाज नसीम शहा, धडाकेबाज सलामीवीर सईम अयुब यांच्यासह अष्टपैलू शदाब खान यांना मोठी बोली लागेल अशी चिन्हं होती. पाकिस्तानच्या पुरुष खेळाडूंच्या बरोबरीने आलिया रियाझ, फातिमा साना, युसरा आमिर, इराम जावेद, जावेरिया रौफ या महिला खेळाडूंना ताफ्यात समाविष्ट करून घेण्यात कोणत्याही संघाने स्वारस्य दाखवलं नाही.
पाकिस्तानच्या खेळाडूंकडे दुर्लक्ष का?
द हंड्रेड ही स्पर्धा ईसीबीतर्फे आयोजित केली जात असली तरी या संघांच्या मालकत्वामध्ये आयपीएलच्या संघमालकांचा समावेश आहे. उदाहरणार्थ ओव्हल इनव्हिजिबल संघात मुंबई इंडियन्सच्या संघमालकांचा हिस्सा आहे. मँचेस्टर ओरिजिनल्समध्ये लखनौ सुपर जायंट्स समभागी आहे. नॉदर्न सुपरचार्जर्स संघात सनरायझर्स हैदराबाद मालकांचा वाटा आहे. सदर्न ब्रेव्ह संघात दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांची हिस्सेदारी आहे.
भारतीय वंशाचे अमेरिकेचे उद्योगपती संजय गोवील यांनी वेल्श फायर संघाची ५० हिस्सेदारी खरेदी केली आहे. सिलिकॉन व्हॅली टेक आंत्रप्रिनर्स कंर्झोटियमचा भाग असणाऱ्या क्रिकेट इन्व्हेस्टर होल्डिंग्ज लिमिटेड यांनी लंडन स्पिरिट संघात ४९ टक्के हिस्सा खरेदी केला आहे.
२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध दुरावले. पाकिस्तानच्या खेळाडूंचा आयपीएल खेळण्याचा मार्ग बंद झाला. भारतीय संघ पाकिस्तानात जाऊन खेळत नाही आणि पाकिस्तानचा संघ भारतात खेळण्यासाठी येत नाही. आयसीसी आयोजित स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान संघ खेळतात पण तेही तटस्थ ठिकाणी. आशिया कप स्पर्धेतही हेच समीकरण लागू असतं. भारत-पाकिस्तान सामना हा कोणत्याही स्पर्धेच्या अर्थकारणासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे आयसीसी तसंच आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामना असतोच पण हे सामने तटस्थ ठिकाणीच होतात. द हंड्रेड स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंना घेतलं तर भारतीय चाहते नाराज व्हायची शक्यता आहे. इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक राहतात. संघमालक भारतीय आणि खेळाडू पाकिस्तानचे असं समीकरण झाल्यास अडचणीचं ठरू शकतं. यामुळेच ड्राफ्टमध्ये कोणत्याही संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंना घेण्यात स्वारस्य दाखवलं नाही.
याबरोबरंच पाकिस्तानच्या खेळाडूंची गेल्या काही महिन्यातली कामगिरी यथातथाच झाली आहे. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानला बाद फेरीही गाठता आली नाही. न्यूझीलंड आणि भारताकडून पराभूत होताच पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला. पाकिस्तानने या स्पर्धेच्या आयोजनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले मात्र घरच्या मैदानावर एकमेव सामना खेळून त्यांच्यावर माघारी परतण्याची वेळ ओढवली. फलंदाजीला पोषक खेळपट्या असतानाही पाकिस्तानच्या एकाही फलंदाजांला शतकी खेळी साकारता आली नाही. स्पर्धेत बाकी संघ फिरकीकेंद्रित आक्रमण करत असतानाही पाकिस्तानने संघात एकमेव फिरकीपटूला स्थान दिलं. मायदेशातील खेळपट्यांचा नूर ओळखण्यातही पाकिस्तानला जमलं नाही अशी टीका करण्यात येत आहे. निवडसमितीने योग्य संघ निवडला नाही अशी टीकाही करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नसीम शहा आणि शाहीन शहा आफ्रिदी यांना ना हरकत प्रमाणपत्र देताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे द हंड्रेड स्पर्धेतला त्यांचा सहभाग मर्यादित झाला. पाकिस्तानचे खेळाडू स्पर्धेचे सगळे सामने खेळू शकणार नसतील तर त्यांना संघात घेण्याचं प्रयोजनच काय असाही विचार संघमालकांनी केलेला असू शकतो.